8th Pay Commission Fitment Factor Salary Hike Details : केंद्र सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगातील कार्यक्षेत्राच्या अटींना हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्याने स्थापन केलेल्या आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांनी केलेल्या शिफारशींना मंजुरी दिल्यानंतर १ जानेवारी २०२६ पासून वेतनवाढीची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्याचाच हा आढावा…
गेल्या वर्षी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १० महिन्यांचा कालावधी उलटूनही आयोगाची स्थापना करण्यात आली नव्हती. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाची घोषणा करून त्याच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली. या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.
‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे काय?
- आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर ‘फिटमेंट फॅक्टर’ हा शब्द पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
- कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गणना करण्यासाठी सरकारकडून फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो.
- ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, सातव्या वेतन आयोगात २.५७ इतका फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता.
- आठव्या वेतन आयोगासाठीचा नवीन फिटमेंट फॅक्टर सरकारची मंजुरी आल्यानंतरच निश्चित होणार आहे.
- प्रत्येक वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन ठरवण्यासाठी त्यांच्या मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते.
- अशी माहिती ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिली.
आणखी वाचा : Pakistan Women Terrorist : भारतासाठी धोक्याची घंटा? ऑनलाइन कोर्सद्वारे घडवतायत महिला जिहादी
कर्मचाऱ्यांची वेतनवाढ कशी ठरते?
उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन ३५,००० रुपये असेल आणि वेतन आयोगाने २.११ इतका फिटमेंट फॅक्टर निश्चित केला, तर त्या कर्मचाऱ्याचे एकूण वेतन ७३ हजार ८५० रुपये इतके होईल. नेक्सडिग्म कंपनीचे वेतन सेवा संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती म्हणाले, सहसा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या भत्त्यांमध्येही घसघशीत वाढ होते. आयोगाकडून त्याचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन केले जाते आणि त्यांच्या सुधारणा शिफारशी लागू झाल्यानंतर काही महिन्यांनी होण्याची शक्यता असते.
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढणार का?
- फिटमेंट फॅक्टरवरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे गणित ठरणार असले तरीही महागाई भत्त्यात वाढ होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
- कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरवला जातो आणि त्याचा वेतनवाढीच्या गणनेवर अप्रत्यक्ष परिणाम होतो.
- ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंह पटेल यांनी महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरचे गणित सांगितले आहे.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता ५८% आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होईपर्यंत त्यात आणखी १२ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
- याचाच अर्थ, अंमलबजावणीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे मनजित सिंह म्हणाले.
- वेतन आयोगाकडून सर्व घटकांचा एकत्रित विचार करूनच फिटमेंट फॅक्टर ठरवला जातो.
- शेवटी हाच फॅक्टर कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ निश्चित करण्याचा पाया ठरतो, असेही ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती होणार वाढ?
मनजित सिंह पटेल यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले की, फिटमेंट फॅक्टरचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आणि घरभाडे भत्त्यावर होतो. तसेच नवीन वेतन आयोग लागू होताच महागाई भत्ता पुन्हा शून्यावर रिसेट होतो. या बदलांमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात २० ते २५% पर्यंत वाढ होण्याची शक्यता असते. सातव्या वेतन आयोगात सर्व पदांसाठी २.५७ असा समान फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, असे रामचंद्रन कृष्णमूर्ती यांनी सांगितले. प्रशासकीय सुलभतेसाठी सरकार हा एकसमान दृष्टिकोन कायम ठेवू शकते. कमी पगाराच्या गटांसाठी किंचित जास्त फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
फिटमेंट फॅक्टरचे गणित काय?
मनजित सिंह पटेल यांच्या मते, वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची अधिक संधी असल्यामुळे आयोग कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी उच्च फिटमेंट फॅक्टर आणि वरिष्ठांसाठी तुलनेने कमी फॅक्टर लागू करण्याचा विचार करू शकतो. तसेच, वेतन संरचना अधिक सुसंगत करण्यासाठी काही वेतनाचा स्तर एकत्र करण्याचाही विचार होऊ शकतो. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे १८ स्वतंत्र वेतन स्तरांमध्ये वर्गीकरण केले जाते. नेक्सडिग्मचे संचालक रामकृष्णमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, जर फिटमेंट फॅक्टर २.० निश्चित झाला, तर गणना सोपी होईल.
निवृत्ती वेतनातही कशी होऊ शकते वाढ?
उदाहरणार्थ, सातव्या वेतन आयोगांतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन ५०,००० असल्यास त्याला २.० ने गुणले जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १,००,००० रुपये इतके होईल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता हे सर्व या नव्या मूळ वेतनाच्या आधारे मिळेल. कृष्णमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे पुनरावलोकनदेखील साधारणपणे त्याच फिटमेंट फॅक्टरनुसार केले जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याला सध्या ३०,००० रुपये निवृत्ती वेतन मिळत असेल, तर २.० फिटमेंट फॅक्टरनुसार त्याची मूळ वेतन ६०,००० रुपयांपर्यंत वाढू शकते.
