Lost Submerged civilization Found India: पुरातत्त्वीय शोध अनेकदा दीर्घकालीन संशोधनास कारणीभूत ठरतात. परंतु, भारतीय अभ्यासकांनी खंबातच्या आखातात बुडालेल्या एका शहराचा शोध लावला असून त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोधामुळे सुमारे ९,००० वर्षांपूर्वीच्या एका हरवलेल्या संस्कृतीविषयी मोठा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय उपखंड आणि त्याच्या आसपासचा प्रदेश

प्राचीन भारतातील आणि विद्यमान पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश अनेक ऐतिहासिक रहस्यांनी भरलेला आहे. त्यापैकी एक रहस्य २००० च्या दशकाच्या सुरुवातीला समोर आलं. भारताच्या वायव्य किनाऱ्यावर असलेल्या खंबातच्या आखातात खोल समुद्रात उत्खनन करण्यात आलं. २००२ साली बीबीसीने “The Lost City That Could Rewrite History” या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला होता आणि या पाण्याखालच्या मोहिमेतील काही प्राथमिक निष्कर्ष जगासमोर आणले. भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी (NIOT) संस्थेच्या संशोधकांनी समुद्रसपाटीखाली ३६ मीटर खोलीवर प्राचीन रचना उघडकीस आणल्या.

या संशोधनात हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी अवशेषांसह मातीची भांडी आणि इतर वस्तू सापडल्या, त्यांचा कालावधी सुमारे ९,००० वर्षांपूर्वीचा आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे हडप्पा संस्कृतीच्या खूप आधी भारतातच संघटित समाजरचना अस्तित्वात होती, हे स्पष्ट झालं आणि यामुळे प्राचीन समाजविकासाच्या विद्यमान सिद्धांतांना आव्हान मिळालं.

एक विशाल बुडालेलं शहर

  • NIOTच्या संशोधकांना केवळ काही विखुरलेल्या संरचना नव्हे, तर अनेक चौरस किलोमीटरमध्ये विस्तारलेलं एक संपूर्ण शहर सापडलं.
  • हे शहर ८ किलोमीटर लांब आणि सुमारे ३ किलोमीटर रुंद आहे. त्यांच्या उपकरणांद्वारे वापरण्यात आलेल्या सोनार तंत्रज्ञानामुळे समुद्रतळाचे स्पष्ट चित्र मिळाले.
  • शिवाय, सापडलेल्या वस्तू आणि मानवी सांगाड्यांचे अवशेष यामुळे हे एक बुडालेलं शहर असण्याचा सिद्धांत अधिक मजबूत झाला.
  • परंतु, या पुरातत्त्वीय वस्तूंचं कालमापन (dating) करणं तज्ज्ञांसाठी मोठं आव्हान ठरलं.
  • इ.स.पू. ७००० च्या सुमारास भारतातील या प्रदेशात एक संपन्न समाज अस्तित्वात होता, हे सिद्ध झाल्यानं पारंपरिक पुरातत्त्वीय कालरेषेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
  • बहुतांश विद्वानांचा विश्वास आहे की, भारतीय उपखंडातील पहिली संघटित नागरी संस्कृती हडप्पा येथे विकसित झाली आणि ती सुमारे इ.स.पू. २६०० च्या सुमारास बहरात आली.
  • मात्र, ग्रॅहम हॅनकॉकसारखे ब्रिटिश लेखक असं म्हणतात की, एक प्राचीन आणि प्रगत संस्कृती काही मोठ्या भूगर्भीय किंवा हवामानविषयक संकटामुळे नामशेष झाली असावी. मात्र Indy100 या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, हॅनकॉक यांचा वादग्रस्त स्वभाव आणि तर्कहीन मते यामुळे ही कल्पना इतिहासात एकाच वेळी आकर्षक पण अस्वस्थ करणारी ठरते.

विरोधी सिद्धांत आणि गूढ स्पष्टीकरण

  • पाण्याखालच्या या रचनांचा भौगोलिक ठावठिकाणा स्पष्ट आहे, परंतु त्या तिथे का आणि कशा आल्या, हे शोधणे अधिक गुंतागुंतीचं आहे.
  • एक मत असं मांडलं जातं की, हिमयुग संपल्यानंतर तापमान वाढलं, तेव्हा समुद्राची पातळी हळूहळू वाढू लागली आणि खंबातच्या आखाताचा भाग बुडून गेला.
  • वाढत्या पर्जन्यवृष्टीमुळे नद्यांचं प्रवाहमानही वाढलं आणि या सर्व नैसर्गिक प्रक्रियांमुळे ती भूमी हळूहळू पाण्याखाली गेली.
  • या सिद्धांतामुळे कुमारीकांदम या प्राचीन, पौराणिक भूभागाची आठवण होते. या भूभागाचं वर्णन भारत, मादागास्कर आणि ऑस्ट्रेलिया यांना जोडणाऱ्या भूसेतूप्रमाणे केलं जातं.
  • मृतदेह आणि वस्तू नदीच्या प्रवाहातून आखातात आले असावेत, असंही काहींचं म्हणणं आहे, म्हणून तिथं ९,००० वर्षांपूर्वीच्या वस्तू सापडल्या असाव्यात.
  • मात्र, सापडलेल्या संरचना मात्र मानवी निर्मित असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
  • काही पुरातत्त्वज्ञांचे मत आहे की सोनार डेटाचा अर्थ लावण्यात चूक झाली असावी, तर इतरांचं म्हणणं आहे की कार्बन-१४ कालमापनात झालेल्या त्रुटींमुळे निष्कर्षांमध्ये गडबड झाली असावी. मात्र, अजूनही अभ्यासाकांमध्ये एकमत नाही.
  • तज्ज्ञ अजूनही या प्राचीन बुडालेल्या शहराचं अस्तित्व निश्चित करण्यासाठी संशोधन करत आहेत. अद्याप हाती आलेले पुरावे, ज्ञात असलेल्या नागरी संस्कृतींपेक्षाही खूप आधी ही संस्कृती अस्तित्वात होती हेच दर्शवतात. गेल्या दोन दशकांपासून संशोधन सुरू असलं तरी, हे रहस्य अद्याप सुटलेलं नाही.
  • एकूणच भारतीय समुद्रकिनाऱ्यांवर झालेल्या पाण्याखालच्या पुरातत्त्वीय शोधांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात द्वारका आणि खंबातच्या उपसागरातील हरवलेलं शहर हे दोन स्वतंत्र संशोधनप्रकल्प विशेष महत्त्वाचे आहेत. दोन्ही ठिकाणी पुरातत्त्वीय अवशेष सापडले असले तरी, हे एकाच शहराचे अवशेष आहेत, असा गैरसमज अनेकदा होतो. पण प्रत्यक्षात हे दोन भिन्न ठिकाणांवरील, वेगवेगळ्या काळातील पुरावे आहेत.

खंबातचं हरवलेलं शहर (Gulf of Khambhat)

  • स्थान: दक्षिण गुजरातजवळ, खंबातचं आखात (Gulf of Khambhat)
  • संशोधक संस्था: National Institute of Ocean Technology (NIOT), चेन्नई
  • कालखंड: सुमारे ९,००० वर्षांपूर्वीचे (म्हणजेच इ.स.पू. ७००० च्या आसपासचे पुरावे)

वैशिष्ट्ये:

  • सोनार डेटा, मानवी सांगाडे, मातीची भांडी, आणि सुनियोजित रचना
  • हडप्पा संस्कृतीच्या आधी एक प्रगत नागरी व्यवस्था होती, असा अंदाज
  • कोणत्याही पुराणातील विशिष्ट शहराशी थेट संबंध नाही

द्वारका (Dwarka)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • स्थान: पश्चिम गुजरातमधील ओखाजवळचं बेट द्वारका आणि आसपासचा किनारा
  • संशोधक संस्था: Archaeological Survey of India (ASI) – Marine Archaeology Unit
  • प्रमुख संशोधक: डॉ. एस. आर. राव
  • कालावधी: अंदाजे इ.स.पू. १५००–१०००

वैशिष्ट्ये:

  • पाण्याखाली शहरसदृश अवशेष, शिलालेख, भिंती, नाणं इत्यादी
  • महाभारत, श्रीमद्भागवत इ. ग्रंथांतील कृष्णाच्या द्वारकेशी संबंधित मानले जाते
  • धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे अधिक प्रसिद्ध

खंबातच्या आखातातील या रहस्यमय शोधाने केवळ भारताचाच नाही, तर संपूर्ण जगाच्या पुरातत्त्वीय दृष्टिकोनाला हादरा दिला आहे. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या नागरी व्यवस्थेचे अस्तित्व सिद्ध झाल्यास, इतिहासाचे पारंपरिक तक्ते पुन्हा लिहावे लागतील. अजूनही संशोधन सुरू असून, या शहराचे स्वरूप, त्याचे रहिवासी, त्यांचा सांस्कृतिक ठसा आणि त्याच्या नष्ट होण्यामागील कारणे याविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.