A.R. Rahman copyright case Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी संगीतकार ए. आर. रहमान यांचं अपील मंजूर केलं. यापूर्वी एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने (Single-Judge Bench) त्यांना पोन्नियिन सेल्वन-२ (PS-2) या चित्रपटातील एका गाण्याबाबत कथित कॉपीराइट उल्लंघनासाठी २ कोटी रुपये भरण्याचे आणि गाण्याचे क्रेडिट बदलण्याचे निर्देश दिले होते. रहमान आणि दोन निर्मितीसंस्था मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शन्स यांच्यावर २०२३ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त ध्रुपद गायक उस्ताद फैयाज वासिफुद्दीन डागर यांनी दावा दाखल केला होता.
वासिफुद्दीन यांनी असा आरोप केला होता की, रहमान यांच्या ‘वीरा राजा वीरा’ या गाण्याची रचना त्यांचे वडिल आणि काका म्हणजेच नामवंत ध्रुपद गायक दिवंगत उस्ताद नासिर फैयाजुद्दीन आणि उस्ताद नासिर जाहिरुद्दीन डागर (ज्यांना ज्युनियर डागर ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं) यांनी सादर केलेल्या ‘शिव स्तुती’ प्रमाणेच आहे. ‘वीरा राजा वीरा’ या गाण्यासाठी शिवस्तुती प्रमाणेच गीताचा मूळ ढाँचा, रचना आणि सादरीकरण शैली वापरली गेली आहे.
शिव स्तुती आणि रहमान यांचं गाणं खरंच सारखं आहे का?
ध्रुपद संगीतातील शिव स्तुती ही रचना अनेक कार्यक्रमांच्या अखेरीस सादर केली जाते. तिचं वेगळेपण म्हणजे तालात वाढत जाणारी गती आणि स्वरांच्या टोकाला पोहोचणारं प्रभावी क्रेशेंडो, जे ध्रुपदाच्या गंभीर व चिंतनशील स्वरूपाला ठळक विरोधाभास देतं. रहमान यांच्या वीरा राजा वीरा या गाण्याची धून खरंच शिव स्तुतीशी मिळतीजुळती आहे, मात्र त्यात वापरलेला वाद्यमेळ पूर्णपणे वेगळा आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे?
न्यायमूर्ती सी. हरि शंकर आणि ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की, ‘ज्युनियर डागर ब्रदर्स यांना ‘शिव स्तुती’चे सादरकर्ते मानता येईल, परंतु ते तिचे मूळ संगीतकार किंवा रचनाकार ठरत नाहीत. न्यायालयाने स्पष्ट केलं की, भारतीय शास्त्रीय संगीतात रचना ही परंपरेने पिढ्यान्पिढ्या तोंडीच पुढे जाते, तिच्या औपचारिक नोंदी किंवा स्वरलेखन क्वचितच केले जातात. अशा वेळी जर सादरकर्त्यांनाच मूळ रचनाकार मानलं, तर कोणताही गायक जुनी रचना सादर करून ती प्रथमच रेकॉर्ड आणि प्रकाशित करताच स्वतःच्या नावाने मालकी हक्क सांगू शकेल. त्यामुळे प्रत्यक्षात सार्वजनिक क्षेत्रातील आणि कॉपीराइट संरक्षण नसलेल्या रचनांनाही चुकीनं खाजगी मालकी मिळण्याचा धोका निर्माण होईल.
संगीताचं लिखित स्वरलेखन ही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताची संकल्पना आहे. मोझार्ट, बाख आणि बिथोव्हन यांनी स्वतःच्या रचना लिहून ठेवल्या होत्या.
न्यायालयाने म्हटलेलं योग्यच आहे की, भारतीय संगीत परंपरेत मौखिक परंपरेला प्राधान्य देण्यात आलं आहे आणि संगीताच्या मालकीहक्काबाबतचा त्यांचा दृष्टिकोन हा कायद्यातील संकल्पनेशी (लेखनाद्वारे मालकी निश्चित करणे) सुसंगत आहे. पण, संगीत अभ्यासक आणि रसिकांसाठी या कथेत अजून बरेच काही आहे.
वासिफुद्दीन यांनी असा दावा केला आहे की, रात्रीच्या प्रहरी ‘आडाना’ रागातली ही रचना त्यांचे काका उस्ताद जाहिरुद्दीन डागर यांनी रचलेली होती आणि १९७८ साली अॅमस्टरडॅममध्ये तिचं रेकॉर्डिंग झालं होतं. सध्या वासिफुद्दीन यांच्या ताब्यात असलेल्या जाहिरुद्दीन यांच्या डायरीत शिव स्तुती लिहिलेली आहे. भारतीय रचनांचं स्वरलेखन अनेकदा तयार झाल्यानंतर लिहून ठेवलं जात नसे. अनेक वेळा धून आधी मनात रचली जात असे आणि त्यानंतर त्या धुनेला साजेसे बोल बसवले जात. जाहिरुद्दीन यांच्या डायरीत शिव स्तुतीचे बोल लिहिलेले आहेत, मात्र तिचं स्वरलेखन नाही.
ध्रुपद आणि इतर अनेक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत प्रकारांमध्ये नेहमीच धून किंवा मूळ रचनेलाच केंद्रस्थानी मानलं गेलं आहे, तर बोल दुय्यम मानले गेले आहेत. या प्रकरणातही धून आधी तयार झाली असावी आणि त्यानंतर ‘शिव स्तुती’ त्या धुनेला अनुरूप वाटल्यामुळे ती त्यात बसवली गेली असावी, अशी शक्यता आहे. या रचनेचं सादरीकरण करणारे कलाकार, जसे की गुंडेचा बंधू किंवा उदय भवाळकर यांनीसुद्धा ही रचना ज्युनियर डागर ब्रदर्स यांचीच असल्याचे मान्य केले आहे.
ध्रुपद म्हणजे काय?
ध्रुपद (अर्थ: ‘संरचित’) हा राग सादरीकरणाचा एक प्राचीन प्रकार आहे, ज्यामध्ये निश्चित चौकट, रचना आणि तालाचं कठोर पालन केलं जातं. हा प्रकार गायला जातो किंवा ‘रुद्रवीणे’वर वाजवला जातो, त्याबरोबर पखवाज आणि तानपुऱ्याची साथ असते. आज अस्तित्वात असलेल्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रकारांमध्ये ध्रुपद हा सर्वांत जुना मानला जातो.
गुंतागुंतीचं व्याकरण आणि सखोल सौंदर्यामुळे ध्रुपदला उपासनेचं रूप दिलं गेलं आहे. यात गाणं हे दैवतेला अर्पण केलं जातं. ध्रुपदातील बहुतांश रचना या हिंदू भक्तिपर कवितांमधून, विशेषतः भक्ती चळवळीच्या काळातल्या काव्यसाहित्यातून घेतल्या गेल्या आहेत. ख्याल किंवा ठुमरीच्या तुलनेत ध्रुपद हा अधिक शिस्तबद्ध आणि कठोर चौकटीत बांधलेला प्रकार आहे. ख्याल किंवा ठुमरीमध्ये ताल-ध्वनीरचनेत बदल, आविष्कार आणि तत्काळ रचनांना मोठी मोकळीक असते. परंतु ध्रुपद न लोकधर्मी असतो, ना शृंगारी; तसेच त्यात ख्यालमध्ये आढळणाऱ्या ताना- सरगम यांचाही वापरही केला जात नाही.
आज फ्रान्स आणि जर्मनीसारख्या युरोपीय देशांत ध्रुपदच्या मैफिली नियमितपणे रंगतात, तर भारतात या प्रकाराचा श्रोतृवर्ग तुलनेने मर्यादित आहे. मात्र, युरोपमध्ये ध्रुपदला ‘डीप लिसनिंग प्रॅक्टिस’ म्हणजेच गहन श्रवण साधना म्हणून मान दिला जातो. १९६०च्या दशकापासून पुढे डागर घराण्याच्या युरोप दौऱ्यामुळे आणि तेथील संगीत कंपन्यांनी केलेल्या ध्रुपदाच्या रेकॉर्डिंग्जमुळे या परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक लोकप्रियता प्राप्त झाली आहे.
१९८३ मध्ये द न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापलेल्या ‘Dagars of Delhi, A Tradition Lives On’ या लेखात नामवंत संगीत समीक्षक जॉन पॅरेल्स यांनी लिहिलं होतं, “दिल्लीच्या डागर घराण्याच्या तुलनेत बाख आणि त्यांचं घराणं म्हणजे जणू क्षणभराची ठिणगीच ठरते.”
डागर घराणं हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक मानाचं घराणं आहे, ज्यांची परंपरा थेट स्वामी हरिदास (तानसेनांचे गुरु) यांच्यापर्यंत पोहोचते. काही मोजक्या घराण्यांपैकी डागर घराण्यानं पिढ्यान्पिढ्या ध्रुपद परंपरेचं जतन आणि संवर्धन केलं आहे. त्यांच्या योगदानाचं महत्त्व इतकं मोठं आहे की, ध्रुपदाच्या त्यांच्या खास सादरीकरण शैलीला डागरवाणी म्हणून वेगळं नाव मिळालं.
या परंपरेचा उगम बाबू गोपाल दास पांडे यांच्यापर्यंत जातो. ते उस्ताद बेहराम खान यांचे वडील होते आणि ते डागर घराण्याचे प्रवर्तक मानले जातात. आख्यायिकेनुसार, अठराव्या शतकात दिल्लीतील मुघल सम्राट मुहम्मद शाह रंगीला यांनी एकदा गोपाल दास यांना पान दिलं. त्यांनी ते स्वीकारल्यामुळे त्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत केलं गेलं. परिणामी गोपाल दास यांनी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ही परंपरा मुस्लिम डागर घराण्याने पुढे चालवली. त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये डागर घराण्याने मुस्लीम असूनही सरस्वतीची उपासना केली आणि वेदांमधील ऋचा गायल्या.
बेहराम खान (गोपाल दास यांचे पुत्र) जयपूरमध्ये स्थायिक झाले आणि अप्रतिम प्रतिभावंत गायक म्हणून त्यांची ख्याती पसरली. पुढे त्यांनी आपल्या भावाच्या नातवंडांना अल्लाबंदे आणि जाकिरुद्दीन खान यांना संगीताची दीक्षा दिली. ही जोडी लवकरच आपल्या काळातील आघाडीचे ध्रुपद गायक म्हणून प्रसिद्ध झाली. अल्लाबंदे यांना अलवर दरबारात, तर जाकिरुद्दीन यांना उदयपूर दरबारात नोकरी मिळाली.
उस्ताद जाहिरुद्दीन डागर आणि उस्ताद फैयाजुद्दीन डागर हे अल्लाबंदे यांचे नातू आणि प्रतिभावंत तसेच दूरदर्शी गायक नासिरुद्दीन खान यांचे पुत्र होते. दुर्दैवाने, नासिरुद्दीन खान यांचं निधन त्यांच्या कारकिर्दीत सर्वोच्च पदावर असताना झालं. त्यांच्या मोठ्या मुलांनी नासिर मुईनुद्दीन डागर आणि अमिनुद्दीन डागर यांनी एकत्रितपणे गायन सुरू केलं आणि ते सीनियर डागर ब्रदर्स म्हणून मान्यता पावले.