राजेश खन्ना यांच्यासोबत एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री लैला खान ऊर्फ रेशमा पटेल हीची वयाच्या ३३ व्या वर्षी हत्या झाली. तिच्यासह कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह इगतपुरी येथील फार्म हाऊसवर सापडल्यामुळे २०११मध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तिचा सावत्र पिता परवेझ टाक याला पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणात १३ वर्षांनंतर टाक याला मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण, हत्येमागील हेतू काय होता, आदींचा हा आढावा.
प्रकरण काय?
लैला खान आणि तिची आई शेलिना तसेच भावंडे अजमिना, इम्रान आणि झारा तसेच भाची रेशमा असे सहा जणांचे कुटुंब ओशिवरा येथील फ्लॅटमध्ये परवेझ टाक याच्यासह राहत होते. शेलिनाशी त्याचा निकाह झाला होता. पहिला पती नादिर पटेल याच्यामुळेच शेलिना कपड्यांच्या व्यवसायात स्थिरावली होती. त्यातूनच तिने दुकान, दोन फ्लॅट तसेच इगतपुरी येते बंगला घेतला. १९९२ मध्ये पहिल्या पतीशी घटस्फोट झाला. पहिल्या पतीपासून तिला लैलासह चार अपत्ये होती. नंतर तिने आसिफ शेख याच्याशी विवाह केला. त्यांच्यातही घटस्फोट झाला. त्यानंतर ती टाकसोबत याच फ्लॅटमध्ये राहत होती. या सर्वांना दोन गाड्यांतून टाकने ८ फेब्रुवारी २०११ मध्ये इगतपुरीतील फार्म हाऊसवर नेले. तेथील पहारेकरी शकीर वाणी याच्या मदतीने या सहाही जणांची टाकने हत्या केली. त्यांचे मृतदेह फार्म हाऊसच्या मागील भागात पुरले. त्यानंतर तो जम्मू-काश्मीरमध्ये निघून गेला. लैला खान व कुटुंबीय जम्मू-काश्मीरला गेल्याचे त्याने सांगितले. परंतु प्रत्यक्षात दोन-तीन आठवड्यानंतरही हे कुटुंबीय न परतल्याने नादिर पटेल यास संशय आला आणि त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अंधेरी युनिटचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी तपास सुरू केला आणि हे हत्याकांड उघड झाले. सहाही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि परवेझ टाक याचा शोध सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांमुळे तो ताब्यात मिळाला. त्याच्यावर गेले सहा वर्षे खटला सुरू होता. अखेरीस या खटल्याचा निकाल जाहीर झाला असून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा >>>जगभरात थैमान घालणारी झुरळांची ही प्रजाती आली कुठून? नव्या संशोधनात खुलासा
लैला खान कोण?
राजेश खन्ना यांच्यासोबत ‘वफा’ या चित्रपटात काम केल्यामुळे अभिनेत्री म्हणून लैला खानला अल्पावधीतच थोडी-फार प्रसिद्धी मिळाली होती. मात्र या प्रसिद्धीच्या जोरावर तिला काही बी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यावेळी ‘आयटम साँग’ ही कल्पना भारतीय चित्रपटात फारशी रुजली नव्हती त्याकाळात तिला तशा काही भूमिका मिळाल्या. २००२ मध्ये कन्नड चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या लैला खान हिने सहकलाकार म्हणून काही भूमिका केल्या. मात्र त्यानंतर तिला फारसे चित्रपट मिळाले नाही. त्यामुळे मॉडेलिंग वा अन्य मार्गाने पैसा कमावत होती. परवेझ हा तिच्या आईसोबत राहत असला तरी त्याच्याकडून लैला तसेच इतर भावंडे कामे करून घेत होती. मात्र शेलिनाने परवेझशी निकाह केल्यानंतरही त्यांच्या वागण्यात बदल झालेला नव्हता.
परवेझ टाकचा संबंध कसा?
परवेझ हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील. शेलिना ही दिल्लीत एका राजकीय पक्षाचे काम करीत होती. त्यावेळी परवेझशी तिची ओळख झाली. परवेझला चित्रपटात काम पाहिजे होते. लैला खान राजेश खन्नासोबत चित्रपटात झळकल्यामुळे शेलिनाने आपल्या खूप ओळखी आहेत, असे सांगत परवेझला चित्रपटात काम हवे असेल तर साडेतीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तो पैसे घेऊन ओशिवऱ्यातील शेलिनाच्या घरी आला. सुरुवातीला त्याला नोकराप्रमाणे कामे करावी लागत होती. त्यातच तो दलाली करू लागला. त्यातून त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. शेलिनाकडे राहत असताना त्याने तिचा पती नादिरचे छायाचित्र वापरून ओळखपत्र बनवले आणि क्रेडिट कार्ड घेतले. त्यातूनही त्याने मोठी आर्थिक फसवणूक केली. या काळात शेलिना इगतपुरीत बंगला बांधत होती. ते काम परवेझला पाहण्यास सांगितले. या काळात शेलिना तसेच लैला आणि तिची भावंडे इगतपुरीला येत असत. परंतु परवेझला नोकरासारखी कामे करायला सांगितली जात होती. त्यातून तो अस्वस्थ होता. मात्र शेलिनाशी निकाह केल्यानंतर आपण आता या मुलांचे बाप झालो आहोत. त्यामुळे आपण सांगू ते त्यांनी ऐकले पाहिजे, असे तो सांगत असे. मात्र लैलासह तिची भावंडे ऐकत नाही हे पाहून तो दादागिरीने वागू लागला. नंतर तेही त्याला घाबरू लागले.
फाशीची शिक्षा का?
परवेझ टाक याने अत्यंत क्रूरपणे सहा जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. हत्येमागील खरा हेतू अद्यापही कळू शकलेला नाही. लैला खान तसेच तिच्या बहिणींना दुबई येथे पाठवून चांगले पैसे मिळतील, यासाठी तो सतत सक्ती करत होता. मात्र लैलासह बहिणी ऐकत नव्हत्या. त्यातूनच परवेझने या सहाही जणांची हत्या केली, असा युक्तिवाद पोलिसांनी केला होता. सुरुवातीला याच मुद्द्यावरून शेलिना आणि परवेझ यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच त्याने शेलिनाला इगतपुरीच्या बंगल्यातील हॉलमध्ये ठार मारले. त्याच वेळी सर्व कुटुंबीय धावत खाली आले. त्यानंतर एकेकाला पकडून त्यांची हत्या करण्यात आली. या सहाही जणांना मारण्याचा कट आधीच आखण्यात आला होता. त्यासाठी बंगल्याच्या मागे मोठा खड्डाही खणण्यात आला होता. हा खड्डा शौचालय उभारण्यासाठी असल्याचा दावाही त्यावेळी परवेझने केला होता. परंतु याच खड्ड्यात त्यांनी सहाही मृतदेह पुरले, असा पोलिसांचा दावा होता. त्याचे हे कृत्य अंत्यत हीन, घृणास्पद आणि क्रौर्याचे आहे, असे स्पष्ट करीत सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र या हत्येमागील पोलिसांनी नमूद केलेला हेतू मान्य केला नाही. त्यामुळे ही हत्या नेमकी कशामुळे झाली, हे गुलदस्त्यात राहिले आहे.
तपास अधिकाऱ्यांना काय वाटते?
या गुन्ह्याचे प्रमुख तपास अधिकारी दीपक फटांगरे यांच्या मते, या सहाही जणांच्या हत्येमागे आर्थिक कारणच आहे. शेलिना तसेच लैला खानसह तिच्या भावंडांची संपत्ती हडप करण्याचा त्याचा हेतू असू शकतो. त्यामुळेच त्याने जेसीबी मागवून खड्डा खणून घेतला. खड्ड्यात मृतदेह पुरल्यावर कोणालाही शंका येणार नाही, असे त्याला वाटले होते. शेलिनाचे सर्व कुटुंबीय दिल्लीला वा जम्मू-काश्मीरला गेल्याचे भासविण्याचा त्याचा डाव होता. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. शेलिनाच्या पहिल्या पतीमुळेच हे हत्याकांड उघड होऊ शकले, हे मात्र निश्चित.
nishant.sarvankar@expressindia.com