अनिश पाटील

सट्टेबाजीसाठी मोबाइल प्रयोजन (ॲप्लिकेशन) पुरवणाऱ्या सट्टेबाज सुशील अशोक अग्रवाल ऊर्फ सुशील भाईंदरला गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. सट्टेबाज आता पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. मोबाइल ॲप्लिकेशनसह संपर्काचे नवे तंत्र आणि व्यवहारांसाठी बिटकॉइनसारख्या कूटचलनाचाही वापर होऊ लागला आहे.

सुशील भाईंदरच्या अटकेची पार्श्वभूमी काय?

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड आणि पाकिस्तान संघातील अंतिम सामन्यावेळी दादर येथील एका हॉटेलमध्ये काहीजण सट्टेबाजी करीत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत छापा टाकला आणि फ्रान्सिस डायस आणि इम्रान खान या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे रोख १२,५०० रुपये, चार मोबाइल संच व इतर साहित्य आढळले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आणि पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मेश शिवदसानी, गौरश शिवदसानी आणि धर्मेश वोरा या तिघांना अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवर मितेश फुरिया ऊर्फ जयंती मालाड व उमेद सत्रा यांनाही २१ नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आली. तपासामध्ये सट्टेबाजांना सुशील भाईंदरने ‘लोटसबुक२४७’ हे मोबाइल ॲप उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्यालाही अटक झाली.

सट्टेबाजीची पाळेमुळे किती खोल रुजली आहेत?

केवळ क्रिकेटच नाही, तर प्रत्येक खेळात सट्टेबाजी चालते. बहुतांश देशांत सट्टेबाजी अवैध असल्यामुळे त्यामध्ये संघटित गुंडांच्या टोळ्या गुंतलेल्या असतात. भारतात दाऊद टोळी फार पूर्वीपासून सट्टेबाजीत सक्रिय आहे. सट्टेबाजी ज्याप्रमाणे सामन्याच्या निकालावर चालते, त्याप्रमाणे फॅन्सी सट्टाही प्रचलित आहे. फॅन्सी सट्ट्यामध्ये एका षटकात किती धावा काढल्या जातील, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या किती धावा होतील, किती फलंदाज बाद होतील, अशा कोणत्याही गोष्टीवर सट्टा लावला जातो.

मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा संबंध काय?

सामन्याच्या निकालावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने हवा तसा निकाल लागण्यासाठी ‘मॅच फिक्सिंग’ सुरू झाले. पण त्यासाठी कर्णधारासह अन्य खेळाडूंना सामील करून घेणे आवश्यक झाले. फॅन्सी सट्ट्यामुळे ‘स्पॉट फिक्सिंग’ बोकाळले. एखाद्या संघाचा निकाल निश्चित करण्यापेक्षा एखाद्या षटकात किती धावा होतील, संघ नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करणार की गोलंदाजी यावर नियंत्रण मिळवणे सोपे होऊ लागले. पाकिस्तानी क्रिकेट पंच असद रौफ यांच्यामार्फत सट्टेबाजांना क्रिकेट सामन्यातील अंतर्गत माहिती मिळवल्याचा आरोपही झाला होता.

पूर्वीच्या काळी सट्टेबाजी कशी चालायची?

नव्वदच्या दशकात सट्टेबाजी पूर्णपणे विश्वासावर व धाकावर चालायची. त्या काळी भारतात क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा लागत असे. सट्टेबाजाला दूरध्वनी सट्टा लावला जायचा. त्याची नोंद वहीत केली जायची. सामना संपल्यावर वहीतील व्यवहारांनुसार सट्ट्यात हरलेल्या व्यक्तीकडून पैसे घेतले जायचे व जिंकणाऱ्यांना दिले जायचे. संपूर्ण रक्कम वसूल करण्याची हमी गुंड घ्यायचे. त्यांची टक्केवारीही ठरलेली असायची. दाऊद टोळी यामध्ये सक्रिय होती.

सट्टेबाजीमध्ये आधुनिकतेचा शिरकाव कसा झाला?

एखाद्या खेळावर अथवा घटनेवर सट्टा खुला करण्यापूर्वी सट्टेबाज व त्यांचे हस्तक टोपणनावाने नोंदी करतात. खातेवही, दैनंदिनी किंवा लॅपटॉपमध्ये टोपणनावांनीच नोंद केली जाते. पोलिसांनी अटक केलेला ‘बिग बॉस’ फेम विंदू दारासिंग ‘जॅक’ या टोपणनावाने सट्टा खेळत होता, असा आरोप आहे. दिल्लीतील बुकी टिंकू अर्जुन नावाने सट्टा लावायचा. आता मोबाइल अथवा वेब ॲप्लिकेशनचा वापर केला जाऊ लागला आहे. ईमेलप्रमाणे सट्टेबाज आणि त्यांच्या हस्तकांना लॉग इन आयडी व पासवर्ड दिला जातो. पूर्वी छोट्या वहीत हारजीतीचा हिशेब ठेवला जायचा आणि हवालामार्फत पैशाची देवाण-घेवाण केली जायची. आता नोंदवहीऐवजी लॅपटॉपचा वापर होतो. हवालाची जागा बिटकॉइनसारख्या कूटचलनाने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे परदेशात बसूनही मुंबईतील व्यक्तीकडून सट्टा घेता येत असल्यामुळे सट्टेबाजांना पकडणे अधिक कठीण झाले आहे.

अटक टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो?

एखाद्या बँकेत अथवा संस्थेत सदस्यत्व मिळवण्यासाठी जुन्या सभासदांची सही लागते, त्याचप्रमाणे सट्टेबाजारात प्रथम डाव खेळताना जुने हस्तक सट्टेबाजाशी ओळख करून दिली जाते. हा जुना हस्तक नव्या हस्तकांसाठी हमीदार म्हणूनही काम करतो. नव्या हस्तकाने पैसे दिले नाहीत तर ते जुन्याकडून वसूल केले जातात. पण या बेकायदा धंद्यात पैशाची देवाण-घेवाण अगदी ‘इमानदारी’ने केली जाते. नुकतीच अटक झालेल्या आरोपींकडून सट्ट्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड ठेवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच आता हमीदाराची जागा ऑनलाइन रेकॉर्डने घेतली आहे. संपर्क साधण्यासाठी विविध ॲप्लिकेशन, व्हीओआयपी आदी यंत्रणांचा वापर केला जातो. सट्टेबाज चालत्या गाडीत अथवा बोटीमध्ये बसूनही सट्टा लावत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणे पोलिसांना कठीण झाले आहे.