Air India Plane Crash Possible Reason : गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा गुरुवारी (तारीख १२ जून) दुपारी अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात भीषण अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन निघालेलं हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच नागरी वस्तीत कोसळलं. या दुर्घटनेत २४१ प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे, तर केवळ एक प्रवासी अपघातातून बचावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, २६५ जणांचा बळी घेणारा अपघात नेमका घडला कसा, याविषयीची संदिग्धता अजूनही कायम आहे. मात्र, विमान वाहतूक तज्ज्ञांनी या अपघाताची काही संभाव्य कारणे सांगितली आहेत, ती नेमकी कोणती? ते जाणून घेऊ…
एअर इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच ते मेघानी नगरमधील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी वसाहतीवर कोसळलं. या दुर्घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये विमान कोसळत असतानाची दृश्य कैद झाली आहेत.
अहमदाबादमधील विमान अपघाताचा व्हिडिओ समोर
सीएनएनच्या अहवालानुसार, विमान उंच आकाशातून जमिनीवर कोसळत असताना त्याच्या मागच्या बाजूने अधिक झुकाव घेतला होता. वैमानिकाने ‘एटीसीसी’बरोबर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याआधी काही सेकंदात विमान आकाशातून खाली आलं आणि जवळच्या एका नागरी वस्तीत कोसळलं. काही व्हिडीओंमध्ये विमान कोसळल्यानंतर भीषण स्फोट झाल्याचं दिसून येतं. “अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांसह नागरी वस्तीतील मृतांची संख्याही अद्याप खात्रीशीरपणे सांगता येणार नाही”, असं गुजरात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी विधी चौधरी यांनी ‘Reuters’ ला सांगितलं. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा : Plane Crash : उड्डाण किंवा लँडिंग करतानाच विमान का कोसळतं? काय आहेत यामागची कारणं?
विमान अपघातात एकमेव प्रवाशाचा वाचला जीव
या भीषण अपघातामधून चमत्कारिकरीत्या बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर साधारण पुढच्या ३० सेकंदांमध्येच खूप मोठा आवाज यायला लागला आणि विमान कोसळलं. या सगळ्या घडामोडी खूपच वेगाने घडल्या.” ३९ वर्षीय विश्वास कुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक असून ते दीव येथे आपल्या भावाबरोबर आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील 11A या सीटवर ते बसले होते.

विमान अपघाताची संभाव्य कारणं कोणती?
- तज्ज्ञांनी सांगितले की, व्हिडीओमध्ये विमान हवेत स्थिर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, हे पाहता इंजिनची ताकद कमी पडली असावी.
- काहींच्या मते, इंधनातील अशुद्धता किंवा अडथळ्यांमुळे विमानातील दोन्ही इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, त्यामुळे ते काही सेकंदातच जमिनीवर कोसळलं.
- बीबीसीशी बोलताना एका वरिष्ठ वैमानिकाने सांगितले की, अशुद्ध इंधनमुळे विमानाच्या इंजिनमधील ‘फ्युएल मीटरिंग सिस्टीम’मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे कदाचित विमानाचं इंजिन बंद पडलं असेल.
- स्काय न्यूजशी बोलताना डॉ. जेसन नाईट (University of Portsmouth) यांनी सांगितले की, विमानाचा ओव्हरवेट किंवा इंधन जास्त असण्याचा प्रश्न येत नाही. पण, पक्षी धडकेमुळे जर दोन्ही इंजिन बंद पडली असतील तर अशी दुर्घटना घडू शकते.
- इतक्या कमी उंचीवरून इंजिन बंद पडल्यास वैमानिकाला आपत्कालीन लँडिंग करण्याची संधीदेखील मिळत नाही, असे डॉ. जेसन नाईट यांनी स्पष्ट केले.
- बीबीसीशी बोलताना तिन्ही तज्ज्ञांनी सांगितले की, उड्डाण करताना विमानाच्या फ्लॅप्स म्हणजेच पंखांच्या मागील बाजूला असलेले हलणारे भाग पूर्णपणे उघडले नसावेत, त्यामुळे ते अस्थिर होऊन खाली कोसळले.
- इंजिनमध्ये पुरेशी पॉवर निर्माण होत नसल्यामुळे इंजिन फेल झाले आणि हा अपघात झाला असावा, अशी शक्यता हवाई उड्डाणतज्ज्ञ अमोल यादव वर्तवली आहे.
- ब्रिटीश एअरवेजचे माजी वैमानिक अलस्टेयर रोसेनशाइन यांनी स्काय न्यूजला सांगितले की, विमानाचे लँडिंग गिअर खाली दिसत आहे आणि उड्डाणासाठी फ्लॅप्स योग्यरित्या वापरले गेले नसावेत, त्यामुळे विमान हवेत स्थिर राहू शकले नाही.
- या दुर्घटनेचा तपास करताना हवामानाचाही विचार केला जाईल. मात्र, तज्ज्ञांनी स्पष्ट केले की अहमदाबादमध्ये अपघाताच्या वेळी हवामान उड्डाणासाठी योग्य होते, त्यामुळे हा प्रमुख घटक असल्याची शक्यता कमी आहे.
विमान अपघाताचे गूढ ब्लॅक बॉक्समधून उलगडणार?
या भीषण दुर्घटनेच्या चौकशीसाठी भारतीय विमान अपघात तपास संस्था (AAIB) ही तपास यंत्रणा जबाबदारी पार पाडणार आहे. यामध्ये यूके आणि यूएस येथील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. मात्र, अशा अपघाताचा तपास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॅक बॉक्स संदर्भातील चर्चा सुरू झाली आहे. या अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी तपासकर्ते ब्लॅक बॉक्स तसेच विमानाच्या अवशेषाची तपासणी करणार आहेत, ज्यामध्ये विमानाचे तांत्रिक व्यवहार, इंजिन स्थिती, फ्लॅप्स, लँडिंग गियर यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती मिळू शकते.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? तो कसा असतो?
कोणत्याही विमानाचा, हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळवणं ही प्राथमिकता असते. या बॉक्समधील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) कॉकपिटमधील रेडिओ ट्रान्समिशन आणि वैमानिकांमधील संभाषण आणि इंजिनचा आवाज रेकॉर्ड करतो. तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उंची, एअरस्पीड, फ्लाइट हेडिंग, ऑटोपायलट स्थिती अशा ८० हून अधिक विविध प्रकारच्या माहितींची नोंद करतो. व्यावसायिक आणि प्रवासी विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स अनिवार्य आहेत.
ब्लॅक बॉक्समुळे उलगडलं होतं विमान अपघाताचं गूढ
विमानावर कायदेशीर हक्क प्रस्थापित करणं हा त्यामागील हेतू नसून अपघाताची कारणं जाणून घेणं आणि भविष्यात असे अपघात होऊ नये हा असतो. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी १३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली होती. पावसामुळे हा ब्लॅक बॉक्स सापडण्यात अडथळे येत होते. मात्र, तो सापडल्याने या भीषण दुर्घटनेचं मुख्य कारण समजण्यास त्यावेळी मदत झाली होती.