माहिती – तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात मागील काही काळापासून मोठी उलथापालथ सुरू आहे. तंत्रज्ञानातील कृत्रिम प्रज्ञेसह (एआय) इतर नवप्रवाहांमुळे कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर मोठा परिणाम होत आहे. त्याच वेळी या नवप्रवाहांचा स्वीकार वाढल्याने अनेक कामे कमी मनुष्यबळात होऊ लागली आहेत. यामुळे आयटीतील अनेक कर्मचाऱ्यांची गरज भासेनाशी झाली आहे. यातूनच आयटी क्षेत्रात कर्मचारीकपातीचे वारे सुरू आहे. या सर्व गदारोळात या क्षेत्रातील बेंचिंग हा शब्द परवलीचा बनला आहे. या बेंचिंग धोरणात अनेक कंपन्या बदल करीत असून, हे धोरण कर्मचाऱ्यांच्या छातीत धडकी बनविणारे बनले आहे.
बेंचिंग म्हणजे काय?
आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना निर्धारित प्रकल्प अथवा काम दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांना प्रकल्प दिले जात नाहीत, त्यांना बेंच केले, असे म्हटले जाते. प्रत्येक कंपनीनिहाय वर्षभरातील या बेंचिंगचा कालावधी कमी-जास्त असतो. कंपनीच्या कामात वाढ अथवा घट झाल्यास मनुष्यबळ व्यवस्थापनाची पद्धत म्हणून याचा आयटी क्षेत्रात वापर केला जातो. कंपनीच्या कामात वाढ झाल्यास बेंचिंगवरील अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून कंपनी काम कमी वेळेत पूर्ण करू शकते.
सद्य:स्थिती काय?
आयटी क्षेत्रातील बेंचिंग कालावधी सातत्याने कमी होत आहे. हा कालावधी आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये सरासरी ४५ ते ६० दिवस होता. आता हा सरासरी कालावधी ३५ ते ४५ दिवसांवर आला आहे. आयटी क्षेत्रातील देशातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी बेंचिंगचा वार्षिक कालावधी ३५ दिवसांसाठी मर्यादित केला आहे. कर्मचाऱ्याला वर्षाला २२५ दिवस प्रकल्पावर काम करणे बंधनकारक असेल. त्यामुळे ३५ दिवसांपेक्षा जास्त बेंचिंग कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामगिरीत सुधारणा कार्यक्रम करण्यास सांगितले जाते. त्यात या कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करावी लागतात. अखेरचे पाऊल म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाऊ शकते.
बेंचिंगमुळे धोका का?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त आयात शुल्काच्या पावलामुळे जागतिक पातळीवर अनिश्चततेचे वारे निर्माण झाले आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलातील वाढ एक अंकी झाली आहे. जागतिक पातळीवर आर्थिक घसरणीचे वारे सुरू आहे. याचा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे. यामुळे कंपन्यांच्या व्यवसायात घट होऊन अनेक कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञेसह इतर नवतंत्रज्ञानाचा स्वीकार कंपन्यांकडून वाढला आहे. यामुळे अनेक कामे या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काळात आणि कमी मनुष्यबळात होऊ लागली आहेत. यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची समस्या निर्माण होत आहे. यामुळे मागील काही वर्षांत आयटीतील बेंचिंगवरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता आयटी कंपन्यांनी बेंचिंगचा कालावधी कमी केला. याचबरोबर अतिरिक्त मनुष्यबळाची कपात सुरू केली. त्यातही बेंचिंगवरील कर्मचाऱ्यांच्या कपातीचे प्रमाण अधिक आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांची कपात?
आयटी क्षेत्रात मागील काही वर्षांत मध्यम ते वरिष्ठ फळीतील कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कपात केली जात आहे. त्याच वेळी नवीन मनुष्यबळाची भरती सुरू आहे. या नवीन उमेदवारांमुळे कंपन्यांचा वेतनावरील खर्च कमी होत आहे. याचबरोबर कंपन्यांचे ग्राहकही नवीन उमेदवारांचे कमी वेतन आणि देयकाचा दर यामुळे त्यांना पसंती देत आहेत. नवतंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या कामकाजात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार करून ते आत्मसात करण्याची लवचीकता मध्यम ते वरिष्ठ फळीतील कर्मचारी दाखवत नाहीत. याच वेळी नवीन कर्मचारी लवचीकता दाखवून कंपनीच्या धोरणासह बदलांचा जलद स्वीकार करतात. सध्या आयटी कंपन्यांकडून बेंचिंगवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे बेंचिंग म्हणजे नोकरीवरील टांगती तलवार अशी स्थिती आता कर्मचाऱ्यांसाठी बनली आहे.
संघटनांची भूमिका काय?
टीसीएसच्या नवीन बेंचिंग धोरणाला ‘ऑल इंडिया आयटी आणि आयटीईएस एम्प्लॉईज असोसिएशन’ या कर्मचारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. कंपनीचे हे पाऊल कर्मचारीविरोधी असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना २२५ दिवस प्रकल्पांवर काम न केल्यास कामावरून काढून टाकले जाऊ शकते. एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवल्यानंतर त्याला काम देण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. त्याचे कामाचे दिवस कमी करून कंपनी त्याला अशा प्रकारे कामावरून काढू शकत नाही. कंपनीने कर्मचारीविरोधी धोरणातून बेंचिंगमध्ये बदल केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचारी कपात डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे, असा दावा संघटनेने केला आहे.
sanjay.jadhav@expressindia.com