Air India Ahmedabad Crash एअर इंडियाच्या विमानाला १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातामागील कारणांचा प्राथमिक अहवाल भारताच्या एअर अॅक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) ११ जुलैच्या मध्यरात्री प्रसिद्ध केला. यात दोन्ही इंजिन्सना होणारा इंधनपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे ती बंद पडली. त्यामुळे उड्डाण घेत असताना आवश्यक ती ताकद (थ्रस्ट) विमानाला मिळालीच नाही आणि मिनिटभरातच ते कोसळले, अशी माहिती समोर येत आहे.
उड्डाण घेताक्षणी इंधनपुरवठा खंडित
एअर इंडिया फ्लाइट एआय १७१ हे विमान १२ जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनकडे निघाले. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल (८६०० तासांचा उड्डाण अनुभव) आणि सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर (११०० तासांचा उड्डाण अनुभव) हे अनुभवी वैमानिक हे विमान उडवणार होते. सहवैमानिक कुंदर यांच्याकडे विमानाचे सारथ्य (कमांड) होते. कॅप्टन सभरवाल यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी होती. विमानाने जमिनीवरून उड्डाण घेतल्याक्षणी दोन्ही इंजिनच्या फ्युएल स्विचमध्ये रनʼ स्थितीमधून
कट-ऑफʼ असा अनाकलनीय बदल झाला. सहसा असे होत नाही. मुद्दामहून दोन्ही इंजिन बंद केल्याखेरीज असे शक्य नाही. अचानक इंधनपुरवठा बंद झाल्यामुळे आणीबाणीची स्थिती उद्भवली.
कॉकपीटमध्ये गोंधळ नि हतबल वैमानिक
‘इंधन पुरवठा बंद का केलास?ʼ असा प्रश्न एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकास विचारल्याचे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमधील संभाषणातून स्पष्ट झाले. आपण असे काही केले नसल्याचे दुसरा वैमानिक उत्तरला. नंतर त्वरित इंधन स्विच ऑन करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळेच एका वैमानिकाने `मे-डेʼ असा निर्वाणीचा इशारा दिला. पण विमान लगेचच कोसळले.
दुर्मिळात दुर्मिळ?
वैमानिकांच्या मूलभूत आज्ञावलीमध्ये (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) टेक-ऑफच्या वेळी दोन्ही फ्युएल स्विचेस रन पोझिशनमध्ये आणणे ही प्रक्रिया अंतर्भूत असते. विमानाने लँडिंग केल्यानंतर ते ईप्सित बे मध्ये किंवा गेटसमोर स्थिरावल्यानंतरच इंधन पुरवठा खंडित करणारे कट-ऑफ स्विच दाबले जाते. ऐन उड्डाणाच्या प्रक्रियेच्या वेळी हे कधीही होत नाही. शिवाय ऑन आणि ऑफ करण्याच्या प्रक्रियेत लॉक ही स्थिती असते. त्यामुळे चुकून हात लागून इंजिन स्विच-ऑन किंवा स्विच-ऑफ (विमानांच्या परिभाषेत रन किंवा कट-ऑफ) होणे संभवत नाही.
बोईंगची चूक की…?
बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारातील विमानाला झालेला हा पहिलाच भीषण अपघात ठरला. पण याही आधी या प्रकारातील विमानात काही त्रुटी आढळून येत होत्या. यापूर्वी २०१३ आणि २०२४मध्ये विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना आढळून आल्या. यात २०१३मध्ये जानेवारी महिन्यात ७ ते १६ तारखांदरम्यान अनेक विमानांच्या लिथियम-आयन विद्युत संचांमध्ये बिघाड होत असल्याचे आढळून आले. सात जानेवारी रोजी जपान एअरलाइन्सच्या विमानात ते बॉस्टन विमानतळाअंतर्गत धावपट्टीवर उभे असताना विद्युत विभागात एका संचाला आग लागली. दोनच दिवसांनी युनायटेड एअरलाइन्सच्या एका विमानात याच स्वरूपाचा बिघाड नोंदवण्यात आला. १६ जानेवारी रोजी जपानच्या निप्पॉन एइरलाइन्सच्या विमानात विद्युत विभागामध्ये धूर येत असल्याचे आढळल्यामुळे ते तातडीने नजीकच्या विमानतळावर उतरवावे लागले. जपान एअरलाइन्स आणि निप्पॉन एअरलाइन्सने त्यांच्याकडील बोइंग-७८७ विमानांची उड्डाणे स्थगित केली. पाठोपाठ अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने चौकशीचे आदेश देत सर्वच बोइंग-७८७ विमानांची उड्डाणे स्थगित केली. अशा प्रकारे एखाद्या कंपनीच्या विशिष्ट विमानांची सर्व उड्डाणे स्थगित होण्याची ती ३४ वर्षांतील पहिलीच घटना होती. बोइंग कंपनीच्या अभियंत्यांनी विमाने उड्डाणसिद्ध करताना पुरेशी तांत्रिक खबरदारी घेतली नाही, तसेच फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननेही उड्डाण प्रमाणपत्र देताना काही बाबी तपासल्या नाहीत, असा निष्कर्ष चौकशी अमेरिकी काँग्रेससमोरील सुनावणीनंतर काढण्यात आला होता.
११ मार्च २०२४ रोजी चिलीच्या एका विमान कंपनीचे विमान ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून चिलीची राजधानी सँटियागो येथे निघाले. दोन तासांनी न्यूझीलंडजवळ हे विमान अचानक ३०० फूट खाली आले. विमानातील वस्तू आणि व्यक्ती इतस्ततः फेकल्या गेल्या. या घटनेत ५० जण जखमी झाले.
एअर इंडियाची जबाबदारी
एअर इंडिया या एके काळच्या सरकारी विमान कंपनीची मालकी आता टाटा समूहाकडे आहे. एअर इंडियाला गेल्या ४० वर्षांतील हा सर्वाधिक भीषण अपघात आहे. इंधन पुरवठा सुनिश्चित करणारी स्विचेस सदोष नव्हती ना, हे पाहण्याची जबाबदारी एअर इंडियाच्या देखभाल विभागाची होती. त्यात ते कमी पडले का, याची चौकशी पुढील टप्प्यात होईल.