Akash Prime missile test भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आकाश प्राईमची यशस्वी चाचणी केली आहे. या नवीन शस्त्राची लडाख येथे चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी १५ हजार फूट उंचीवर घेण्यात आली. या संरक्षणप्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रू राष्ट्रांच्या चिंतेत भर पडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) निर्मित आकाशने ऑपरेशन सिंदूरच्यादरम्यान चीनच्या विमानांना आणि तुर्कीच्या ड्रोनच्या हल्ल्यांना निष्प्रभ केले होते. आता त्याच आकाश संरक्षण प्रणालीची ही सुधारित आवृत्ती आहे. ही मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी लढाऊ क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते. आकाश प्राइम म्हणजे काय? त्याची यशस्वी चाचणी महत्त्वाची का आहे? त्याविषयी जाणून घेऊयात?
आकाश प्राइमची यशस्वी चाचणी भारतासाठी किती महत्त्वाची?
- आकाश प्राइम ही भारतीय सैन्यासाठी आकाश शस्त्र प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.
- आकाश प्राइम ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत थंड हवामानात आणि १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर चालण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- अपग्रेड केलेल्या प्रणालीमध्ये स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरचादेखील समावेश आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरमुळे, आकाश प्राइमची अचूकता वाढते. त्याशिवाय शत्रूच्या क्षेपणास्त्रांशी लढण्याची क्षमतादेखील वाढते.
- त्यात सुधारित ग्राउंड सिस्टीम आणि रडारदेखील बसविण्यात आले आहेत, जे ३० किलोमीटरच्या अंतर्गत सिग्नल देतात.

भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताकडून शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचीही यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, त्यामुळे या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारताने गुरुवारी ओडिशामधील चांदीपूर येथील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रावरून पृथ्वी-२ आणि अग्नि-१ या दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या लागोपाठ चाचण्या घेतल्या. संरक्षण मंत्रालयाने दोन्ही प्रणालींच्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली. हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.
आर्मी एअर डिफेन्स आणि डीआरडीओने बुधवारी १५,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर ही चाचणी घेतली आहे. ही चाचणी भारतीय लष्कर आणि उद्योग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी जलद गतीने जाणारे दोन हवाई लक्ष्य यशस्वीरित्या नष्ट केले. “भारताने १६ जुलै रोजी लडाखमध्ये दोन हवाई हाय-स्पीड मानवरहित लक्ष्ये यशस्वीरित्या नष्ट केली आणि चाचणी यशस्वी झाली. आकाश प्राइम भारतीय सैन्यासाठी आकाश शस्त्र प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ही यशस्वी चाचणी महत्त्वाची का आहे?
चीन आणि पाकिस्तान दोघांसाठीही हा एक संदेश आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने आकाश प्रणालीचा वापर करून चिनी लढाऊ विमाने आणि तुर्की ड्रोनने केलेले हवाई हल्ले हाणून पाडले होते. दोन्ही देशांशी सीमा संघर्ष असलेल्या भारतासाठी आकाश प्रणालीची रचना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आर्मी एअर डिफेन्स आता आकाश प्राइम प्रणालीच्या दोन रेजिमेंट उभारत आहे, जी भारताच्या आकाश संरक्षण प्रणालीतील तिसरी आणि चौथी रेजिमेंट असेल. त्यांना सीमा आणि पर्वतीय भागात तैनात केले जाईल. आकाश प्राइमप्रमाणेच भारत इतरही संरक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देत आहे.
पृथ्वी-२ आणि अग्नि-१ची यशस्वी चाचणी
भारत आकाश एनजी (नेक्स्ट-जनरेशन) प्रकारावरही काम करत आहे. गुरुवारी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) ने ओडिशाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून या दोन्ही शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली. “शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असणाऱ्या पृथ्वी-२ आणि अग्नि-१ ची १७ जुलै २०२५ रोजी ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली,” असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. “या चाचण्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या,” असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ३५० किलोमीटर आहे आणि हे क्षेपणास्त्र ५०० किलोग्रॅमपर्यंतचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. अग्नि-१ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० ते ९०० किलोमीटर आहे आणि ते १००० किलोग्रॅमचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचा वेळ ताशी सुमारे ९००० किलोमीटर आहे. पृथ्वी-२ आणि अग्नि-१ ही दोन्ही क्षेपणास्त्रे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतील.
हवाई संरक्षणाच्या बाबतीत भारताच्या प्रभावी शस्त्रास्त्रांमध्ये होणारा विकास यातून दिसून येतो. संघर्षादरम्यान आकाश प्रणालीची प्रभावी कामगिरी पाहून ब्राझील, फिलीपिन्स आणि इजिप्तसह काही देशांनीही त्यात रस दर्शवला आहे. आर्मेनियाने यापूर्वी आकाश शस्त्र प्रणाली खरेदी केली होती. भारताच्या संरक्षण निर्यातीत गेल्या दशकात ३० पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ६८६ कोटी रुपये असणारी संरक्षण निर्यात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २१,०८३ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. संरक्षण निर्यात २००४-१४ च्या दशकात ४,३१२ कोटी रुपयांवरून २०१४-२४ च्या दशकात ८८,३१९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.