अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांत धोकादायक व कुप्रसिद्ध गुन्हेगारांना ठेवण्यात आलेले अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कॅलिफोर्नियातील अल्काट्राझ बेटावरील हे तुरुंग ६० वर्षांपूर्वी १९६३ मध्ये बंद करण्यात आले होते.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट ट्रुथ सोशलवर अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील सर्वांत क्रूर व हिंसक गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे,आम्हाला आमच्या देशात बेकायदेशीररित्या आलेल्या गुन्हेगारांना तसंच हिंसक वृत्तीच्या गुंडांना आणि लोकांना हानी पोहोचवणाऱ्यांना देशाबाहेर टाकता येईल”, असे ट्रम्प यांनी लिहिले आहे. “अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय हा कायदा, सुव्यवस्था व न्यायाचे प्रतीक ठरेल”, असेही ते म्हणाले. “मी न्याय विभाग, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटीसह प्रिझन ब्युरोला मोठ्या प्रमाणात वाढवलेले आणि पुनर्बांधणी केलेले अल्काट्राझ पुन्हा उघडण्याचे निर्देश देत आहे”, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
अल्काट्राझ तुरुंग
अल्काट्राझ तुरुंगाला ‘अल्काट्राझ फेडरल पेनिटेंशियरी’ असेही म्हणतात. हा २० व्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन करण्यात आलेला एक सुरक्षित लष्करी तुरुंग होता. १८५० मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष मिलर्ड फिलमोर यांनी अल्काट्राझ बेट लष्करी वापरासाठी दिले होते. सिव्हिल वॉरदरम्यान त्याचे लष्करी तुरुंगात रूपांतर करण्यात आले. १९३० च्या दशकात जास्त खर्च आणि कठोर परिस्थितीमुळे हा तुरुंग अमेरिकन न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. तेव्हापासून या तुरुंगात संघराज्य प्रणालीतील (Federal system convicts) दोषींना बंदिस्त करण्यास सुरुवात झाली. या तुरुंगाला तीव्र, शक्तिशाली समुद्राच्या प्रवाहांनी वेढलेले असल्याने तुरुंगातून पळून जाण्याची शक्यता असलेल्या कुख्यात कैद्यांना येथे ठेवले जाते.
अल्काट्राझचे कुप्रसिद्ध कैदी आणि पळून जाण्याचे प्रयत्न
अल्काट्राझच्या सर्वांत कुप्रसिद्ध कैद्यांमध्ये गुंड अल कॅपॉन व अपहरणकर्ता, बँक दरोडेखोर जॉर्ज मशीन गन केली यांचा समावेश होता. अल्विन क्रिपी कार्पिस व रॉबर्ट स्ट्राउड हेदेखील अल्काट्राझ तुरुंगातील सर्वांत कुप्रसिद्ध कैद्यांपैकी होते.
आव्हानात्मक स्थान असूनही तुरुंगातून १४ वेळा पळून जाण्याचे प्रयत्न झाले. एकूण ३६ कैद्यांनी येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक कैद्यांना पकडण्यात आले; तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. १९६२ मध्ये फ्रँक मॉरिस आणि अँग्लिन बंधूंनी असाच एक पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झालेत की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आले.
अल्काट्राझ तुरुंग का बंद करण्यात आला?
मार्च १९६३ मध्ये जास्त कामकाज खर्च आणि बिघडणाऱ्या पायाभूत सुविधा यांमुळे अल्काट्राझ तुरुंग बंद करण्यात आला. काही अहवालांनुसार तुरुंगाचा खर्च प्रतिकैदी प्रति दिवस १० डॉलर्स इतका होता आणि इतर तुरुंगांमध्ये तो तीन डॉलर्स होता. तुरुंगातील ढासळलेल्या पायाभूत सुविधा आणि महागड्या रसदा यांमुळे देखभालीचा खर्चही वाढला.
सध्या अल्काट्राझ हे राष्ट्रीय उद्यान सेवेद्वारे व्यवस्थापित केलेले एक पर्यटनस्थळ आहे आणि ते गोल्डन गेट राष्ट्रीय मनोरंजन क्षेत्राचा एक भाग आहे. तुरुंगाचा आतील दौरा, ऐतिहासिक प्रदर्शने व १९६९ मध्ये घडलेल्या मूळ अमेरिकन व्यवसायाबद्दल माहिती देणारे म्हणून ते ओळखले जाते.
ट्रम्प यांना पुन्हा का सुरू करायचाय अल्काट्राझ तुरुंग?
अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ते म्हणाले, “अमेरिका पुन्हा एकदा पूर्वीसारखे गंभीर राष्ट्र होईल आणि सर्वांत धोकादायक गुन्हेगारांना ते दूर ठेवेल. बऱ्याच कालावधीपासून अमेरिका क्रूर, हिंसक व पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांमुळे त्रस्त आहे. समाजातील विकृत घटक- जे कधीही दुःख, त्रास यांशिवाय काहीही देणार नाहीत. भूतकाळात जेव्हा अमेरिका अधिक गंभीररीत्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याबाबत काम करीत होती, तेव्हा आपण सर्वांत धोकादायक गुन्हेगारांना बंदिस्त करण्यास आणि त्यांना दूर ठेवण्यात कसलाही विचार केला नाही. हे असेच व्हायला हवे.”