– अभय नरहर जोशी

‘वॅग्नेर ग्रुप’ या रशियातील खासगी सैन्यदलाचे संस्थापक प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे रशियाच्या तपास संस्थेने रविवारी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अपयशी बंड पुकारलेल्या प्रिगोझिन यांचा अंत झाल्यानंतर आता त्यांच्या ‘वॅग्नेर’चे भवितव्य कसे असेल या विषयी…

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

वॅग्नेर समूहाची स्थापना कधी?

येवगेनी व्हिक्टरोविच प्रिगोझिन यांनी २०१४ मध्ये वॅग्नेर समूहाची स्थापना केली. २०१४ साली युक्रेनमधून क्रिमिया प्रांताचा लचका तोडताना रशियाला मदत केल्यानंतर सर्वप्रथम हे खासगी लष्कर प्रकाशझोतात आले. ‘वॅग्नेर’ची स्थापना कोणी केली आणि त्याचे नेतृत्व कोण करत आहे हे २०२२ पर्यंत स्पष्ट नव्हते. दिमित्री अटकिन आणि प्रिगोझिन या दोघांना त्याचे संस्थापक आणि नेते मानले जात होते. कालांतराने प्रिगोझिन यांनी या समूहाची स्थापना केल्याचा दावा केला. नंतर त्यांना ‘वॅग्नेर’प्रमुख मानले जाऊ लागले. काही स्रोतांनुसार प्रिगोझिन हे ‘वॅग्नेर’चे मालक-अर्थपुरवठादार होते, तर अटकिन त्याचे लष्करप्रमुख होते.

‘वॅग्नर’चे उद्दिष्ट काय होते?

भरपूर पैसे मोजणाऱ्या कुणालाही लष्करी सेवा पुरविणे, हे ‘वॅग्नेर’चे मुख्य काम. मात्र सीरिया, लिबिया, सुदान आदी देशांमध्ये खनिज आणि ऊर्जा स्रोतांची लूट ‘वॅग्नेर’ने रशियासाठी केल्याचा आरोप झाला आहे. मध्य आफ्रिकेचे विरोधी पक्षनेते मार्टिन झिगुले म्हणाले, की ‘वॅग्नेर समूह’ कोणताही कर न भरता सोन्याचे खाणकाम, लाकूडतोड आदी उद्योगांत सक्रिय आहे. ‘वॅग्नेर’वर क्रूरपणे बळाचा वापर करून लुटलेल्या खनिज संपत्तीतून नफा कमावल्याचा आरोप आहे. ‘वॅग्नेर’चे अस्तित्व सीरियापासून आफ्रिकी देशांपर्यंत आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूपूर्वी काही आठवडे त्यांची एक ध्वनिचित्रफीत प्रसृत झाली. त्यात त्यांनी ‘वॅग्नेर’ रशियाला सर्व खंडांत बलशाली बनवत असून, आफ्रिकेला अधिक मुक्त बनवत असल्याचा दावा केला होता.

‘वॅग्नेर’बाबत उलटसुलट चर्चा काय?

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या सत्तेला लष्करी बंडाद्वारे आव्हान दिल्यानंतर दोन महिन्यांतच प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाला. पुतिन यांना आव्हान दिल्याने त्यांची हत्या झाली, की ही खरोखर दुर्घटना होती, याबाबत वास्तव समोर न येता फक्त चर्चाच सुरू राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र आता ‘वॅग्नेर’च्या भवितव्याबाबतही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. विश्लेषकांच्या अंदाजानुसार ज्या आफ्रिकी देशांत ‘वॅग्नेर’ने ‘अल कायदा’ आणि ‘इस्लामिक स्टेट’सारख्या गटांविरुद्ध सुरक्षा प्रदान केली आहे, अशा देशांत रशियाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी रशिया ‘वॅग्नेर’च्या लष्कराला नवे नेतृत्व प्रदान करेल. तथापि, काही जणांच्या मतानुसार प्रिगोझिनने वैयक्तिक संबंधांतून ‘वॅग्नेर’वर मोठा प्रभाव निर्माण केला होता. त्यामुळे प्रिगोझिनला त्वरित पर्याय देणे रशियासाठी आव्हान ठरेल. ब्रिटन संरक्षण मंत्रालयाच्या अंदाजानुसार प्रिगोझिन यांच्यानंतर समूह अस्थिर होईल. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मात्र ‘वॅग्नेर’च्या भवितव्याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.

रशियासाठी ‘वॅग्नेर’चे महत्त्व काय?

आफ्रिकेत पाश्चिमात्य राष्ट्रांचा प्रभाव कमी करून आपला प्रभाव वाढवण्यावर रशियाचा भर आहे. त्या दृष्टीने ‘वॅग्नेर’ने मध्य आफ्रिकेमध्ये राष्ट्रीय सार्वमतास मदत करून तेथील अध्यक्षांना बळ दिले. मालीच्या सैन्याला सशस्त्र बंडखोरांशी लढण्यास ‘वॅग्नेर’ मदत करत आहे. बुर्किना फासोमध्ये त्यांचे संशयास्पद अस्तित्व आहे. नायजरमध्ये लष्करी उठावानंतर सत्तापालट करणाऱ्या लष्करी सरकारलाही ‘वॅग्नेर’ची मदत हवी असून, त्यांचा संपर्क झाला आहे. ‘वॅग्नेर’ने महत्त्वाची भूमिका बजावलेल्या देशांचे सहकार्य मिळवण्याचे रशियाचे प्रयत्न आहेत. युक्रेन युद्धानंतर रशिया आपल्याला पाठिंबा देणारे नवे सहकारी शोधत आहे. या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाला पाठिंबा देण्यासाठी आफ्रिकेतील ५४ देशांची संख्या उपयोगी ठरू शकते.

‘वॅग्नेर’वर इतर देशांचा आक्षेप का?

संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी सांगितले की ‘वॅग्नेर’च्या लष्कराने आफ्रिकेत अस्थैर्य निर्माण केले आहे. ‘वॅग्नेर’च्या अस्तित्वाला विरोध करण्याचे आवाहन आम्ही आफ्रिकी देशांना करत आहोत. पश्चिम आफ्रिकेतील पाश्चात्त्य देशांचे अस्तित्व कमजोर करण्यासाठी ‘वॅग्नेर’चा वापर रशिया करेल, अशी भीती अमेरिकी तज्ज्ञांना वाटते. नायजरच्या नागरिकांच्या मते प्रिगोझिननंतरही रशिया आपल्या देशात प्रभाव वाढवणे थांबवणार नाही. मालीतील टिंबक्टूचे रहिवासी युबा खलिफा यांच्या मते प्रिगोझिननंतरही ‘वॅग्नेर’चे मालीतील अस्तित्व संपणार नाही. कारण ही जागा दुसरा नेता घेईल. ‘ह्युमन राइट्स वॉच’ संस्थेच्या दाव्यानुसार मालीचे सैन्य ‘वॅग्नेर’च्या भाडोत्री सैन्यासह हत्याकांड, लूटमार, अपहरणांत सामील आहे. माली राष्ट्रीय प्रतिनिधीगृहाचे माजी सभापती अली नौहौम डायलो यांनी ‘वॅग्नेर’ने आमच्या देशात नरसंहार केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : प्रिगोझिन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब; वैद्यकीय चाचणीच्या आधारे रशियाच्या तपास समितीचा दुजोरा

बेलारूसमधील ‘वॅग्नेर’च्या सैनिकांचे काय होणार?

जूनमधील बंड अल्पजीवी ठरल्यानंतर प्रिगोझिन-पुतिन यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार ‘वॅग्नेर’ने बेलारूसला जाण्याचे मान्य केले. बेलारूसमध्ये रशियन सैन्यावर नजर ठेवणाऱ्या ‘बेलारूसी हाजुन’ या गटाने सांगितले, की उपग्रह छायाचित्रांनुसार बेलारूसमधील ‘वॅग्नेर’चे एक तृतीयांश तंबू हटल्याचे दिसत आहे. या सैनिकांनी पलायन केल्याची शक्यता आहे. परंतु बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को ‘वॅग्नेर’चे सुमारे दहा हजार सैन्य देशात राखण्यासाठी आग्रही आहेत. यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. बेलारूसच्या निर्वासित विरोधी नेत्या स्वियातलाना तिखानोव्स्काया यांनी प्रिगोझिननंतर बेलारूसमधील ‘वॅग्नेर’चे अस्तित्व संपवून बेलारूससह शेजारी देशांंचा संभाव्य धोका संपावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

abhay.joshi@expressindia.com