– अन्वय सावंत
भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला सलग दुसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि भारताचे ‘आयसीसी’ जेतेपदाचा दशकभरापासूनचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. धोनीनंतर विराट कोहलीने, तर कोहलीनंतर रोहित शर्माने नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र, या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्पर्धा जिंकता आली नाही. भारताच्या या अपयशामागे कारणे काय, याचा आढावा.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत कशी कामगिरी केली आहे?
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक या स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली, पण त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. २०१४ पासून भारताला ‘आयसीसी’च्या नऊपैकी चार स्पर्धांत उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले, तर चार स्पर्धांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०१४) : उपविजेते (कर्णधार – धोनी)
एकदिवसीय विश्वचषक (२०१५) : उपांत्य फेरी (कर्णधार – धोनी)
ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०१६) : उपांत्य फेरी (कर्णधार – धोनी)
चॅम्पियन्स करंडक (२०१७) : उपविजेते (कर्णधार – कोहली)
एकदिवसीय विश्वचषक (२०१९) : उपांत्य फेरी (कर्णधार – कोहली)
जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२१) : उपविजेते (कर्णधार – कोहली)
ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२१) : साखळी फेरी (कर्णधार – कोहली)
ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२२) : उपांत्य फेरी (कर्णधार – रोहित)
जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२३) : उपविजेते (कर्णधार – रोहित)
संघनिवडीतील चुका, दुखापतींचा कितपत फटका?
‘आयसीसी’च्या स्पर्धांसाठी संघनिवड करताना भारताने बरेचदा चुका केल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘डब्ल्यूटीसी’च्या दोन अंतिम लढतींमध्ये रविचंद्रन अश्विन चर्चेचा विषय ठरला. अश्विनची जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणना केली जाते. त्याने भारतासाठी ४७४ बळी मिळवले आहेत. तसेच तो फलंदाजीत योगदान देण्यातही सक्षम असून त्याच्या नावे पाच कसोटी शतके आहेत. मात्र, परदेशात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्याची वेळ येते, त्यावेळी अश्विनचे भारतीय संघातील स्थान प्रश्नांकितच असते. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ढगाळ वातावरण आणि पाऊस असूनही भारताने ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात अश्विनला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्याने दोन डावांत मिळून चार बळी मिळवले, पण त्याच्या गोलंदाजीला नेहमीची धार नव्हती. त्यामुळे यंदा अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण पाहून भारताने अश्विनला संघाबाहेर ठेवले. परंतु, पहिल्या दिवशी एका सत्रानंतर लख्ख सूर्यप्रकाश होता. तसेच अखेरच्या दोन दिवशी फिरकीपटूंना खेळपट्टीकडून काही प्रमाणात मदतही मिळाली. त्यामुळे अश्विनला संघात न घेण्याचा भारताचा निर्णय फसला आणि संघ व्यवस्थापनावर बरीच टीका झाली. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी निवड समितीने त्या वेळी लयीत असलेल्या अंबाती रायडूला १५ खेळाडूंच्या चमूतही स्थान दिले नव्हते. इंग्लंडमध्ये ही स्पर्धा झाल्याने निवड समितीने मध्यम गती गोलंदाजी करणारा अष्टपैलू विजय शंकरला रायडूऐवजी संधी दिली. मात्र, शंकरला फारसा प्रभाव पाडता आला नाही. तसेच त्याला दुखापतीमुळे स्पर्धेच्या मध्यातूनच माघार घ्यावी लागली. त्या स्पर्धेत अनुभवी सलामीवीर शिखर धवनही जायबंदी झाला होता. यंदा ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारताला जसप्रीत बुमरा आणि ऋषभ पंत यांची उणीव जाणवली. दुखापतींमुळे त्यांना या सामन्याला मुकावे लागले.
यंदा ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी पुरेसा सराव केलेला का?
भारताने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. मायदेशात झालेली ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. या मालिकेतील अखेरचा सामना १३ मार्चला संपला होता, तर ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्याला ७ जूनला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी जवळपास तीन महिने भारताने एकही कसोटी सामना खेळला नव्हता. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारतीय खेळाडू ‘आयपीएल’मध्ये व्यग्र होते. आपापले संघ ‘आयपीएल’मधून बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले. तर काही खेळाडू ‘आयपीएल’चा अंतिम सामना २९ मे रोजी झाल्यानंतर एक-दोन दिवसांनी इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यामुळे त्यांना एकत्रित सराव करण्यासाठी, इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एका आठवड्याचाही वेळ मिळाला नाही. याचा भारतीय संघाच्या कामगिरीवर नक्कीच विपरीत परिणाम झाला.
रोहितला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय चुकला का?
गेल्या वर्षी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद अचानक सोडल्यानंतर ‘बीसीसीआय’मधील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, असा खुलासा काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने केला. कोहलीने राजीनामा दिल्यानंतर गांगुली आणि ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांना कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी रोहितची मनधरणी करावी लागल्याची माहिती देण्यात आली. रोहितला आपले शरीर किती साथ देईल आणि आपण किती काळ कसोटी क्रिकेट खेळू याबाबत साशंकता आहे. रोहितने नेतृत्वाची धुरा सांभाळल्यापासून भारताने एकूण १० कसोटी सामने खेळले असून यापैकी तीन सामन्यांना तो मुकला आहे. ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात त्याच्या नेतृत्वात आक्रमकता दिसून आली नाही. पहिल्या डावात वेगवान गोलंदाज अपयशी ठरत असताना डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजी देण्याचा पर्याय रोहितकडे होता. मात्र, त्याने तसे केले नाही. त्याने स्वैर मारा करणाऱ्या उमेश यादवकडे सातत्याने चेंडू सोपवला. उमेश पहिल्या डावात एकही गडी बाद करू शकला नाही.
हेही वाचा : रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? रहाणेशिवाय ‘हे’ चार खेळाडू प्रबळ दावेदार
जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची पुढील संधी कधी?
भारताला या वर्षीच ‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार आहे, तेही मायदेशात. यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. भारताने २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद भूषवले होते आणि त्या वेळी भारताला जेतेपद मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.