निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करणे आणि या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या अशा दोन गंभीर प्रकरणात अटकेत असलेला चकमकफेम वादग्रस्त बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने पुन्हा एकदा माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा वकिलांना लिहिलेल्या पत्राद्वारे प्रदर्शित केली आहे. याच प्रकरणात वाझेचा साथीदार बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज विशेष न्यायालयापुढे प्रलंबित आहे. एकाच प्रकरणात दोन माफीचे साक्षीदार होऊ शकतात का, काय आहे याविषयीची तरतूद याचा हा आढावा….

माफीचा साक्षीदार म्हणजे काय?

फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये ‘माफीचा साक्षीदार’ अशा संज्ञेचा उल्लेख नाही. मात्र ही संज्ञा गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला लागू होते. फौजदारी प्रक्रिया संहितेतील ३०६ (१) या कलमानुसार गुन्ह्यातील प्रमुख आरोपीविरोधात साक्ष देण्याची अनुमती दिली जाते. याशिवाय भारतीय पुरावे कायद्यातील कलम १३३ मध्ये या साक्षीदाराबद्दल म्हटले आहे की, माफीच्या साक्षीदाराने (गुन्ह्यातील साथीदार) आरोपीविरुद्ध दिलेली साक्ष ही त्यासोबत असलेल्या विविध पुराव्यांशी मिळती जुळती नसली तरी अशा प्रकरणात झालेली शिक्षा ही बेकायदा ठरत नाही.

विश्लेषण : अटकपूर्व जामीन म्हणजे काय? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

कोणाला होता येते?

ज्यावेळी कुठलाही साक्षीपुरावा उपलब्ध नसतो तेव्हा त्याच गुन्ह्यातील आरोपीला माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी न्यायालय देते. गुन्ह्याची खरी माहिती न्यायालयापुढे मांडली जावी, अशी माफीच्या साक्षीदाराकडून अपेक्षा असते. (जोशी-अभ्यंकर खून खटल्यात माफीच्या साक्षीदारामुळेच आरोपींना शिक्षा होऊ शकली) माफीचा साक्षीदार झाल्यानंतर खटला संपेपर्यंत संबंधित आरोपीला न्यायालयीन कोठडीत (तुरुंगातच) राहावे लागते. माफीचा साक्षीदार होण्यास न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १६४कलमान्वये महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष नोंदविली जाते. ही साक्ष प्रमुख आरोपीसह ज्याने दिली त्याच्याविरुद्धही वापरण्याची मुभा असते. माफीचा साक्षीदार झाल्यामुळे फक्त संबंधित गुन्ह्यातून मुक्तता मिळते. त्याच्यावर अन्य गुन्ह्यांमध्ये खटला सुरू असेल तर मात्र त्याला त्यात सवलत मिळत नाही. माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाते. माफीचा साक्षीदार कोण होऊ शकतो, याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी दिलेल्या आदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

सुनील मानेचा संबंध काय?

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाच्या एका आदेशात न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी म्हटले आहे की, सर्व साक्षीदारांचे जबाब तपासल्यास सकृद्दर्शनी सुनील माने याचा मनसुख हिरेन यांच्या हत्याकटात सहभाग दिसतो. त्यामुळे दोषमुक्त करण्याचा अर्ज मान्य करता येणार नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, मनसुख हिरेन हत्या कटात सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि सुनील माने यांचा संबंध आहे. आता याच प्रकरणात माने याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे. अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन प्रकरणाची आपल्याला खडानखडा माहिती आहे, असे माने याचे म्हणणे आहे. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपले म्हणणे सादर केले आहे. आता माने याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता द्यायची किंवा नाही याचा निर्णय विशेष न्यायालय घेईल.

सचिन वाझेचा दावा काय ?

आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात वाझे यांनी म्हटलेआहे की, अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील संपूर्ण माहिती आपल्याला आहे. या प्रकरणात आपण बळीचा बकरा बनवलो गेलो आहोत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आपण विचारही करू शकत नाही. मनसुख हिरेन याला मी वगळता अन्य सर्वजण त्रास देत होते. हिरेनला ठार मारण्याचा आपला हेतू असल्याचा कुठलाही पुरावा नाही. या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा याचा जामीन नाकारताना उच्च न्यायालयानेही आपला या गुन्ह्याशी संबंध प्रस्थापित करणारा कुठलाही पुरावाआढळत नाही, असे म्हटले आहे. आपल्याला माफी दिली तर आपण अँटिलिया प्रकरणातील सर्व तपशील उघड करू. मात्र वाझे यांनी हा अर्ज न्यायालयात केलेला नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात वाझे हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माफीचे साक्षीदार आहेत. याच प्रकरणात त्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयातही अर्ज केला होता. त्यास संचालनालयाने मान्यता दिली आहे. मात्र अद्याप न्यायालयाने मंजुरीदिलेली नाही.

विश्लेषण : ‘तोशखाना प्रकरणा’मुळे इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय?

वाझे याच्या पत्राचे काय होणार?

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. तो माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांनी वकीलाला पत्र लिहिले असावे. सहआरोपी सुनील माने याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखविल्यानंतर सहानुभूती मिळविण्यासाठी वा माने याचा अर्ज नाकारला जावा, यासाठी वाझे याने असे पत्र लिहिले असावे, असे तपासयंत्रणांना वाटते. परंतु वाझे खरे बोलत आहे का, यावर विश्वास कसा ठेवायचा, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

कायदेतज्ज्ञांना काय वाटते?

फौजदारी गुन्ह्यात प्रमुख आरोपी माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही. सहआरोपी माफीचा साक्षीदार होऊ शकतो. दोन माफीचे साक्षीदार होऊ शकत नाही. मात्र असे दोन अर्ज आले तरी त्याची विश्वासार्हता न्यायालय तपासू शकते व निर्णय घेऊ शकते. कायदेतज्ज्ञ राजीव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपीचे कृत्य समोर यावे यासाठी सहआरोपीला माफीचा साक्षीदार करता येते. परंतु मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार झाला तर त्याच्यावरील आरोपी हा शिक्का पुसला जाईल. खटला संपल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर येईल. मात्र त्यामुळे माफीचा साक्षीदार बनविण्याच्या तरतुदीलाच हरताळ फासला जाईल. त्यामुळेसचिन वाझे जर मुख्य आरोपी असेल तर तो अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antilia bomb mansukh hiren death case sachin waze sunil mane print exp pmw
First published on: 17-03-2023 at 08:55 IST