अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १७चे अनावरण होत आहे. मात्र, त्यापूर्वीच आयफोन १७बद्दलची उत्कंठा ताणली गेली आहे. त्याबरोबरच नव्या आयफोनच्या किमतीकडेही जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर सादर होणाऱ्या आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. २०२०पासून ॲपलने आयफोनच्या मूळ मॉडेलची किंमत ८०० डॉलर इतकी ठेवली असून त्याची अतिप्रगत आवृत्तीची किंमत १२०० डॉलर इतकी जाहीर करण्यात येते. मात्र, ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे यात किमान ५० ते १०० डॉलरची वाढ होईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. तसे झाल्यास भारतातही आयफोन १७ आणि त्याच्या प्रगत आवृत्त्यांची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.

आयफोनची भाववाढ का?

नव्या आयफोनचे उत्पादन भारत, चीनमधूनच

भारतासह अन्य राष्ट्रांवरील आयातशुल्क वाढवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा दिला. त्याअंतर्गत ॲपलसह अन्य तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्यांना अमेरिकेतच संपूर्ण उत्पादन घेण्याचे आवाहनही केले. आयफोनची निर्मिती अमेरिकेतच व्हायला हवी, याचा ट्रम्प यांनी अनेकदा पुनरुच्चार केला आहे. मात्र, तूर्त आयफोनची निर्मिती भारत आणि चीनमध्येच होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी पुढील चार वर्षांत अमेरिकेत ५०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले होते. त्यात त्यांनी गेल्या महिन्यात आणखी १०० अब्ज डॉलरची भर टाकली. इतकेच नव्हे तर कूक यांनी ट्रम्प यांना २४ कॅरट सोन्याचा तळभाग असलेले एक शिल्पही भेट दिले. या ‘मनधरणी’नंतर ट्रम्प यांनी ॲपलच्या उत्पादनांवर अवाजवी आयातशुल्क लागू केलेले नाही. मात्र, तरीही आयफोनसह अन्य ॲपल उत्पादनांवर अमेरिका २५ टक्के आयातशुल्क लादते. त्यामुळे आयफोनच्या किमतीत वाढ होणे निश्चित मानले जात आहे.

‘एआय’चा किती अंतर्भाव?

सध्याच्या एकूण ट्रेंडकडे पाहता आयफोन १७ मध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा पुरेपूर अंतर्भाव असेल, असे मानले जात आहे. मात्र, आयफोन १६च्या बाबतीत आलेल्या अनुभवानंतर ॲपलने ‘एआय’बाबत भूमिकेत कितपत बदल केला आहे, हेही आज रात्री होणाऱ्या अनावरण सोहळ्यानंतर स्पष्ट होईल. आयफोन १६मधील ‘एआय’ वैशिष्ट्यांचा ॲपलने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे आयफोन १६बद्दल बाजारात उत्कंठाही निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात या वैशिष्ट्यांचे ‘अपडेट’ आयफोन १६मध्ये येण्यात अनेक अडचणी आल्या. त्यातही ‘सिरी’मध्ये ‘एआय’चा अंतर्भाव करण्याची प्रक्रिया तर ॲपलला लांबणीवर टाकावी लागली.

यंदा काय नवे?

नवीन आयफोनमध्ये ‘एआय’ केंद्रित अनेक वैशिष्ट्ये असतील. मात्र, त्याहीपेक्षा ॲपलचा भर नवीन आयफोनमधील कॅमेरा, बॅटरी, स्क्रीन या वैशिष्ट्यांबद्दल मांडणी करण्यावर असेल. त्यातही ‘आयफोन १७ एअर’ हा सर्वात कमी जाडीचा आयफोन यंदाचे खास वैशिष्ट्य असेल, असा अंदाज आहे. याखेरीज सर्वाधिक बॅटरी क्षमता असलेला ‘प्रो मॅक्स’हेदेखील आजच्या अनावरण सोहळ्याच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.