Zombie rabbits with black horns अमेरिकेतील साउथ डकोटा आणि कॉलोराडो राज्यांमधील ससे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. याचे कारण म्हणजे काही सशांच्या डोक्यातून शिंग किंवा विचित्र आकाराच्या गाठी दिसून आल्या आहेत, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि या सश्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे आणि विविध सिद्धांत मांडले आहेत. सश्यांचे छायाचित्र एखाद्या भयपटातील दृश्यासारखे वाटत असले तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या विचित्र वाढीमागे एक विषाणू कारणीभूत आहे. हा विषाणू त्या भागातील सशांमध्ये वेगाने पसरत आहे. अनेकांसाठी अस्वस्थ करणारा प्रश्न हा आहे की, हा आजार माणसांवर किंवा पाळीव प्राण्यांवर परिणाम करू शकतो का? त्याचविषयी जाणून घेऊयात…

काय आहे ‘एसपीव्ही’ विषाणू?

  • झोम्बी सशांची चर्चा होत असली तरी सुदैवाने अमेरिकेच्या मध्य-पश्चिमेकडील ससे झोम्बी नाहीत. त्यांच्यावर दिसणाऱ्या विचित्र शिंगांच्या वाढीचे कारण ‘शोपे पॅपिलोमाव्हायरस’ (Shope papillomavirus – SPV) आहे.
  • त्याला ‘कॉटनटेल रॅबिट पॅपिलोमाव्हायरस’ (CRPV) असेही म्हणतात. हा विषाणू पहिल्यांदा १९३० मध्ये संशोधक रिचर्ड शोपे यांनी ओळखला होता.
  • त्यांनी पाहिले की, जंगली कॉटनटेल सशांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर विचित्र वाढ होत आहे.
  • या वाढीचे वर्णन त्यांनी शिंगांसारखा दिसणारा भाग म्हणून केले होते, मात्र त्या प्रत्यक्षात एकप्रकारच्या गाठी (Tumours) आहेत.
झोम्बी सशांची चर्चा होत असली तरी सुदैवाने अमेरिकेच्या मध्य-पश्चिमेकडील ससे झोम्बी नाहीत. (छायाचित्र-एक्स)

एसपीव्ही हा एक डीएनए विषाणू आहे, जो ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) शी संबंधित आहे. ह्युमन पॅपिलोमा विषाणूच्या संसर्गामुळे केवळ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगच नाही तर लिंगाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग आणि ऑरोफॅरिंजियल कर्करोग होऊ शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये फोर्ट कॉलिन्समध्ये लोकांनी अशा वेगळ्या सशांना पाहिल्यानंतर वन्यजीव अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. पण, अशी प्रकरणे दुर्मीळ नाहीत, असे वन्यजीव संस्थेच्या प्रवक्त्या कारा वॅन हूझ यांनी सांगितले. ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, अशी प्रकरणे बऱ्याच काळापासून आहेत.

मिसूरी विद्यापीठाच्या मते हा रोग अमेरिकेच्या मध्य-पश्चिमेकडील भागात पाहायला मिळतो आणि उन्हाळ्यात तो अधिक दिसतो. या काळात गोचीड (Fleas) आणि डास यांची संख्या जास्त असते आणि तेच विषाणूचे मुख्य वाहक आहेत. एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर, विषाणूमुळे त्वचेच्या पेशींची वाढ वेगाने होते आणि त्यामुळे संसर्गित सशाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि तोंडाभोवती विचित्र आकाराच्या गाठी तयार होतात.

एसपीव्ही विषाणू माणसांना आणि पाळीव प्राण्यांना संक्रमित करू शकतो का?

विचित्र स्वरूपाच्या सशांना पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, तज्ज्ञ म्हणतात की हे संक्रमित ससे लोकांसाठी किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक नाहीत. कॉलोराडो पार्क्स अँड वाईल्डलाईफने स्पष्ट केले आहे की, हा विषाणू माणूस, कुत्रे किंवा मांजरांमध्ये संर्सगजन्य नाही. हा विषाणू प्रजाती-विशिष्ट (Species-specific) आहे. याचाच अर्थ असा की, हा विषाणू केवळ सशांमध्ये पसरतो आणि माणसांमध्ये, कुत्र्यांमध्ये, मांजरांमध्ये किंवा इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये पसरू शकत नाही. असे असले तरी पाळीव सशांना जंगली सशांपेक्षा याचा जास्त त्रास होऊ शकतो.

पाळीव सशांना हा संसर्ग झाल्यास त्यांना ‘स्क्वामस सेल कार्सिनोमा’ नावाचा धोकादायक त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते. त्यामुळेच वन्यजीव आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी आजारी किंवा संक्रमित जंगली प्राण्यांना स्पर्श न करण्याचा सल्ला देतात. एसपीव्ही विषाणू स्वतः लोकांसाठी किंवा पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक नसला तरी सुरक्षितता म्हणून नेहमीच अंतर राखणे चांगले आहे, असेही ते सुचवतात.

संक्रमित सशांचे काय होते?

शोपे पॅपिलोमाव्हायरस सशांचा सहसा मृत्य होत नाही, परंतु आजारामुळे त्यांचे जगणे कठीण होते. डोळ्याजवळील मोठ्या गाठीमुळे ते आपली दृष्टी गमावू शकतात, त्यामुळे भक्षकांना ओळखणे कठीण होते. तोंड किंवा नाकाजवळील गाठींमुळे खाणे आणि श्वास घेणे कठीण होते, त्यामुळे उपासमार किंवा श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. संक्रमित सशांचा वेग कमी होतो आणि ते कमकुवत होतात, त्यामुळे जंगली प्राणी अगदी सहज त्यांची शिकार करू शकतात.

काही ससे या संसर्गावर मात करू शकतात आणि त्यांच्या गाठी कालांतराने कमी होतात किंवा अदृश्य होतात. मात्र, बहुतांश ससे या आजारावर मात करू शकत नाहीत. त्यांना वाढत जाणाऱ्या गाठींचा त्रास होतो आणि त्या कधीही बऱ्या होत नाहीत. पाळीव सशांमध्ये गाठी कर्करोगजन्य होण्यापूर्वी डॉक्टर शस्त्रक्रियेने त्या काढू शकतात, परंतु या विषाणूवर कोणताही ज्ञात उपचार नाही. सोशल मीडियावर सशांच्या व्हायरल होणाऱ्या छायाचित्रांवर नेटकऱ्यांनी विविध विधाने केली आहेत. एका व्यक्तीने म्हटले, “हे सशांच्या ‘Resident Evil’सारखे आहे, जे प्रत्यक्षात घडत आहे.” ‘Resident Evil’ हा झोम्बीवर आधारित एक चित्रपट आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, “झोम्बी विषाणूची सुरुवात अशीच होते.”