Religious cult deaths गेल्या दोन वर्षांपूर्वी केनियातून आलेल्या एका बातमीने संपूर्ण देशाला हादरवले. ख्रिश्चन पंथाच्या पास्टरने (चर्चचा कारभार चालविणारा) येशूशी भेट घालून देण्याचे स्वप्न दाखवत शेकडो लोकांचा बळी घेतला. जवळपास दोन वर्षांपूर्वी या धर्मगुरूच्या सांगण्यावरून उपासमार आणि गुदमरून मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश केनियातील एका न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. या घटनेत कमीतकमी ४०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ‘रॉयटर्स’च्या एका वृत्तानुसार, केनियातील मालिंदी या किनारपट्टी शहराच्या बाहेरच्या बाजूला कबरींमध्ये हे मृतदेह पुरले गेले असल्याचा संशय आहे. या शहरात पूर्वी या पंथाचे मुख्यालय होते. नेमके हे प्रकरण काय? धर्माच्या नावावर लोकांचा बळी कसा घेण्यात आला? हा धर्मगुरू नक्की कोण आहे? जाणून घेऊयात.
टीव्ही, यूट्यूबवर लोकप्रिय प्रवचने
पॉल मॅकेन्झी नावाच्या एका केनियन पास्टरने धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल केली. पॉल मॅकेन्झी हा एका धार्मिक पंथाचा प्रमुख होता, त्याने आपल्या उपदेशाने अनुयायांच्या मनाचा ताबा घेतला होता. एप्रिल २०२३ मध्ये पोलिसांना मिळालेल्या माहितीमुळे पॉल मॅकेन्झी याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्याच्या ‘चर्च गुड न्यूज इंटरनॅशनल’ (Church Good News International) या संस्थेच्या शकाहोला जंगलातील ८०० एकरच्या जागेची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या जागेत असणाऱ्या कबरींमध्ये त्यांना सुमारे ८० मृतदेह पुरल्याचे आढळून आले. बहुतेक मृतदेहांवर उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची चिन्हे होती, तर काहींचा श्वास कोंडल्यामुळे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले. चर्चचे काही अनुयायी जिवंत आढळले, मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. या सर्वांनी धर्मगुरूच्या सांगण्यावरून मृत्यूचा मार्ग स्वीकारला होता.
कोण होता शेकडो लोकांचा जीव घेणारा नराधम?
- मॅकेन्झी हा टॅक्सीचालक होता, जो नंतर धार्मिक उपदेशक झाला. तो इवॅनजेलिकल (Evangelical) पंथाचा धर्मप्रचारक म्हणून तो काम करू लागला. दोन दशकांपासून तो धर्मप्रचारक म्हणून काम करत होता.
- इवॅनजेलिकल ही ख्रिश्चन धर्माची एक शाखा आहे. जे बायबल आणि येशूवर नितांत श्रद्धा ठेवतात.
- ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने २०२३ मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, रोमन कॅथलिक किंवा अँग्लिकन चर्चच्या तुलनेत मॅकेन्झी याच्या चर्चची स्वतःची एक निश्चित रचना आणि नियम आहे.
- पूर्व आफ्रिकेतील अनेक इव्हँजेलिकल चर्च स्वतंत्र उपदेशकांद्वारे चालवले जातात आणि त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण किंवा नियम नसतात.

चर्चच्या एका ब्लॉगस्पॉट वेबसाइटवर असे म्हटले होते की, “‘गुड न्यूज इंटरनॅशनल’ची स्थापना ख्रिस्ती अध्यात्माच्या सर्व बाबींमध्ये अनुयायांना सर्वसमावेशकपणे सामावून घेण्यासाठी केली गेली आहे. ख्रिस्ती धर्मातील सर्व गोष्टींवर मनापासून विश्वास ठेवून त्याप्रमाणे शिकवण देणे याचे उद्दिष्ट आहे. या शिकवणुकीतूनच दुसरे जिसस क्राइस्ट भूमीवर अवतरतील.” या ब्लॉगमध्ये त्यांच्या ‘एंड टाईम मेसेजेस’ (End Time Messages) नावाच्या टीव्ही शोचादेखील उल्लेख करण्यात आला होता. तो म्हणाला की, देवाने निर्माण केलेले जग अखेरपर्यंत शिकवण, धर्मोपदेश आणि भविष्यवाणीवर आधारित आहे.
मॅकेन्झीने मालिंदीजवळील शकाहोलाच्या जंगलात एक मोठे कॅम्पसदेखील स्थापन केले. आपला शो आणि यूट्यूब व्हिडीओंमुळे मॅकेन्झीची लोकप्रियता वाढली. लोकांचा त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता. मुख्य म्हणजे त्याने आपल्या अनुयायांना सांगितले होते की जग लवकरच संपणार आहे आणि पुढील १००० वर्षे सैतान राज्य करेल. मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याने आपल्या अनुयायांना आणि त्यांच्या मुलांना उपासमारीने मरण्याचे आदेश दिले, त्यामुळे ते स्वर्गात येशूला भेटू शकतील, असे त्याने सांगितले.
शेकडो लोकांचा मृत्यू
मॅकेन्झीची तीन-टप्प्यांची योजना होती. पहिल्यांदा अनुयायांनी स्वतःच्या मुलांना मारावे, नंतर महिलांना आणि मग स्वतःचा नाश करावा. मॅकेन्झीने असा दावा केला होता की, त्याने कोणालाही उपास करण्यास सांगितले नव्हते. ‘रॉयटर्स’च्या वृत्तात मृत्यू झालेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांनी सांगितले की, तो आपल्या शिकवणींद्वारे आपल्या अनुयायांना त्यांच्या कुटुंबापासून आणि समाजापासून तोडून टाकत असे. मार्चमधील एका व्हिडीओमध्ये त्याने म्हटले होते, “शिक्षण वाईट आहे. शालेय अभ्यासक्रमांमध्ये मुलांना समलैंगिक आणि तृतीयपंथी बाबी शिकवल्या जातात.”
२०१७ मध्ये अधिकाऱ्यांनी त्याचे चर्च असलेल्या जागेची तपासणी केली होती आणि त्यांना तिथे शाळांमध्ये न जाणारी ४३ मुले आढळली होती. २०१९ मध्येही पोलिसांनी मॅकेन्झीच्या चर्चला बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच त्याने चर्च आणि इतर बाबी शकाहोलाच्या जंगलात स्थलांतरित केल्या, असे पोलिसांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या भावाने आणि त्याच्या पत्नीने मॅकेन्झीच्या आदेशानुसार जंगलात त्यांच्या मुलांची उपासमार करून त्यांना मारले आहे. अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि मृतदेह शोधले, त्यानंतर मॅकेन्झीला अटक करण्यात आली.
त्यानंतरही एका न्यायदंडाधिकाऱ्याने त्याला जामिनावर सोडले. जामिनावर सोडण्यात आल्यानंतर त्याच्या योजनांना गती मिळाली. तो जंगलात परत गेला आणि आपल्या अनुयायांना सांगितले की, जग ऑगस्टऐवजी १५ एप्रिल रोजी संपेल. त्याच वर्षी १३ एप्रिल रोजी पोलिसांनी एका माहितीच्या आधारावर कारवाई केली आणि जंगलात तपास सुरू केला. हा तपास सुरू होताच पोलिसांना मृतदेह सापडण्यास सुरुवात झाली.
मॅकेन्झीवर खून आणि दहशतवादाचे आरोप आहेत. परंतु, तो त्याच्यावरील सर्व आरोप नाकारतो. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी २०२३ मध्ये सांगितले होते की, मॅकेन्झीच्या कथित कृत्यांचा आधीच शोध का लागला नाही, हे जाणून घेण्यासाठी सरकार एक न्यायिक चौकशी आयोग स्थापन करेल. या घटनेवरून विल्यम रुटोला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता, कारण त्यांच्या पत्नी रॅचेलदेखील एक इव्हँजेलिकल उपदेशक आहे.