Attacks on Indians abroad विदेशात भारतीयांवर होणार्‍या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी आयर्लंडमधील डब्लिन येथे एका भारतीय व्यक्तीवर जमावाने क्रूर हल्ला केला. व्हायरल झालेल्या छायाचित्रात तो डोक्यापासून पायापर्यंत रक्ताने माखलेला दिसत होता. त्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात एका २३ वर्षीय भारतीयाला पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादामुळे पाच जणांनी बेदम मारहाण केली. या दोन घटना हजारो किलोमीटर दूर घडल्या असल्या तरी या हल्ल्यांमुळे भारतीय नागरिकांची चिंता वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अलीकडच्या काळात भारतीयांवरील असे हल्ले वाढत असल्याचे दिसून येते. काही अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये तर हे हल्ले प्राणघातकही ठरले आहेत. मोठ्या संख्येने भारतीय या हल्ल्यांचे बळी कसे ठरत आहेत? त्यामागील कारण काय? जाणून घेऊयात?

भारतीयांवर झालेले ताजे हल्ले

१९ जुलै रोजी एका विवाहित व्यक्तीला आयर्लंडची राजधानी डब्लिनच्या टॅलाग्ट उपनगरात मारहाण करून लुटले गेले आणि त्याचे काही कपडेही काढून घेण्यात आले. तो काही आठवड्यांपूर्वीच आपली पत्नी आणि मुलाला भारतात सोडून डब्लिनमध्ये नोकरीसाठी आला होता. आयर्लंडच्या ‘द आयरिश टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणांच्या एका टोळीने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्या व्यक्तीवर लहान मुलांच्या बाबतीत गैरवर्तन केल्याचा खोटा आरोप केला होता. हे आरोप नंतर ऑनलाइन व्हायरल करण्यात आले. परंतु, आयरिश पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीवर केले गेलेले गैरवर्तनाचे आरोप खोटे आहेत.

डब्लिनमध्ये जेव्हा भारतीयाला मारहाण होत होती, त्याच वेळी अॅडलेडमध्ये एका २३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला पार्किंगच्या जागेवरून झालेला वाद आणि वर्णद्वेषी टिप्पणी यांमुळे मारहाण करण्यात आली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हल्ल्याचा बळी ठरलेल्या त्या व्यक्तीच्या मित्राने ‘द आयरिश टाइम्स’ला सांगितले की, ही घटना १९ जुलै रोजी घडली. तो किंग्सवूडमधील विनायक हिंदू मंदिराकडे गूगल मॅपच्या मार्गाने पायी निघाला होता. त्यावेळी तरुणांच्या एका गटाने त्याला अडवले आणि त्याला आयर्लंडमध्ये का आला आहे, असे विचारून त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. “त्याने समजावण्याचा प्रयत्न केला की, त्याला आयर्लंडमधील एका तंत्रज्ञान कंपनीने कामावर ठेवले आहे. त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. १० ते १२ सेकंद त्याला आपण कुठे आहोत तेच कळले नाही आणि नंतर त्याच्या लक्षात आले की, त्याच्या कपाळातून रक्त वाहत आहे.” हल्ल्यानंतर त्या गटाने त्याची पॅन्ट काढून घेतली आणि त्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेत त्या निवासी भागात फिरत राहिला.

त्याच्या मित्राने पुढे सांगितले, “तो लपण्याचा आणि मदतीचा प्रयत्न करत होता, त्याला खूप लाज वाटत होती. काही गाड्या त्याच्या शेजारून गेल्या आणि एका माणसाने त्याला शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओही आहे.” त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक रहिवासी जेनिफर मरे यांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले. त्यांनी त्याला एक ब्लँकेट दिले आणि रुग्णवाहिका येईपर्यंत तो त्याच्याबरोबर थांबला. या घटनेची आठवण सांगताना भावूक झालेल्या मरे यांनी सांगितले की, तो माणूस वारंवार त्याचे आभार मानत होता. या घटनेने प्रत्येकाचे लक्ष वेधले गेले. मात्र, डब्लिनमध्ये घडलेली ही एकमेव घटना नाही.

विक्रम जैन नावाच्या दुसऱ्या एका भारतीय व्यक्तीने सांगितले की, त्याच्याबरोबर भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यावरही एका टोळीने हल्ला केला होता. विक्रम जैन अनेक वर्षांपासून आयरिश नागरिक आहेत. डब्लिन बिझनेस स्कूलमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेणारा तो तरुण जखमी अवस्थेत जैनच्या घरी परतला. विद्यार्थ्याने सांगितले की, तो संध्याकाळी ६ च्या सुमारास टॅलाग्टमधील शॉन वॉल्श पार्कमधून जात असताना, तरुणांच्या एका गटाने त्याला अडवले. जैनने ‘द आयरिश टाइम्स’ला सांगितले की, त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यासह शरीरावर मारहाण करण्यात आली.

डब्लिनमध्ये जेव्हा भारतीयाला मारहाण होत होती, त्याच वेळी अॅडलेडमध्ये एका २३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला पार्किंगच्या जागेवरून झालेला वाद आणि वर्णद्वेषी टिप्पणी यांमुळे मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री किंटोर अव्हेन्यूवर घडली. या हल्ल्याची शिकार झालेल्या चरणप्रीत सिंग नावाच्या विद्यार्थ्याने सांगितले की, तो शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात आहे. एका गटाने त्याच्या गाडीजवळ येऊन वर्णद्वेषी शिवीगाळ केली आणि त्याला खाली पडेपर्यंत मारहाण केली. सिंगने सांगितले, “त्यांनी फक्त ‘भारतीय इथून जा’, असे म्हटले आणि त्यानंतर मारहाण सुरू केली.” सिंग पुढे म्हणाला, “मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारले.”

त्याला गंभीर दुखापती झाल्या. त्यामध्ये त्याच्या मेंदूला आघात झाला आणि चेहऱ्यावरदेखील अनेक फ्रॅक्चर्स झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एनफिल्ड येथील २० वर्षीय तरुणाला अटक केली. परंतु, इतर हल्लेखोरांना अजूनही ओळखता आलेले नाही. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जनतेला मदतीची विनंती केली आहे. या हल्ल्यामुळे अॅडलेडमधील भारतीय समाजात संताप निर्माण झाला आहे आणि ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. त्यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये सिडनीमधील न्यू साउथ वेल्स विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पीएचडी करणाऱ्या २८ वर्षीय शुभम गर्ग नावाच्या विद्यार्थ्यावर चाकूने क्रूर हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर ११ वेळा चाकूने वार करण्यात आले.

विदेशात भारतीयांवर होणारे हल्ले वाढले

भारतीयांवर हल्ल्याच्या या केवळ दोनच घटना नाहीत, जगभरात या घटना वाढल्या आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (MEA) आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत विदेशात एकूण ९१ भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. त्याशिवाय गेल्या पाच वर्षांत अशा हल्ल्यांमध्ये ३० विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर ४० हिंसक हल्ले झाले, २०२३ मध्ये २८, २०२२ मध्ये चार, २०२१ मध्ये दोन व २०२० मध्ये तीन हल्ले झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कॅनडात तब्बल २७ हिंसक हल्ले झाले आहेत, त्यापैकी १६ हल्ले प्राणघातक होते. रशियामध्ये १५ घटनांची नोंद झाली आहेत.

ब्रिटनमध्ये १२ आणि जर्मनीमध्येदेखील ११ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या हल्ल्यात काही नागरिकांनी आपला जीवही गमावला आहे. अमेरिकेत नऊ हिंसक हल्ले झाले आणि त्या सर्वांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याव्यतिरिक्त चीन आणि किर्गिस्तानमध्ये प्रत्येकी एक प्राणघातक प्रकरण नोंदवले गेले. आयर्लंडमध्ये चार, फिलिपिन्समध्ये तीन, इटलीमध्ये तीन व इराणमध्ये एका हल्ल्याची नोंद करण्यात आली आहे; परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये चार घटनांची नोंद झाली, ज्यात एकाचा मृत्यू झाला.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विदेशातील भारतीयांवरील हल्ल्यांची आकडेवारी स्वतंत्रपणे जारी केली आहे. २०२३ मध्ये ८६ भारतीयांवर हल्ले झाले आणि त्यात सर्वाधिक प्रकरणे अमेरिका (१२), ब्रिटन (१०), सौदी अरेबिया (१०) व कॅनडा (१०) येथे नोंदवली गेली. २०२२ मध्ये ५७ आणि २०२१ मध्ये २९ प्रकरणे नोंदवली गेली होती. या आकडेवारीवरून या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट दिसून येते.

तीन वर्षांत हजारो भारतीयांचा मृत्यू

गेल्या वर्षी कार्यकर्ते डॉ. विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जातून उघड झाले की, गेल्या तीन वर्षांत विदेशात २८,४५८ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २४,२७८ भारतीयांचा नैसर्गिक कारणांमुळे १,६२२ यांचा अपघातात, ६८६ यांचा कामाच्या ठिकाणी असलेल्या धोक्यांमुळे, १,७३६ जणांचा आत्महत्येने आणि १३६ जणांचा हिंसक हल्ले व हत्येमुळे मृत्यू झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मुख्य जन माहिती अधिकारी प्रवीण कुमार मुंजाल यांनी सांगितले, “त्यापैकी काही मृत्यू भारतीय विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत.” अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की, विदेशात भारतीय सुरक्षित आहेत का याची खात्री करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.