जगात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळे. कोणत्याही ऋतूत, कोणत्याही काळात सहज उपलब्ध होणारे आणि भरपूर पौष्टिक मूल्ये असणारे हे फळ लाखो लोक सेवन करतात. ‘वेळेला केळ’ असेल तर उदरभरणाचीही चिंता नसते. मात्र आपण बाजारातून आणलेल्या मोठ्या, एकसारख्या आकाराच्या, चमकदार पिवळ्या, घट्ट पोत असलेल्या केळ्याची प्रजाती मुळात भारतीय नाही. आपण ब्रिटिश मूळ असलेल्या कॅव्हेंडिश केळींचे सेवन करतो. लहान आकाराच्या मूळ भारतीय असलेल्या प्रजाती अधिक पौष्टिक मूल्ये असणाऱ्या असल्या तरी बाजारात कॅव्हेंडिश केळीपुढे तिचा टिकाव लागत नाही. भारतातील स्थानिक केळी चव आणि पौष्टिकतेत कॅव्हेंडिश केळीशी कशा प्रकारे लढा देत आहेत, याचा आढावा…

कॅव्हेंडिश केळी म्हणजे काय? 

कॅव्हेंडिश केळीच्या प्रजातीचे मूळ १९ व्या शतकातील इंग्लंडमध्ये आहे. डेव्हनशायरचे सहावे ड्यूक विल्यम कॅव्हेंडिश यांच्या ग्रीनहाऊसमध्ये त्याची लागवड केली जात होती. त्यामुळे या प्रजातीला कॅव्हेंडिश हे नाव पडले. हळूहळू ही प्रजाती जागतिक व्यावसायिक मानक बनले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात कॅव्हेंडिशने भारतात प्रवेश केला आणि अर्थव्यवस्था उदार झाल्यानंतर लोकप्रियता मिळवली. हळूहळू भारतातील अपारंपरिक केळी उत्पादक प्रदेशांमध्ये अनेक स्थानिक प्रजातींची जागा कॅव्हेंडिशने घेतली. मोठे व एकसारखे आकाराचे, चमकदार पिवळा रंग, घट्ट पोत, मऊ लुसलुशीत फळ अशी या केळींची वैशिष्ट्ये. उच्च उत्पादन, एकसमान स्वरूप आणि खूप दिवस टिकाव धरणारे असल्याने भारतासह जगभरातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना कॅव्हेंडिश केळी आकर्षित करतात. अधिक उत्पन्न मिळत असल्याने कॅव्हेंडिशच्या स्थानिक जाती विकसित करण्यात आल्या. 

भारतातील केळ्यांच्या मूळ प्रजाती कोणत्या?

भारतात किमान ५,००० वर्षांपासून केळींची लागवड केली जात आहे. या फळाचे मूळ इंडो-मलय-ऑस्ट्रेलियन प्रदेशातील. ते फळ हळूहळू भारतीय उपखंडात पोहोचले. भारतातील आसाम, बिहार या भागांत सर्वात आधी केळींची लागवड करण्यात आली, त्यानंतर दक्षिण भारतात ती पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. बिहारमधील चिनिया, आसाममधील भीमकोल या केळींच्या मूळ भारतीय प्रजाती आजही टिकून आहेत. दक्षिण भारतातील रास्थली आणि नेंद्रन या केळींच्या प्रजातींचे आजही अधिक उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील वसईजवळील स्थानिक वेलची केळीही मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. भारताच्या एकूण केळी उत्पादनापैकी ५० टक्के स्थानिक केळी अजूनही उपलब्ध आहेत. भारतीय केळी गोड, लहान आकाराची, पातळ त्वचेची असतात. अधिक पिवळसर व लाल रंगाची असतात. मात्र कॅव्हेंडिश केळीचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रचार, योग्य विपणन यांमुळे बाजारपेठेवर या केळींनी कब्जा केला आहे.

कॅव्हेंडिश केळींचे आक्रमण?

गेल्या काही दशकांमध्ये कॅव्हेंडिश केळी आणि त्याच्या उप-जातींनी भारतीय शेतात आणि बाजारपेठेत झपाट्याने कब्जा केला, उत्पादक आणि ग्राहक दोघांसाठीही हा एक प्रमुख पर्याय बनला. कॅव्हेंडिश केळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या भारतातील अपारंपरिक केळी उत्पादक क्षेत्रांमध्ये झपाट्याने पसरली. त्याच्या लोकप्रियतेमागे उच्च उत्पादन, एकसमान आकार आणि जास्त काळ टिकणे हे घटक होते, ज्यामुळे ते देशांतर्गत वाहतूक आणि निर्यातीसाठी योग्य बनले. एकसमान आकारामुळे ती केळी डझनावर विकली जातात, तर मूळ भारतीय केळी किलोवर विकली जातात. केरळमधील लाल केळींचा एक घड सुमारे १५ किलो वजनाचा असतो, तर कॅव्हेंडिश केळीचा एक घड ३० किलो वजनाचा असू शकतो. त्यामुळे अधिक पैसा कमावण्यासाठी कॅव्हेंडिश केळींचे उत्पादन अधिक घेतले जाते. आज विशेषतः भारतीय शहरे आणि गावांमध्ये, क्वचितच बिया असलेली स्थानिक केळी पाहायला मिळतात, ज्यांची जागा बिया नसलेल्या कॅव्हेंडिश केळीने घेतली आहे. काही दशकांपूर्वी भारतात व्यावसायिकरीत्या आणण्यात आलेल्या ब्रिटिश कॅव्हेंडिश केळींनी आता बाजारपेठ काबीज केली असून स्थानिक जातींना बाजूला सारले आहे.

भारतात अधिक उत्पादन कोठे? 

भारत हा केळींचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. जिथे केळींच्या ३०० हून अधिक स्थानिक जाती आहेत. मात्र कॅव्हेंडिश या केळींचे अधिक उत्पादन केले जात असल्याने फळांच्या दुकानापासून ते स्थानिक बाजारपेठांपर्यंत आणि अगदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही भारतातील केळीची ही सर्वात दृश्यमान प्रजाती आहे. कॅव्हेंडिश केळी सुपरमार्केटच्या शेल्फवर रांगा लावतात आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हातगाड्यांवर बसतात, जिममध्ये जाणाऱ्यांसाठी आणि जलद नाश्ता घेणाऱ्या मुलांसाठी हे आवडते फळ बनले आहे. उच्च उत्पादन देणाऱ्या, सौंदर्यपूर्ण कॅव्हेंडिशच्या मोनोकल्चर शेतीमुळे संपूर्ण भारतात त्याचे वर्चस्व निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या जळगाव पट्ट्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन कॅव्हेंडिश जातीचे आहे, विशेषतः ग्रँड नैन नावाच्या व्यावसायिक केळी प्रजातीचे. जळगाव बाजारपेठेतून दररोज केळीने भरलेले सुमारे २५० ट्रक उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये जातात. 

मूळ भारतीय प्रजाती टिकाव धरतील?

कॅव्हेंडिश आक्रमणामुळे भारतातील स्थानिक केळींची विक्री फारशी होत नसल्याचे चित्र आहे. किमान उपलब्धता, ग्राहकांचे आकर्षण, पसंती आणि निर्यातीच्या बाबतीत तरी ते तसेच दिसते. भारतीय जाती, ज्या मुख्यत्वे केरळ, तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या त्यांच्या मूळ बालेकिल्ल्यांमधून येतात. त्यांची विक्री त्याच राज्यांमध्ये किंवा आसपासच्या राज्यांमध्ये होते. परराज्यांत किंवा परदेशांत मोठ्या प्रमाणावर या केळींची निर्यात होत नसल्याने, योग्य विपणन आणि प्रचार होत नसल्याने त्यांची मागणी वाढ नसल्याचे दिसून येते. बिहारमधील चिनिया आणि केरळमधील नेंद्रनमध्ये उत्तम पोषण आणि चव आहे. या देशी केळी कीटक, दुष्काळ आणि रोगांना प्रतिकार दर्शवितात. मात्र तरीही कॅव्हेंडिश आक्रमणामुळे त्यांना नमते घ्यावे लागते.  

sandeep.nalawade@expressindia.com