Sheikh Mujibur Rahman Death : १५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेशमध्ये मोठा लष्करी उठाव झाला. या रक्तरंजित उठावात बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. सुदैवाने त्यांच्या कन्या शेख हसीना या हत्याकांडातून थोडक्यात वाचल्या. सोमवारी (तारीख १७ नोव्हेंबर) बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यादरम्यान शेख हसीना यांच्या कुटुंबीयांचे हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १९७५ साली बांगलादेशात नेमके काय घडले होते? त्याविषयीचा हा आढावा…
पाकिस्तानबरोबरच्या युद्धानंतर भारताने ६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर शेख मुजीबूर रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. मुजीबूर रेहमान हे अत्यंत शांत स्वभावाचे नेते होते आणि त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जात होते. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला जात होता. त्याचवेळी लष्करातील मधल्या फळीतील अधिकाऱ्यांच्या एका गटाने सरकार विरोधात बंड घडवून आणले. या बंडात बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रहमान यांचे जवळजवळ संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. त्यादिवशी मध्यरात्री बंगाल लान्सर्स आणि ५३५ इन्फंट्री रेजिमेंटमधील सशस्त्र सैनिकांनी ढाका शहरात प्रवेश केला. त्यांनी मुजीबूर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची अत्यंत क्रूरतेने हत्या केली.
मुजीब यांच्या निवासस्थानी गोळ्यांचा वर्षाव
शेख मुजीबूर रहमान यांच्या विरोधात राजकीय असंतोष अनेक महिन्यांपासून खदखदत होता. त्यामागचे कारण म्हणजे- जून १९७५ मध्ये मुजीब यांनी बांगलादेशात कृषक श्रमिक अवामी लीग अंतर्गत एकपक्षीय रचना तयार केली होती. या धोरणाने विरोधी पक्षाचे राजकारण संपवले होते आणि प्रसारमाध्यमांवर बंधने आणली होती. या निर्णयामुळे बांगलादेशच्या लष्करातील अनेक गटांमध्ये असंतोष वाढत गेला. त्याचवेळी काही अधिकाऱ्यांनी या धोरणाला संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान मुजीबूर रहमान यांच्या हत्येचा कट रचला. १५ ऑगस्ट १९७५ रोजी मध्यरात्री लष्कराच्या एका बंडखोर गटाने ढाका शहरातील रहमान यांच्या निवास्थानावर गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून रहमान यांनी मदतीसाठी कर्नल जमील यांना फोन केला. मात्र, ते घटनास्थळी पोहोचताच त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
शेख हसीना यांच्या कुटुंबातील १७ जणांची हत्या
कर्नल जमील यांची हत्या केल्यानंतर काही क्षणातच बंडखोर सैनिक मुजीबूर रहमान यांच्या घरात शिरले. त्यावेळी पंतप्रधान रहमान यांनी तुम्हाला काय हवे आहे? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर गोळ्यांच्या वर्षावाने देण्यात आले. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुजीब यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या आणि ते पायऱ्यांवर कोसळले होते. त्यानंतर बंडखोर सैनिकांनी मुजीबूर यांच्या घरातील इतर सदस्यांवरही गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून मुजीबूर यांचा मोठा मुलगा शेख कमाल हा दुसऱ्या मजल्यावरून खाली धावत आला होता. त्याचीही धडाधड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा दुसरा मुलगा शेख जमाल आणि त्याच्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी घरातील बाथरूममध्ये आश्रय घेतला होता. मात्र, बंडखोर सैनिकांनी त्यांचीही अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. या लष्करी उठावात मुजीब यांच्या कुटुंबातल्या एकूण १७ जणांची हत्या करण्यात आली होती. त्याशिवाय घरात काम करणाऱ्या नोकरांनादेखील ठार करण्यात आले होते.
आणखी वाचा : Colon Cancer Symptoms : आतड्याचा कॅन्सर कसा ओळखाल? सुरुवातीची लक्षणे कोणती? तज्ज्ञ काय सांगतात?
हत्याकांडातून शेख हसीना थोडक्यात वाचल्या
शेख मुजीबूर रहमान यांचा बांगलादेशच्या निर्मितीत मोठा वाटा होता. त्यांची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. शेख फजील तुन्नेसा मुजीब या शेख हसीना यांच्या आई होत्या. त्यांना बेगम मुजीब असे म्हटले जायचे, त्यांचीही हत्या करण्यात आली. शेख कमाल हा शेख हसीना यांचा भाऊ होता, त्यालाही ठार करण्यात आले. शेख जमाल बांगलादेश लष्करात लेफ्टनंट होते. त्यांनाही १९७५ मध्ये ठार करण्यात आले. शेख रसेल हे शेख हसीना यांचे सर्वात लहान भाऊ होते. त्यांचीही १९७५ मध्ये हत्या करण्यात आली. सुदैवाने या हत्याकांडातून मुजीबूर रहमान यांच्या कन्या शेख हसीना आणि शेख रेहाना वाचल्या. कारण त्या कामानिमित्त जर्मनीला गेलेल्या होत्या. या घटनेनंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेख हसीना यांना आपल्या देशात आश्रय दिला. सहा वर्षांनंतर, मे १९८१ मध्ये हसीना बांगलादेशात परतल्या आणि त्यांची अवामी लीगच्या महासचिवपदी निवड करण्यात आली.
१९९६ मध्ये शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान
१९९६ मध्ये शेख हसीना पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. २००१ मध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली होती, पण २००८ मध्ये त्यांनी प्रचंड विजय मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली. २०१४ च्या निवडणुकीवर खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. २०१८ ची निवडणूक जिंकून शेख हसीना जगातील सर्वाधिक काळ नेतृत्व करणाऱ्या महिला नेत्यांपैकी एक ठरल्या. हसीना यांच्या राजवटीत बांगलादेशने आर्थिक प्रगती केली. मात्र, त्यांच्यावर मतभेद दर्शवणाऱ्यांवर कारवाई करणे, विरोधी नेत्यांना अटक करणे, माध्यमांवर निर्बंध घालणे आणि सुरक्षा यंत्रणांना अधिक अधिकार देणे असे आरोपही झाले.
हेही वाचा : विश्लेषण : एकनाथ शिंदे यांना घरातच घेरण्याची रणनीती? महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला (महा)युती नको?
शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा
२०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांसाठी राखीव कोट्यांविरुद्ध सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोठे रूप धारण केले. हे आंदोलन हळूहळू हसीना यांच्या राजवटीविरुद्ध एका मोठ्या बंडात रूपांतरित झाले. त्यानंतर झालेल्या कारवाईत प्रचंड हिंसाचार उसळला आणि हसीना यांना सत्तेवरून पायउतार होऊन भारतात पळून यावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार अहवालानुसार, सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिल्याने ‘जुलै उठाव’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या आंदोलनात अंदाजे १४०० लोक मारले गेले. अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर बांगलादेशने भारताकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, त्यामुळे भारताच्या भूमिकेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
