British MP Tulip Siddiq : ब्रिटनच्या महिला खासदार ट्यूलिप सिद्दीक यांच्याविरोधात बांगलादेशमधील ढाका न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. आरोपीने २७ एप्रिलपर्यंत न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे, अन्यथा त्यांना फरार घोषित करण्यात येईल, असेही न्यायालयाने ठणकावून सांगितलं आहे. या अटक वॉरंटनंतर लेबर पार्टीच्या खासदार ट्यूलिप सिद्दीक संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सध्या दोन्ही देशांमध्ये प्रत्यार्पण करार नसला तरी बांगलादेश सरकार महिला खासदाराच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोण आहेत ट्यूलिप सिद्दीक? त्यांचा बांगलादेशशी संबंध काय? न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट का जारी केलं? याबाबत जाणून घेऊ…
ब्रिटीश मीडिया द डेली मेलच्या वृत्तानुसार, या अटक वॉरंटनंतर, ट्यूलिप सिद्दीक आता परदेशी गुन्हेगारी तपासात एक फरार संशयित होण्याची शक्यता आहे. सध्या ब्रिटन आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पणाचा कोणताही करार झालेला नाही. मात्र, तरीदेखील बांगलादेशकडून ट्यूलिप सिद्दीक यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ब्रिटनच्या खासदाराबरोबर बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना, त्यांच्या बहीण शेख रेहाना आणि इतर ५३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.
कोण आहेत ट्यूलिप सिद्दीक
ट्यूलिप सिद्दीक या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख रेहाना यांच्या कन्या आहेत. ट्यूलिप यांनी त्यांच्या काकू शेख हसीना यांच्याकडून बेकायदा जमिनीचा भूखंड घेतल्याचा आरोप दक्षिण आशियाई देशातील भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (ACC) केला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पळ काढल्यानंतर सिद्दीक संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. ‘Financial Times’च्या वृत्तानुसार, ढाका न्यायालयाने सिद्दीक, त्यांच्या आई शेख रेहाना आणि त्यांच्या काकू हसीना, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
आणखी वाचा : Sambhal mosque: ‘शाही जामा मशीद’ ते ‘जुमा मशीद’; संभल येथील मशिदीबाहेरचा फलक ASI का बदलणार?
ट्यूलिप सिद्दीक यांच्यावर कोणते आरोप?
बांगलादेशमधील भ्रष्टाचारविरोधी समिती सध्या व्यापक तपासाचा भाग म्हणून माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे. एसीसीने असा दावा केलाय की, हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ढाक्याच्या बाहेरील एक शहरी निवासी क्षेत्र असलेल्या पूर्वांचलमधील अर्धा एकरचा भूखंड बेकायदा मिळवला आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, सिद्दीक यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून त्यांच्या काकू शेख हसीना, आई रेहाना, भाऊ रदवान आणि बहीण अझमीना यांना ढाक्यातील तीन भूखंड वाटप करण्यास राजी केल्याचा आरोप आहे. सिद्दीक यांचे सर्व नातेवाईक युनायटेड किंग्डममध्ये राहतात.
‘सिद्दीक यांनी बांगलादेशमध्ये खटला लढवावा’
बांगलादेशच्या ‘द बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, ढाकामधील वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक आयोग (ACC) दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या खटल्यांचा विचार केल्यानंतर रविवारी (१३ एप्रिल) अटक वॉरंट जारी केले आहे. बांगलादेशमधील पायाभूत सुविधांवरील खर्चातून हसीना आणि त्यांच्या ४४ हजार १४८ कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक आयोग करीत आहेत. एसीसीचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल मोमेन बीबीसीशी बोलताना म्हणाले की, शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप कागदोपत्री पुराव्यांवर आधारित आहेत. ब्रिटनच्या खासदार ट्यूलिप सिद्दीक यांनी त्यांचा खटला बांगलादेशमध्ये लढवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
बांगलादेश ब्रिटीश खासदाराला अटक करू शकतो का?
न्यायालयाने ट्यूलिप सिद्दीक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर बांगलादेश सरकार त्यांना अटक करू शकतं का? असा प्रश्न काही जण विचारत आहेत. सिद्दीक यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बांगलादेशकडून ब्रिटन खासदारावर होणारे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सिद्दीक यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. बीबीसीने ब्रिटनच्या महिला खासदाराच्या वकिलांनी केलेल्या दाव्याचा हवाला देत म्हटलंय की, बांगलादेशचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि सिद्दीकच्या वकिलांनी त्याविरोधात न्यायालयाला कारवाई करण्याची विनंती केली आहे.
शेख हसीना यांनी व्यक्त केला संताप
ढाका न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर शेख हसीना आणि त्यांच्या भाचीने बांगलादेश सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आठ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, सत्तेची तहान भागवण्यासाठी अंतरिम सरकारने परदेशी शक्तींशी हातमिळवणी करून देश उलथवून टाकण्याचा कट रचला होता. त्यांनी मोहमद युनूसवर बांगलादेशचा इतिहास पुसून टाकल्याचा आरोप केला आहे. “बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व खुणा पुसल्या जात आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला जात आहे. त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये स्मारके बांधली होती, पण ती जाळली जात आहेत. युनूस यांनी जर आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांनाही जाळून टाकेल, असा इशारा शेख हसीना यांनी दिला आहे.
अटक वॉरंटनंतर ट्यूलिप सिद्दीक काय म्हणाल्या?
ट्यूलिप सिद्दीक यांनीही भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी काहीही चुकीचे केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिद्दीक यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यांच्या वकिलांनी हे प्रकरण मिटवले आहे. सिद्दीक यांना ढाका येथे सुरू असलेल्या खटल्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कोणत्याही आरोपांना कोणताही आधार नाही. बांगलादेशात त्यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही. तसेच सिद्दीक यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा इतर कोणालाही जमिनीच्या कोणत्याही तुकड्याचे वाटप करण्यास कधीही प्रभावित केलेले नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी एसीसीने कोणतेही पुरावे दिले नाहीत, त्यामुळे हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत हे स्पष्ट आहे.”
हेही वाचा : Kamasutra: कामसूत्र हा ग्रंथ स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याविषयी नेमकं काय भाष्य करतो?
ट्यूलिप सिद्दीक यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण होणार?
ब्रिटन आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पणाचा कोणताही करार झालेला नाही. तरीही बांगलादेशने ट्यूलिप सिद्दीक यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यास त्यांना ब्रिटन सरकारला ठोस पुरावे द्यावे लागतील. त्यानंतर ब्रिटनमधील न्यायालय प्रत्यार्पणाच्या विनंतीवर निर्णय घेईल. दरम्यान, सिद्दीक यांच्याविरुद्धच्या अटक वॉरंटवर प्रतिक्रिया देताना ब्रिटनमधील विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. ट्यूलिप सिद्दीक यांनी तातडीने खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या चौकशीत ब्रिटनमधील लेबर पार्टीच्या खासदार ट्यूलिप सिद्दीक यांचेही नाव आले होते. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांचे राजकीय प्रतिस्पर्धी बॉबी हज्जाज यांनी हे आरोप केले होते.
सिद्दीक यांना मंत्रिपदाचा द्यावा लागला राजीनामा
सिद्दीक यांनी २०१३ मध्ये रशियासोबत बांगलादेशातील नवीन अणुऊर्जा प्रकल्पाची किंमत अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने दाखविण्याचा करार केला, असं हज्जाज यांनी आरोपात म्हटलं होतं. दरम्यान, स्टारमरच्या नीतिमत्ता सल्लागाराने शेख हसीना यांच्या राजवटीशी असलेल्या संबंधांची चौकशी केल्यानंतर सिद्दीक यांचा राजीनामा घेण्यात आला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, ट्यूलिप यांच्यावरील आरोपांमध्ये काहीच तथ्य नव्हते. ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सल्लागार लॉरी मॅग्नस यांनीही तसा अहवाल सरकारला दिला होता. दरम्यान, बांगलादेशने ट्यूलिप सिद्दीकी यांच्याविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर ब्रिटनच्या महिला खासदाराला अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.