NCERT Class 8 textbook controversy over Shivaji and Babur portrayal: इतिहास हा केवळ भूतकाळाचा आरसा नाही, तर वर्तमान आणि भविष्य घडवणारा मार्गदर्शक असतो. त्यामुळेच शालेय पुस्तकांतून भूतकाळाची कहाणी नव्या अर्थाने लिहिली जाते, तेव्हा वाद निर्माण होणे स्वाभाविकच असते. एनसीईआरटीच्या इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या नवीन पुस्तकात करण्यात आलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अनेक वादंग होताना दिसत आहेत. कधी काळी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मुघलांच्या इतिहासावरच अधिक भर होता. परंतु, आता मात्र परिस्थिती वेगळी आहे.
हा बदल केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसून इतिहास लिहिण्याच्या दृष्टिकोनातच झालेल्या बदलाचे हे द्योतक आहे. परंतु, हा प्रयत्न वस्तुनिष्ठतेकडे नेणारा आहे की, निवडक कथानक घडवणारा? हा प्रश्न आज वादाच्या केंद्रस्थानी आहे.
एनसीईआरटीच्या समाजशास्त्राच्या नव्या पुस्तकात ‘द राईज ऑफ द मराठाज’ या प्रकरणात शिवाजी महाराजांनी मुघल शत्रूच्या छावणीवर मध्यरात्री केलेल्या हल्ल्याची तुलना आधुनिक काळातील `’सर्जिकल स्ट्राइक’शी केली आहे. या पुस्तकात महाराजांचे वर्णन धोरणी आणि दूरदृष्टी असलेला राजा म्हणून केले आहे. तर, बाबराचे वर्णन निर्दयी आणि क्रूर आक्रमक, नरसंहारक असे करण्यात आले आहे.
सर्जिकल स्ट्राईक
सार्वभौम राज्य प्रस्थापित करणारा शासक असे महाराजांचे वर्णन या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात करण्यात आले आहे. ‘द राईज ऑफ द मराठाज’ मध्ये शिवाजी महाराजांनी फक्त काही मोजक्या मावळ्यांसह रात्री शत्रूच्या छावणीवर छापा टाकला होता, असे म्हटले आहे. या छाप्याची तुलना आधुनिक सर्जिकल स्ट्राईकशी करण्यात आली आहे. पुस्तकात सर्जिकल स्ट्राईक शब्द जांभळ्या अक्षरात अधोरेखित करण्यात आला आहे.
कवट्यांचे मनोरे रचणारा बाबर
‘रिशेपिंग इंडिया’ज पॉलिटिकल मॅप’ या दुसऱ्या प्रकरणात बाबरने स्त्रियांना गुलाम केले आणि लुटलेल्या शहरांतील लोकांच्या कवट्यांचे मनोरे उभारले होते, असे म्हटले आहे. तो भारतीय उपखंडात आला तेव्हा त्याला समरकंद (आधुनिक उझबेकिस्तान) मधून हाकलून देण्यात आले होते. याआधी मुघल आणि दिल्ली सल्तनत या विषयांचा समावेश इयत्ता ७ वीच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमात करण्यात आला होता. मात्र आता एनसीईआरटीने त्या धड्यांऐवजी मौर्य, शुंग आणि सातवाहन साम्राज्य तसेच मगध अशी नवी प्रकरणे समाविष्ट केली आहेत.
अपरिचित कालखंड आणि नव्या सूचना
आता इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना दिल्ली सल्तनत, मुघल आणि मराठ्यांची ओळख करून दिली जाते. ‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉण्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकात एनसीईआरटीने ‘इतिहासातील काही अपरिचित कालखंडांविषयी माहिती, टिपणे दिली आहेत आणि त्याबरोबर डिस्क्लेमरही समाविष्ट केले आहेत.
या टिपणात म्हटले आहे, “क्रूर हिंसा, अत्याचारी कारभार किंवा सत्तेच्या चुकीच्या महत्त्वाकांक्षांची ऐतिहासिक मुळे समजून घेणे हे भूतकाळावर उपचार करण्याचा आणि असे प्रकार भविष्यात होऊ नयेत अशी आशा ठेवत भविष्य घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.” दिलेल्या सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, “भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये.”
इतिहास हा पूर्णपणे तथ्यांवर अवलंबून असतो
‘द प्रिंट’शी बोलताना प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे इतिहासकार इरफान हबीब म्हणाले की, इतिहास हा पूर्णपणे तथ्यांवर अवलंबून असतो, धर्मावर नाही आणि अभ्यासक्रमातून काही भाग काढून टाकल्याने भूतकाळ बदलत नाही. हबीब पुढे म्हणाले की, त्या काळात कोणतेही संविधान अस्तित्वात नव्हते, त्यामुळे सर्व शासक तलवारीच्या बळावर राज्य करीत. या बदलांना राजकीय डावपेचांचा भाग म्हणत हबीब म्हणाले, “राजपूत सुद्धा तितकेच क्रूर होते. याकडे धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही.” जर शासक चांगले रणनीतिकार किंवा तलवारबाज नसते, तर त्या राजघराण्यांचे अस्तित्व टिकले; नसते, असेही त्यांनी नमूद केले. “बदल करण्याची ही पद्धत चुकीची आणि विनोदी आहे,” असे हबीब म्हणाले आणि इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे इतिहासाला पुराणकथेत रूपांतरित करण्याचा मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी महाराज धर्मसहिष्णू
पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, धार्मिक स्थळांवर कधीही हल्ला करू नये याची काळजी शिवाजी महाराज नेहमी घेत असत. यात शिवाजी महाराजांनी केलेल्या एका प्रत्युत्तरात्मक कारवाईचाही उल्लेख आहे. महाराजांनी सुरतेवर हल्ला केला होता आणि हा हल्ला मुघल साम्राज्याच्या सामर्थ्य आणि प्रतिष्ठेला बसलेला मोठा धक्का मानला गेला होता, असे पुस्तकात म्हटले आहे. त्याच्या उलट, सल्तनत काळाचे वर्णन पुस्तकात राजकीय अस्थिरता आणि मंदिरे तसेच ज्ञानकेंद्रांच्या विध्वंसाचा काळ म्हणून केले आहे. अलाउद्दीन खिलजीच्या मोहिमेदरम्यान श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम आणि रामेश्वरम यांसारखी हिंदू केंद्रे हल्ल्याच्या टप्प्यात आली होती, असे पुस्तकात म्हटले आहे.
मुघल साम्राज्याविषयीच्या परिच्छेदात म्हटले आहे की, चित्तोडगडावरील हल्ल्यात अकबराने राजपूतांना घाबरवण्यासाठी, “काफिरांच्या अनेक किल्ल्यांवर आणि शहरांवर कब्जा केला होता आणि तिथे इस्लामचा प्रसार केला.” इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधीकाळी ‘महान अकबर’ म्हणून ओळखला जाणारा अकबर हा आता “क्रूरता आणि सहिष्णुतेच्या मिश्रणाने” राज्य करीत होता, असे म्हटले आहे. तसेच, “अकबराची विविध धर्मांबद्दलची सहिष्णुता वाढत असली तरी प्रशासनातील उच्चपदस्थ पदांवर गैर-मुसलमान कमीच होते…” असेही मजकुरात स्पष्ट केले आहे.