पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गंगा नदीवरील १.८६ किमी लांबीच्या सहा पदरी पुलाचे उदघाटन करणार आहेत. हा आशियातील सर्वांत रुंद सहा पदरी पूल असणार आहे. बिहारमध्ये राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणारा हा नवीन पूल जुन्या दोन पदरी राजेंद्र सेतूवर दीर्घकाळ वाहतूक आणि विलंबाचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये बिहारसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये या पुलाचे बांधकामदेखील समाविष्ट होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर बांधलेल्या औंता-सिमारिया केबल पुलामुळे लाखो लोकांचा प्रवास सुलभ होईल आणि लांबवरचे अंतर सुमारे १०० किमीने कमी होईल. त्यामुळे नदी ओलांडून करावा लागणारा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल. या पुलामुळे केवळ प्रवाशांनाच मदत होणार नाही, तर दोन्ही प्रदेशांमधील व्यापार आणि उद्योगात सुधारणा होईल. त्यामुळे बिहारमधील आगामी निवडणुकांच्या तोंडावर असलेल्या राज्यात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन औंता-सिमारिया पुलाच्या प्रमुख वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊ…

दळणवळण सुधारेल

हा १८७० कोटी रुपये खर्च करून बांधलेला १.८६ किमी लांबीचा आंता-सिमारिया पूल आहे. याचे भारतातील सर्वांत रुंद एक्स्ट्राडोज्ड केबल स्टेड पूल म्हणून वर्णन केले जात आहे. ३४ मीटर रुंदी, ५७ ते ११५ मीटर लांबी व ७० मीटरपर्यंत पसरलेले कॅन्टिलिव्हर आर्म्स असलेला हा पूल उत्तर आणि दक्षिण बिहारमधील वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. जुन्या दोन पदरी राजेंद्र सेतूच्या समांतर हा पूल बांधण्यात आला आहे. आता तो जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. नवीन सहा पदरी रचनेमुळे १०० किमीपेक्षा जास्त अंतराच्या वळणापासून मालवाहतुकीची बचत होण्याची आता शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून नागरिक राजेंद्र सेतूवर अवलंबून होते. १९५९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या पुलाचे उद्घाटन केले होते. १९५० च्या दरम्यान बांधलेल्या या पुलाकडे दक्षिण बिहारसाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा म्हणून पाहिले जात होते. मात्र, वाढत्या रहदारी आणि अवजड वाहनांच्या वाढत्या भारामुळे इथे वारंवार पुलाच्या विस्तारीकरणाची मागणी केली जात होती.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, संपूर्ण भाग सखल असल्याने या प्रकल्पात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पूरसदृश परिस्थिती नसताना इतर काळात केवळ बांधकाम शक्य होते. त्यामुळे हा पूल बांधणे सोपे नव्हते.

या आव्हानांना तोंड देत अभियंत्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रगत पद्धतींचा अवलंब केला. एनएचएआयचे प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक यांनी आऊटलूकला सांगितले की, हा पूल आधुनिक एक्स्ट्राडोज्ड तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे. एका मजबूत रचनेसह आधुनिक अभियांत्रिकीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या पुलामुळे सिमारिया धामसारख्या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाची वाहतूक करण्यातही मोठा फायदा होईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा

नवीन औंता-सिमारिया पुलामुळे उत्तरेकडील बेगुसराय, सुपौल, मधुबनी, पूर्णिया व अररिया आणि दक्षिणेकडील पटना, शेखपुरा, नवादा व लखीसराय या जिल्ह्यांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उत्तर बिहार, पश्चिम चंपारण, सीतामढी, शिवहार, मुझफ्फरपूर, दरभंगा, समस्तीपूर, सहरसा, मधेपुरा, पूर्णिया, कटिहार, गोपाळगंज या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.

mage courtesy: X

आर्थिक विकास

या पुलामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मखाना उत्पादकांसह शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. बरौनीसारख्या औद्योगिक केंद्रांमध्येही मालाची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री व बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह यांनी या प्रकल्पाला एक परिवर्तन प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. आमच्या मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन एनटीपीसी, एक नवीन खत युनिट व एक नवीन रिफायनरी भेट दिली आहे. आता औंता-सिमारिया पूल पूर्ण झाला आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच सहा पदरी पूल तयार झाला आहे आणि बेगुसरायच्या भूमीवर उभा राहिला आहे. बिहारच्या विकासात हा एक मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

कवी रामधारी सिंह दिनकर यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या सिमारिया धामसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठीदेखील या पुलाचा वापर होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, बिहारचे रस्ते बांधकाममंत्री नितीन नवीन यांनी म्हटले की, २०१७ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. तेव्हापासून आतापर्यंत पंतप्रधानांनी बिहारचं दळणवळण आणि बिहारचा विकास मजबूत करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता आणि दृष्टिकोन अधोरेखित केला आहे. पंतप्रधान बिहारकडे भविष्यातील विकास इंजिन म्हणून पाहत आहेत आणि त्यासाठी ते विकासाचा पाया तयार करत आहेत.