Vima Sugam portal आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक जण जीवन विमाचा पर्याय निवडतात. जीवन विमा (लाइफ इन्शुरन्स) तुमच्या आयुष्याला कव्हरेज देण्यासाठी काम करतो. त्यात व्यक्ती आणि विमा पुरवठादार यांच्यात करार असतो. या करारानुसार, जर विमाधारक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अपघात झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर विमा कंपनीकडून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत म्हणून एक विशिष्ट रक्कम मिळते. आता हीच एकूण सुविधा सोपी करण्यासाठी विमा सुगम हे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. काय आहे विमा सुगम? ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळणार? सविस्तर जाणून घेऊयात…

दीर्घ प्रतीक्षेनंतर विमा सुगम पोर्टल सुरू

  • अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वांत मोठ्या विमा उत्पादने आणि सेवांचे ऑनलाइन पोर्टल असलेले ‘विमा सुगम’ अखेर सुरू झाले आहे.
  • बिमा सुगम इंडिया फेडरेशन (बीएसआयएफ)ने बुधवारी आपल्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करीत ही घोषणा केली.
  • ‘बीएसआयएफ’ने स्पष्ट केले की, या व्यासपीठावरील वैशिष्ट्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. सुरुवातीला ही वेबसाइट माहिती आणि मार्गदर्शनाचे केंद्र म्हणून काम करील. तर, येत्या काही महिन्यांमध्ये विमा कंपन्या आणि इतर भागीदारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर सर्व व्यवहार सुरू होतील.
  • त्यामुळे विमा क्षेत्राला नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वांत मोठ्या विमा उत्पादने आणि सेवांचे ऑनलाइन पोर्टल असलेले ‘विमा सुगम’ अखेर सुरू झाले आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

या पोर्टलचे उदघाटन हैदराबाद येथील भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) च्या मुख्यालयात झाले. या कार्यक्रमाला Irdai चे अध्यक्ष अजय सेठ, तसेच उद्योगातील प्रमुख नेते, वरिष्ठ अधिकारी आणि बिमा सुगमची नेतृत्व करणारी टीम उपस्थित होती.
Irdai च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘विमा सुगम’ला जागतिक विमा उद्योगातील एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक उपक्रम मानला जात आहे. अनेक देशांमध्ये विमा खरेदीसाठी डिजिटल माध्यमे आहेत; मात्र तरी इतक्या मोठ्या प्रमाणातील सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ‘विमा सुगम’ची चर्चा सध्या सर्वत्र आहे. या पोर्टलचे उद्दिष्ट जीवन, आरोग्य आणि इतर सर्वसाधारण विमा (ज्यात मोटार, प्रवास, मालमत्ता व कृषी विम्याचा समावेश आहे) यासह सर्व विमा गरजा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे आहे.

काय आहे विमा सुगम?

‘विमा सुगम’ हे विमा कंपन्या, मध्यस्थ आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी तयार केलेले एक एकीकृत डिजिटल व्यासपीठ आहे. या माध्यमातून वापरकर्ते विमा पॉलिसी सहजपणे आणि पूर्ण पारदर्शकतेने खरेदी, विक्री, सेवा व्यवस्थापन, नूतनीकरणदेखील करू शकतात. पॉलिसीची कागदपत्रेही या व्यासपीठावर सुरक्षितपणे साठवली जातील. ज्या प्रकारे आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-वाणिज्य पोर्टलवरून विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करतो, त्याप्रमाणेच विमा सुगम पोर्टल काम करणार आहे. या ऑनलाइन पोर्टलवर अनेक विमा कंपन्या त्यांच्या विमा योजनांचे पर्याय ग्राहकांसाठी खुले करून देणार आहेत.

या व्यासपीठाच्या वापरासाठी शुल्क खूप कमी आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व विमा कंपन्या या पोर्टलचे सदस्य आहेत. त्यापैकी बहुतेक कंपन्यांकडे हे व्यासपीठ चालवणाऱ्या बिमा सुगम इंडिया फेडरेशन (BSIF)मध्ये भागभांडवल (Equity stakes)देखील आहे.
हेच ‘विमा सुगम’ला PolicyBazaar सारख्या खासगी कंपन्यांपेक्षा वेगळे ठरवते. PolicyBazaar सारख्या कंपन्या मुख्यत्वे वितरक (Distributors) म्हणून काम करतात. अशा कंपन्या पॉलिसी विकतात; परंतु दावा निकाली काढणे किंवा संपूर्ण सेवा देत नाहीत. तसेच, त्या ‘विमा सुगम’च्या कमी खर्चाच्या एकीकृत मॉडेलच्या तुलनेत ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेतात.

ग्राहकांना काय फायदा होणार?

पहिल्यांदाच विमा कंपन्या, एजंट, ब्रोकर, बँका आणि ॲग्रीगेटर्स एकाच छताखाली काम करतील, ज्याचा फायदा ग्राहकांना होईल. ग्राहकांसाठी विम्याची तुलना करणे, खरेदी करणे व व्यवस्थापन करणे सोपे होईल. बाजारपेठ म्हणून काम करण्याव्यतिरिक्त हे व्यासपीठ विमासंबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि ग्राहकांना विम्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक केंद्रीकृत डेटाबेस म्हणूनही काम करील. Irdai ने या उदघाटनाला भारताच्या विम्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) तयार करण्याच्या दिशेने पहिले दृश्यमान पाऊल मानले आहे – जो एक असा पाया आहे, जो नागरिकांना आर्थिक संरक्षण कसे मिळेल याची पुन्हा व्याख्या करू शकेल. Irdai चे अध्यक्ष सेठ यांनी ‘विमा सुगम’ला नियामक संस्थेच्या दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे पाऊल म्हटले.

ते म्हणाले, “विमा सुगम हे विम्यासाठी भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम पॉलिसीधारकांना सक्षम करेल, विम्याचा विस्तार वाढवेल.” त्यांनी या उपक्रमाला ‘विकसित भारत २०२४’च्या मोहिमेचा भाग असल्याचे म्हटले. फेडरेशनने आश्वासन दिले की, प्रत्येक पाऊल सुरक्षा, नियमांचे पालन करील, ज्यामुळे वापरकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होईल.

‘विमा सुगम’ची वैशिष्ट्ये

या व्यासपीठावरील सेवांचा विस्तार खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण असेल. त्यात मुदत योजना (Term plans), बचत उत्पादने, वार्षिक योजना आदी सर्व प्रकारच्या जीवन विम्याचा समावेश असेल. तसेच, यात आरोग्य विमा पर्यायदेखील असतील, जो वैद्यकीय आणि आरोग्याच्या सर्व गरजा पूर्ण करील. वाहनांसाठी मोटर विमा उपलब्ध असेल. व्यक्ती व कुटुंबांना प्रवास विमा आणि वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध होईल. तर, व्यवसायांना विविध प्रकारच्या मालमत्ता आणि व्यावसायिक विमा उत्पादनांचा फायदा होईल, ज्यात सागरी (Marine), कृषी आणि उद्योगाशी निगडित विशिष्ट विम्याचा समावेश असेल.

BSIF चे अध्यक्ष राकेश जोशी यांनी सांगितले की, हे उदघाटन राष्ट्रासाठी एक सर्वसमावेशक, अखंड आणि तंत्रज्ञान-आधारित विमा इकोसिस्टीम तयार करण्याचे प्रतीक आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी व सीईओ, तसेच जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे अध्यक्ष तपन सिंघेल म्हणाले, “विमा सुगम भारताच्या विमा क्षेत्रात क्रांती घडवेल आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये जागतिक बेंचमार्क (Global benchmark) स्थापित करील.”