Breast Reconstruction After Cancer: ४० वर्षांच्या लावण्या प्रिया के. या चेन्नईत स्ट्रॅटेजिक एचआर बिझनेस पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे त्यांनी पुन्हा जिममध्ये जाण्यासाठी सुरुवात केली आहे. शिवाय स्विमिंग करतात, मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात. आपल्या १२ वर्षांच्या मुलीबरोबर त्या खेळण्याचा आनंदही लुटतात. पण, दोन वर्षांपूर्वी ही परिस्थिती अशी नव्हती. त्यांची बाहेर पडण्याची इच्छाच हरवून गेली होती. कारणही तसंच होतं… त्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे स्त्रीत्वचं हिरावून गेल्याची भावना निर्माण झाली होती…

स्वतःकडे पाहायलाही घाबरायचे…

लावण्या सांगतात, डावा स्तन काढून टाकण्यात आला होता. त्याआधी ट्युमर कमी करण्यासाठी सात वेळा केमोथेरपी घ्यावी लागली. नंतर १५ वेळा रेडिएशन थेरपी घ्यावी लागली. त्या थेरपीमुळे झालेल्या साईड इफेक्टशीही मी झुंज देत होते. त्यावेळी घडत असलेल्या शरीरातील बदलामुळे मलाच माझ्या शरीराविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली. आत्मविश्वास पुरता गेला होता. मी स्वतःकडे पाहायलाही घाबरायचे, असुरक्षित वाटायचं आणि घराबाहेर पडण्याची इच्छाच होतं नव्हती.

दीर्घकाळ जाणवणाऱ्या मानसिक परिणामांवर चर्चाच होत नाही

आज त्या कर्करोगातून पूर्णतः बऱ्या झाल्या आहेत. इतकंच नाही तर स्तन पुनर्रचना शस्त्रक्रियेमुळे त्या स्वतःला पूर्ण आणि पूर्वीसारखंच झाल्याचं मानतात. त्या सांगतात, या सगळ्या प्रक्रियेत, म्हणजे कॅन्सरशी लढताना… फक्त शरीरावर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली जाते, पण दीर्घकाळ टिकणाऱ्या मानसिक परिणामांवर फारशी चर्चा होत नाही. स्तन गेल्यावर तुमचं स्त्रीत्वच हरवून गेल्याची भावना निर्माण होते. मला असं वाटत होतं की, मी फक्त माझ्या मुलीसाठी जगायला हवं, स्वतःसाठी नाही. पण तो मी माझ्याच विरोधात केलेला सर्वात मोठा अन्याय होता. स्तन पुनर्रचना शस्त्रक्रियेमुळे मला पुन्हा माझ्यासारखंच दिसायची हिंमत मिळाली आहे.

स्तन काढल्यानंतर, आत्मविश्वास हरवतो…

बहुतांश महिलांमध्ये मॅस्टेक्टॉमी म्हणजेच स्तन काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर नकारात्मक भावना निर्माण होते. या गोष्टीचा त्यांच्या लैंगिक आयुष्यावर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. शरीरात बदल होतात, संवेदना कमी होतात, परिणामी आत्मविश्वास हरवतो. या सगळ्या प्रकारामुळे ऊर्जा आणि मानसिक सहनशीलता कमी होते, असे मत वरिष्ठ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. रमेश के. सरिन (इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल) यांनी इंडियन एक्स्प्रेशी बोलताना व्यक्त केले.

प्रोस्थेटिक ब्रा मुळे, पाठदुखी वाढते

स्तन पुनर्रचना शस्त्रक्रिया शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावर महिलांना सावरण्यासाठी मदत करते. स्तन काढल्यानंतर कृत्रिम (प्रोस्थेटिक) ब्रा वापरणाऱ्या अनेक महिलांना शरीराचा तोल बिघडण्याच्या आणि पाठदुखीच्या तक्रारी होतात.

Breast cancer
Breast cancer

जगभरात झालेल्या अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, स्तन पुनर्रचना केल्यानंतर महिला रुग्णांचे जीवनमान सुधारले आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कॅन्सरनंतर येणार्‍या नैराश्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे अपोलो अथेना विमेन्स कॅन्सर सेंटर, नवी दिल्ली येथील स्तन पुनर्रचना शस्त्रक्रियेचे प्रमुख डॉ. वेंकट रामकृष्णन यांनी सांगतात, खरे तर स्तनांच्या कर्करोगामध्ये थेरपीचा एक आवश्यक भाग म्हणून स्तन पुनर्रचनेचा समावेश व्हायला हवा. तो व्हावा या साठी आणि रुग्णांना विमा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

‘माझ्या कुटुंबात कोणालाही यापूर्वी कर्करोग झालेला नव्हता, मी फिटनेसप्रेमी होते. वेळेवर केलेल्या तपासण्यांनी माझे आयुष्य वाचवले.’

लावण्या या कुटुंबातील पहिल्या व्यक्ती आहेत, ज्यांना कर्करोग झाला. विशेष म्हणजे त्या फिटनेस फ्रिक होत्या. त्यामुळेच त्यांना या कॅन्सर विषयी समजायला फार वेळ लागला नाही. त्या सांगतात, “एकदा आंघोळ करताना मला स्तनात गाठीसारखं काहीतरी जाणवलं. वेळ न दवडता आणि इतर कारणांना दोष न देता मी दुसऱ्याच दिवशी तपासणी करून घेतली. स्कॅन स्पष्ट नव्हता, त्यामुळे मला बायोप्सी (ज्यात ऊतींचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण केले जाते) करावी लागली आणि त्यातून घातक ट्यूमर असल्याचे समजले.

काही वेळेस कर्करोग इतका छोटा असतो की…

जलद वाढणारी गाठ ओळखणे सोपे असते, पण हळूहळू वाढणारी गाठ किंवा इतर लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. काही वेळा कर्करोग इतका छोटा असतो की, तो मॅमोग्रॅममध्ये दिसतही नाही. तर काही वेळा स्तनातील जाड ऊतींमुळे ट्यूमर पूर्णपणे लपून राहतो.

Breast cancer
Breast cancer

काही रुग्ण हे त्यांच्या कुटुंबातील कर्करोगाशी लढा देणारे पहिले असतात. जनुकांमधील बदलांमुळे (mutation) आणि सामान्य पेशींतील बिघाडांमुळे यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आम्ही वयाच्या ४० वर्षानंतर लवकर निदान व्हावे यासाठी तपासणी करण्याचा सल्ला देतो. आम्ही नियमित मॅमोग्राफी आणि क्लिनिकल तपासणीव्यतिरिक्त अल्ट्रासाऊंड करतो. यात उच्च वारंवारतेच्या ध्वनिलहरी वापरून स्तनातील ऊतींचे चित्र तयार केले जाते. हे चित्र मॅमोग्राफीबरोबर वापरल्यास अधिक स्पष्ट माहिती मिळते. MRI तपासणीत प्रबळ चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओलहरींच्या साहाय्याने स्तनाच्या ऊतींची अतिशय तपशीलवार प्रतिमा तयार होते. ही तपासणी विशेषतः कर्करोगाचा धोका जास्त असलेल्या किंवा घन स्तनऊती असलेल्या महिलांसाठी सुचवली जाते, असे डॉ. सरिन सांगतात.

तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग का वाढत आहे?

तरुण वयात स्तनाचा कर्करोग होणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने BRCA1 किंवा BRCA2 या जनुकांमधील बदल (mutation) आढळतात, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अयोग्य जीवनशैली आणि आहार, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा किंवा हार्मोन थेरपींचा अतिवापर यांसारख्या घटकांचा आणखी परिणाम होतो. याशिवाय, रासायनिक प्रदूषकांमधील एन्डोक्राइन डिसरप्टर्सचा (हार्मोन्सच्या कार्यात अडथळा आणणारे घटक) नेमका काय परिणाम होतो, याचाही अभ्यास सध्या सुरु आहे.

११ टक्के भारतीय महिलांना स्तनांचा कर्करोग

डॉ. सरिन सांगतात, “भारतात ३५ ते ४५ वयोगटातील सुमारे ११ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, तर पाश्चिमात्य देशांमध्ये हा आकडा ७ टक्के आहे. अनेक वेळा रुग्णांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. म्हणजे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. म्हणूनच लक्षणे असोत वा नसोत, नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. लवकर निदान झाल्यास पूर्णपणे बरे होण्याची शक्यता जास्त असते.”

डॉ. सरिन पुढे सांगतात, “अलीकडे ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हे जवळपास ४० टक्के प्रकरणांमध्ये दिसून येते. या प्रकारात इतर स्तन कर्करोगांमध्ये आढळणारे तीन रिसेप्टर्स (हार्मोन रिसेप्टर्स) नसतात, त्यामुळे उपचारांचे पर्याय कमी असतात. हा कर्करोग प्रामुख्याने तरुण महिलांना होतो आणि तो अधिक आक्रमक स्वरूपाचा असतो.”

शरीर आणि मनातील वेदनांशी झुंज

केमोथेरपीदरम्यान (ज्यात कर्करोगविरोधी औषध रक्तवाहिनीद्वारे किंवा गोळ्यांच्या स्वरूपात दिले जाते) आणि शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिएशन थेरपीदरम्यान लावण्याला अतिशय त्रासदायक दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. यात अतिसार, तीव्र थकवा, केस गळणे, नसांचे नुकसान, त्वचेवर ओरखडे आणि मेंदूतील गोंधळ (ब्रेन हेज) यांसारख्या दुष्परिणामांचा समावेश होता.

“खरं तर, स्तन पुनर्रचना शस्त्रक्रिया मॅस्टेक्टॉमीबरोबर केली असती, तर ती अधिक योग्य ठरली असती. म्हणजे नंतरच्या रेडिएशन थेरपीमुळे पुनर्रचनेच्या ठिकाणी अडचणी येत नाहीत आणि विमा कव्हरही मिळू शकते. पण मला छातीचा संसर्ग झाला होता, त्यामुळे मला तो पूर्णपणे बरा होईपर्यंत म्हणजेच सहा ते आठ आठवडे थांबावे लागले,” असे लावण्या सांगतात.

या काळात, छातीतील संरचनात्मक बदलामुळे ती स्वतःमध्येच गढून गेली. “लोक काय म्हणतील या भीतीने मी बाहेर पडणं बंद केलं. आणि मला हेही ठाऊक नव्हतं की, उशिरा केलेली स्तन पुनर्रचना ही विम्याखाली येत नाही, कारण ती ‘कॉस्मेटिक’ म्हणजेच सौंदर्यविषयक शस्त्रक्रिया म्हणून गणली जाते. या प्रक्रियेचा खर्च साधारण ८ ते १५ लाख रुपयांदरम्यान असल्याने मी तो विचार सोडून दिला,” असे त्या सांगतात.

पण डॉ. वेंकट रामकृष्णन यांनी हार मानली नाही. त्यांनी विमा कंपनीशी सातत्याने संवाद साधून त्यांना पटवून दिलं की, स्तन पुनर्रचना हा कर्करोग उपचारांचा एक आवश्यक भाग आहे आणि लावण्या पुन्हा सामान्यपणे जगू शकेल म्हणून ती गरजेची आहे. त्यांनी दोन महिन्यांपर्यंत चित्रांसह स्पष्टीकरणे देऊन विमा कंपनीला खात्री पटवून दिली आणि शेवटी कंपनीने खर्च देण्यास मान्यता दिली. “खरं तर डॉक्टरांनी माझ्या उजव्या स्तनाचं आकारमान थोडं कमी केलं, म्हणजे डाव्या बाजूच्या पुनर्रचित स्तनाशी तो समतोल साधेल,” असं लावण्या हसत सांगतात.

कोणत्या स्तनकर्करोगातून बऱ्या झालेल्या महिलांना पुनर्रचना करता येते?

“पाश्चिमात्य देशांमध्ये मॅस्टेक्टॉमी झालेल्या सुमारे ६० टक्के महिला स्तन पुनर्रचना (reconstruction) करतात. भारतात हा आकडा फक्त १ टक्का आहे. हा फरक शस्त्रक्रिया करण्याच्या क्षमतेमुळे नाही, तर जाणिवेअभावी आणि चुकीच्या समजुतींमुळे आहे. स्तन पुनर्रचना ही फक्त सौंदर्यवर्धनाची शस्त्रक्रिया आहे असाच अनेकांचा समाज आहे, पण प्रत्यक्षात ते जीवनरक्षक शस्त्रक्रियेमुळे झालेल्या विकृतीची ही वैद्यकीय दुरुस्तीच असते.” असे डॉ. वेंकट रामकृष्णन सांगतात.

स्तन पुनर्रचनेसाठी इम्प्लांट्स (कृत्रिम स्तन) किंवा रुग्णाच्या स्वतःच्या पोट, पाठ किंवा मांड्यांमधील ऊती वापरतात.
“आजच्या काळात पुनर्रचना तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. मायक्रोसर्जिकल रीकन्स्ट्रक्शन मध्ये रुग्णाच्या स्वतःच्या ऊती (सर्वसाधारणपणे पोटातील ऊती) वापरल्या जातात. अनुभवी शल्यविशारदांनी केल्यास याच्या यशाचे प्रमाण ९९ टक्क्यांहून अधिक आहे. या प्रक्रियेला DIEP फ्लॅप शस्त्रक्रिया म्हणतात. ही स्तन काढण्याच्या शस्त्रक्रियेबरोबरच केली जाते आणि फक्त अतिरिक्त दोन तास लागतात. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे; ती कर्करोगाचा धोका वाढवत नाही आणि पुढील उपचारांवरही परिणाम करत नाही,” असे ते सांगतात.

ते पुढे सांगतात, “माझ्या कोणत्याही रुग्णावर यानंतर काहीही दुष्परिणाम झालेले नाहीत. पुनर्रचना केल्याने कर्करोग परत येत नाही आणि आला तरी, पुनर्रचित स्तनामुळे त्याचा शोध घेणे किंवा उपचार करणे कठीण होत नाही. काही वेळा मॅस्टेक्टॉमी आणि पुनर्रचना एकत्र केल्यास शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपीची गरजही कमी लागते.”

मर्यादा आहेत का?

डॉ. वेंकट रामकृष्णन सांगतात. “तरुण आणि कर्करोगाच्या निदानानंतर (prognosis) आयुष्यमान चांगले असेल तर, अशा महिलांनी ही पुनर्रचना शस्त्रक्रिया करावी. पण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांनी.. ज्यांचा आजार गंभीर आहे आणि आयुष्याचा कालावधी ५ ते १० वर्षांदरम्यान अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया आवश्यक नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये या गटातील रुग्णही पुनर्रचना करतात.

डॉ. वेंकट रामकृष्णन सांगतात की, काही विशिष्ट रुग्णांवर स्तन पुनर्रचना (reconstruction) शस्त्रक्रिया केली जात नाही.

  • दाहक (inflammatory) स्तन कर्करोग असलेले रुग्ण: हा एक आक्रमक आणि दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असतो (सुमारे २% प्रकरणे). या प्रकारात त्वचेवर सूज, लालसरपणा आणि जळजळ होते, त्यामुळे पुनर्रचना शस्त्रक्रियेतील धोका वाढतो.
  • अतिशय स्थूल (obese) रुग्ण: जाडपणामुळे शस्त्रक्रियेनंतर जखमा भरायला वेळ लागतो आणि संसर्गाचा धोका वाढतो.
  • हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले रुग्ण: अशा रुग्णांच्या शरीरावर शस्त्रक्रियेचा ताण जास्त पडू शकतो, त्यामुळे धोका टाळण्यासाठी पुनर्रचना केली जात नाही.

लावण्या सांगतात की, कर्करोग आणि त्याच्या उपचारांनी त्यांचं शरीर आणि आयुष्य दोन्ही बदलले. पण त्या अनुभवामुळे त्या मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्या आहेत. त्या सांगतात, “आता मला हे उमगलं आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही वेदनादायक अनुभव आले तरी मी आनंदाने जगण्यास आणि हसण्यास पात्र आहे.”