scorecardresearch

विश्लेषण : पुरुष खरंच गरोदर होऊ शकतात का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ट्रान्सजेंडर आणि पुरुषही गरोदर होऊ शकतात? या चर्चेला उधाण आलं आहे. फॅशन ब्रँड केल्विन क्लेनची नवीन जाहिरातीमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Pregnant
विश्लेषण : पुरुष खरंच गरोदर होऊ शकतात का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बाळाची ओढ असणाऱ्यांसाठी गर्भधारणा आणि ते नऊ महिने हा आनंदाचा भाग असतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चक्रात स्त्रीबिज परिपक्व होते आणि गर्भधारणेसाठी तयार होते. तुम्हाला वाटेल की फक्त महिलांनाच आई बनण्याचा आनंद मिळतो. मात्र आता ट्रान्सजेंडर आणि पुरुषही गरोदर होऊ शकतात? या चर्चेला उधाण आलं आहे. फॅशन ब्रँड केल्विन क्लेनची नवीन जाहिरातीमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जाहिरातीमध्ये ब्राझिलियन रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि ट्रान्समेन रॉबर्टो बेट्टे गर्भवती असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात त्याची जोडीदार एरिका फर्नांडिस देखील दिसत आहे.

प्रकरण काय आहे?

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध फॅशन ब्रँड केल्विन क्लेनची जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या जाहिरातीत ब्रँडने रॉबर्टो बेट्टे गरोदर असल्याचं दाखवलं आहे. यामध्ये त्याची पार्टनर एरिका फर्नांडिसही त्याच्यासोबत दिसत आहे. ही जाहिरात आल्यानंतर काही दिवसांनी रॉबर्टोने मुलगा नोहाला जन्म दिला. मातृत्वाचे गुणगान करणारी ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासाठी काही लोक केल्विन क्लेनचे कौतुक करत आहेत. तर काही जण या जाहिरात सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

गर्भधारणेची प्रक्रिया काय?

गर्भधारणेसाठी साधारणपणे तीन गोष्टी आवश्यक असतात. शुक्राणू, गर्भाशय आणि काही हार्मोन्स. नैसर्गिक प्रक्रियेत पुरुषाच्या वीर्यातून शुक्राणू बाहेर पडतात. त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मादीच्या अंडाशयातून अंडी बाहेर पडतात. जेव्हा नर आणि मादी संभोग करतात तेव्हा शुक्राणू वीर्याद्वारे परिपक्व अंड्यात पोहोचतात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये (स्त्री भाग) फलित करतात. गर्भाधानानंतर ही अंडी स्त्रीच्या गर्भाशयात जाते.त्यामुळे गर्भधारणा सुरू होते. एचसीजी, एचपीएल, इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सची गर्भधारणेला आधार देण्यासाठी आवश्यक असते, जे स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडतात.

ट्रान्सजेंडर गर्भवती होऊ शकते का?

सामान्यतः, लोक जन्माच्या वेळी एकतर पुरुष किंवा मादी असतात. परंतु काही लोक जन्माला आल्यावर त्या लिंगाबाबत तशी जाणीव नसते. असे लोक एकतर ट्रान्समेन किंवा ट्रान्सवुमेन असतात. ट्रान्समेन म्हणजे जन्मतः स्त्री आणि नंतर पुरुष. अंडाशय आणि गर्भाशय असल्यामुळे अशा व्यक्ती माता बनू शकतात. अशा परिस्थितीत, इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या मदतीने, अंडी आणि शुक्राणूंना प्रयोगशाळेत फलित केले जाते आणि नंतर गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते. गर्भधारणेसाठी हार्मोन थेरपी वापरली जाऊ शकते. म्हणजे ट्रान्समेन गर्भवती होऊ शकते. रॉबर्टो बेट्टे देखील एक ट्रान्समेन आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये सिझेरियन प्रसूती केली जाते.

दुसरीकडे ट्रान्सवुमनबद्दल बोलायचं झालं तर, जन्माच्या वेळी नर आणि नंतर मादी असा प्रवास असतो. अशा लोकांसाठी, आई बनणे एक कठीण मार्ग आहे, कारण त्यांच्याकडे अंडाशय किंवा गर्भाशय नसते. गर्भाशय प्रत्यारोपणाचा केल्यास जीवाला धोका असतो. तथापि, याबद्दल बरेच संशोधन सुरु आहे आणि लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील.

गर्भाची वाढ

गर्भाला सहा आठवडे झाले की बाळाच्या हृदयासह सर्वच अवयव तयार होऊ लागलेले असतात. तीन महिने पूर्ण व्हायच्या सुमारास गर्भाचा प्रत्येक अवयव तयार झालेला असतो, मात्र ते कार्यक्षम नसतात. पुढील सहा महिन्यांत हे अवयव आकारने वाढतात आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते. गरोदरपणाचा तिसरा महिना (८ ते १२ आठवडे) या जडणघडणीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात काही विशिष्ट औषधे किंवा ‘एक्स-रे’ सारखा किरणोत्सर्ग घेण्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे काही व्यंग निर्माण होऊ शकते. मातेचे वय ३६ वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तिला मधुमेह असेल किंवा रक्ताच्या नात्यात काही जनुकीय आजार असेल तरीही बाळात व्यंग येण्याची शक्यता असते. अनेकदा काही विशिष्ट कारण दिसत नसतानाही बाळात व्यंग असू शकते. चौथा महिना सुरू झाला की बाळ गर्भाशयात तयार झालेले असते व पुढे त्याची वाढ होत जाते. २४ आठवडय़ांच्या आधी जन्मास आलेली बाळे जगू शकत नाहीत, परंतु त्यानंतर जन्मास आलेल्या ‘प्रीमॅच्युअर’ बाळांनाही जगवण्यासाठी प्रयत्न करता येतात.

पुरुषाला गर्भधारणा होऊ शकते का?

सर्वसाधारणपणे पुरुष आई होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे शुक्राणू असतात, गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी अंडी आणि गर्भाशय नसते. आता प्रश्न उद्भवतो की आयव्हीएफ आणि गर्भाशय प्रत्यारोपणाद्वारे पुरुष गर्भवती होऊ शकतो का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. कारण आयव्हीएफच्या साहाय्याने लॅबमध्ये गर्भाधान केले जात असले तरी पुरुषाच्या शरीरात गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणे सोपे नाही. गर्भाशयाला आधार देण्यासाठी अनेक जैविक प्रक्रियांची आवश्यकता असते, जी पुरुषाच्या शरीरात शक्य नसते. जर एखाद्या पुरुषाला आई बनायचे असेल तर त्याच्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे एब्डॉमिनल गर्भधारणा आहे. हे अगदी दुर्मिळ आहे. एका अहवालानुसार, दर १०,००० गर्भधारणेपैकी एक गर्भधारणा ही एब्डॉमिनल गर्भधारणा असते. अशाप्रकारे केवळ पुरुषच नाही तर गर्भाशय नसलेल्या स्त्रिया देखील गर्भवती होतात.

एब्डॉमिनल गर्भधारणा

एब्डॉमिनल गर्भधारणेमध्ये, अंडी आणि शुक्राणूंना प्रथम इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या मदतीने प्रयोगशाळेत फलित केले जाते. त्यानंतर प्रयोगशाळेतच भ्रूण म्हणून विकसित केले जाते. यानंतर त्याचे ओटीपोटात प्रत्यारोपण केले जाते. ही प्रक्रिया खूप धोकादायक आहे आणि कधीकधी जीव देखील गमावला जातो. जेव्हा गर्भ यशस्वीरित्या ओटीपोटात प्रत्यारोपित केला जातो तेव्हा प्लेसेंटा विकसित होतो. म्हणजेच बाळाला पोषण मिळू लागते. यानंतर, गर्भधारणा टिकवण्यासाठी हार्मोन थेरपीची मदत घेतली जाते. तरच माणूस आई होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can men really get pregnant know about it rmt