Lawrence Bishnoi Gang Latest News : कॅनडा सरकारने सोमवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. फौजदारी संहितेअंतर्गत हा निर्णय आल्याची माहिती कॅनेडियन सरकारच्या वतीने देण्यात आली. त्यासंदर्भातील अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या या निर्णयामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणले गेलेले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅनडाने बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून का घोषित केले? त्यांच्या या निर्णयाचा भारताला काय फायदा होणार? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…
कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याची माहिती सोमवारी माध्यमांना दिली. “बिश्नोई टोळी ही एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना असून कॅनडाच्या विविध भागांमध्ये सक्रिय आहे. हत्या, गोळीबार आणि जाळपोळ यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीतील सदस्यांचा समावेश आहे. त्यांनी विशिष्ट समुदायातील प्रमुख सदस्य तसेच व्यावसायिक आणि सांस्कृतिक व्यक्तींना लक्ष्य केले आहे. बिश्नोई टोळीमुळे देशात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात येत आहे,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा जन्म १९९३ मध्ये पंजाबमधील एका छोट्याशा गावात झाला. त्याच्याकडे १०० एकरहून अधिक जमीन असल्याचे सांगितले जाते. विशेष बाब म्हणजे बिश्नोई याचे वडील पूर्वी पंजाब पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने चंदीगडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. डीएव्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना बिश्नोईने पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्याच काळात त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. विद्यार्थी राजकारणात असतानाच बिश्नोईला जाळपोळ, खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण आणि दरोडा अशा आरोपांखाली अनेकदा अटक झाली होती.
लॉरेन्स बिश्नोईवर डझनभर गुन्ह्यांनी नोंद
लॉरेन्स बिश्नोई याच्यावर हत्या आणि खंडणीसह जवळपास २४ गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करते. तसेच हत्या आणि गुन्हेगारांना या टोळीकडून संरक्षण दिले जाते. २०१२ मध्ये बिश्नाईला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी तिहारच्या तुरुंगात करण्यात आली. २०१५ पासून तो गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. मात्र, तुरुंगातूनही त्याने आपले गुन्हेगारी विश्व सोडलेले नाही. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅनडा आणि अमेरिकेपर्यंत त्याच्या टोळीने गुन्हेगारी जाळे पसरवले आहे. २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे बिश्नोई प्रकाशझोतात आला होता. ही हत्या दुसऱ्या एका गटाशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून केल्याचा दावा या टोळीकडून करण्यात आला.
सलमान खानला दिली होती जीवे मारण्याची धमकी
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर बिश्नोईची बरीच चर्चा झाली होती. १९९८ मध्ये राजस्थानमध्ये दोन काळवीट मारल्याच्या आरोपावरून बिश्नोईने खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता आणि पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी आपण बिश्नोई टोळीतील सदस्य असल्याची कबुली दिली होती. डिसेंबर २०२३ मध्ये जयपूरमध्ये उजव्या विचारसरणीचे नेते सुखदेव सिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारीही बिश्नोई टोळीने घेतली होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्याही आपणच केल्याचे बिश्नोई टोळीने सांगितले होते.
लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातूनच चालवतो गुन्हेगारी साम्राज्य
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातूनच त्याचे मोठे गुन्हेगारी साम्राज्य चालवतो.त्याच्या गँगकडे तब्बल ७०० हून अधिक शार्पशूटर्स असून उत्तर अमेरिकेतही अनेक साथीदार कार्यरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना परदेशातील चांगल्या आयुष्याचे आमिष दाखवून या टोळीमध्ये ओढले जाते. बिश्नोईचा जवळचा सहकारी गोल्डी ब्रार हा कॅनडामधून आपली टोळी चालवतो. बिश्नोईचा संबंध बब्बर खालसा इंटरनॅशनलसह (BKI) अनेक खलिस्तान समर्थक गटांशी जोडला गेला आहे. या टोळीकडे कॅनडामध्ये अनेक लपण्याची ठिकाणे असल्याचे सांगितले जाते. कॅनडामध्ये झालेल्या हिंसाचार आणि गोळीबारांशीही बिश्नोई टोळीचा संबंध जोडला गेला आहे. या टोळीने आजवर अनेकांच्या हत्या केल्याचा आरोप आहे.
कॅनडातील अधिकाऱ्यांचा दावा काय?
कॅनडातील अधिकाऱ्यांचा दावा आहे की, बिश्नोई टोळीचे सदस्य दक्षिण आशियाई वंशाच्या अनेक व्यावसायिकांना लक्ष्य करीत आहेत. अल्बर्टामध्ये या टोळीने एका व्यावसायिकाकडून ३,६०,००० कॅनेडियन डॉलरची (सुमारे ३ कोटी रुपये) खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. ओंटारियोमधील पोलिसांनीही ही टोळी खंडणीसाठी व्यावसायिकांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे. बिश्नोई टोळीच्या कार्यपद्धतीचा मोठा भाग अद्यापही गुलदस्त्यात आहे. ‘Who Killed Moosewala’ या पुस्तकाचे लेखक जुपिंदरजीत सिंग यांनी म्हणाले, “लॉरेन्स नेहमीच म्हणतो की मला काहीतरी मोठे काम करायचे आहे. मुसेवालाची हत्या करणे, सलमान खानवर हल्ला करणे आणि आता सिद्दीकी यांची हत्या करणे हेच त्याचे मोठे काम होते. अशा प्रत्येक हल्ल्यामुळे त्याच्या नावाला ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळते आणि बिश्नोई टोळीकडून घेतली जाणाऱ्या खंडणीच्या रक्कम वाढते.”
भारत-कॅनडा यांच्यातील संबंध सुधारणार?
भारताने अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र, कॅनडा सरकारकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नव्हती. आता मात्र या टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याने कॅनडातील अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास कायदेशीर बळ मिळणार आहे. या निर्णयानंतर कॅनडियन सरकारला बिश्नोई टोळीची मालमत्ता, रोख रक्कम, वाहने आणि अन्य संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे. इतकेच नाही तर भारतातील दहशतवादी कारवायांना निधी पुरवल्याबद्दल या टोळीतील सदस्यांना अटकही केली जाणार आहे. त्याशिवाय संशयित सदस्यांना कॅनडामध्ये प्रवेश नाकारला जाणार असल्याचे कॅनेडियन अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यामुळे भारत-कॅनडा संबंध पुन्हा सुधारण्याच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होत आहे.