केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) २०२६-२७ पासून नववीच्या वर्गात ओपन बुक असेसमेंट सुरू करणार आहे. अभ्यासातील या कल्पनेला शिक्षकांचा मजबूत पाठिंबा मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई नियामक मंडळाने जून महिन्यात या योजनेला मंजुरी दिली. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या पायलट प्रकल्पांतर्गत नववी आणि दहावीसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान तसंच अकरावी आणि बारावीसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांवर ओपन बुक असेसमेंट घेण्यात आली. या निर्णयामुळे ओपन बुक असेसमेंट आणि त्यांचे भारतातील शाळांमधील स्थान यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
ओपन बुक असेसमेंट म्हणजे नेमकं काय?
ओपन बुक असेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वर्गातील नोंदी किंवा इतर निश्चित शैक्षणिक सामग्री वापरण्याची परवानगी असते. यामध्ये केवळ पाठांतरावर भर न देता योग्य माहिती कुठे आहे हे शोधण्याची, ती समजून घेण्याची आणि दिलेल्या समस्येवर लागू करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते.
याचं उदाहरण म्हणजे, विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत सर्व माहिती विद्यार्थ्यांसमोर असली तरी खरी परीक्षा ही आहे की, त्या गोष्टी एकमेकांशी जोडून योग्य निष्कर्ष विद्यार्थी कसा काढतात. अशा परीक्षा केवळ माहिती सांगण्याऐवजी कल्पना समजून घेण्याची आणि त्याचे विश्लेषण करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता तपासतात.
जगात ओपन बुक असेसमेंट कुठे होतात?
ओपन बुक असेसमेंट अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. हाँगकाँगमध्ये १९५३ मध्ये त्यांचा प्रत्यक्षात उपयोग सुरू झाला. २००४ मध्ये मिंग-यिन-चॅन आणि क्वोक-वाई मुंई यांनी केलेल्या अभ्यासात प्रथमच ओपन बुक असेसमेंट देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पद्धत आवडली. मात्र, ते फार तयारी करत नसत. बहुतेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका पाहून १० ते १५ मिनिटांत साहित्य शोधत आणि प्रामुख्याने शिक्षकांचे नोट्स पाहात, नंतर पाठ्यपुस्तकांकडे वळत. १९५१ ते १९७८ दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनमधील प्रयोगांमध्ये पाठ्यपुस्तके, नोट्स आणि लेक्चर नोट्स वापरण्याची परवानगी होती. छोट्या उत्तरांपासून निबंध आणि प्रश्नोत्तरांपर्यंत विविध स्वरूपात या परीक्षा घेण्यात आल्या. २०२२ मध्ये ममता आणि नितीन पिल्लई यांच्या टुवर्ड्स एक्सेलन्स जर्नलमधील अभ्यासानुसार, अशा परीक्षा पाठांतराऐवजी संकल्पना आत्मसात करण्यात मदत करतात, तसंच दुर्बल विद्यार्थ्यांचे निकाल चांगले येण्यात मदत होते. असं असताना हाय-स्टेक्स शालेय परीक्षांमध्ये ओपन बुक असेसमेंट अजूनही दुर्मीळ आहे. ब्रिटनची जीसीएसई किंवा अमेरिकेची सॅट यांसारख्या मोठ्या परीक्षा अजूनही क्लोज्ड बुक स्वरूपातच घेतल्या जातात.
कोविड-१९ काळात मात्र अनेक विद्यापीठांनी तात्पुरत्या स्वरूपात ओपन बुक, ओपन नोट किंवा ओपन वेब परीक्षा घेतल्या. सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीशी जुळवून घेण्यात काही अडचणी आल्या.
भारतात ओपन बुक असेसमेंट नवीन आहे का?
भारतात ओपन बुक असेसमेंट नवीन नाही. २०१४ मध्ये सीबीएसईने ओपन टेक्स्ट बुक असेसमेंट सुरू केली होती, त्यामुळे पाठांतरापासून दूर जाण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये नववीच्या हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि अकरावीच्या अर्थशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल यांसाठी चार महिने आधी संदर्भ साहित्य दिले जाते. मात्र, २०१७-१८ मध्ये हा प्रयोग थांबवण्यात आला. कारण विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्रिटिकल अॅबिलिटीज विकसित झाल्या नाहीत.
महाविद्यालयीन स्तरावर ओपन बुक असेसमेंटचा वापर जास्त आहे. २०१९ मध्ये AICTE ने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्याला मान्यता दिली. कोविडच्या काळात दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, जेएनयू, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, तसंच आयआयटी दिल्ली, आयआयटी इंदूर, आयआयटी बॉम्बे यांनी ऑनलाइन पद्धतीने ओपन बुक असेसमेंट घेतल्या. दिल्ली विद्यापीठाने पहिली ओपन बुक असेसमेंट ऑगस्ट २०२० मध्ये घेतली आणि शेवटची मार्च २०२२ मध्ये घेतली. जानेवारी २०२२ पासून त्यांनी पुन्हा प्रत्यक्ष परीक्षा सुरू केल्या. मात्र, नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक ओपन बुक असेसमेंट घेतली. नुकतीच केरळ उच्च शिक्षण सुधारणा आयोगाने ही पद्धत केवळ अंतर्गत किंवा प्रॅक्टिकल परीक्षांसाठी वापरण्याची शिफारस केली.
ओपन बुक असेसमेंटसंदर्भातील अभ्यास काय सांगतो?
२००० मध्ये नॉर्वेमधील एका अभ्यासानुसार, ओपन बुक असेसमेंट देणारे विद्यार्थी केवळ तथ्य आठवण्याऐवजी कल्पनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न जास्त करतात. अभ्यासकांच्या मते, ही पद्धत विद्यार्थ्यांना पुस्तकातील योग्य पान शोधण्यापलीकडे मदत करतात. एम्स भुवनेश्वरमधील संशोधनानुसार, वैद्यकीय विद्यार्थ्यांना ओपन बुक असेसमेंटमध्ये कमी ताण जाणवला. भारतातील आणखी एका ऑनलाइन पायलट अभ्यासक्रमात ९८ पैकी ७८.६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी अनेकांनी ही पद्धत तणावमुक्त असल्याचे म्हटले. मात्र, इंटरनेट केनक्टिव्हिटी हा मोठा अडथळा असल्याचे सांगितले. दिल्ली विद्यापीठातील धनंजय अश्री आणि बिभू पी साहू यांच्या अभ्यासानुसार, ओपन बुक असेसमेंटमध्ये विद्यार्थी जास्त गुण मिळवतात. या पद्धतीसाठी विशेष प्रशिक्षण दिले नसले तरी ममता आणि नितीन पिल्लई यांच्या मते, खरी प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नांचे विभाजन, संकल्पनांचे विश्लेषण आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे शिकवणे गरजेचे आहे.
सीबीएसई आता ओपन बुक असेसमेंट का लागू करत आहे?
हा निर्णय शाळांमधील मूल्यांकन पद्धतीत व्यापक बदलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने थेट ओपन बुक असेसमेंटचा उल्लेख केला नसला तरी पाठांतरापासून दूर जात कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले आहे. याचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे, प्रक्रिया ओळखणे आणि त्या कशा लागू करायच्या हे सांगता यावे असे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) देखील असेच म्हणते की, सध्याच्या परीक्षा जास्तीत जास्त पाठांतर मोजतात आणि वाईट म्हणजे भीती निर्माण करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी विविध शिकण्याच्या पद्धतींना पूरक, अभिप्राय देणाऱ्या आणि एकूण शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी उपयुक्त अशा परीक्षा पद्धतींची गरज आहे.