Mission Sudarshan Chakra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात ‘मिशन सुदर्शन चक्र’ सुरू करण्याची घोषणा केली. “मी लाल किल्ल्यावरून हे सांगतोय की, येणाऱ्या १० वर्षांत म्हणजे २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना, जसे की रुग्णालय, रेल्वे, आस्था केंद्रे यांना टेक्नॉलॉजीच्या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे पूर्णपणे सुरक्षा कवच दिले जाईल,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते नक्की काय म्हणाले? काय आहे ‘मिशन सुदर्शन चक्र’? या योजनेमुळे भारतीय सैन्याला कशी ताकद मिळेल? त्याविषयी जाणून घेऊयात…
जनरल अनिल चौहान काय म्हणाले?
‘मिशन सुदर्शन चक्र’ या योजनेंतर्गत भारताची एक हवाई संरक्षण प्रणाली (air defence system) विकसित करण्याची योजना आहे, जी इस्रायलच्या प्रसिद्ध ‘आयर्न डोम’ सारखी असेल. मऊ येथील आर्मी वॉर कॉलेजमधील एका कार्यक्रमात बोलताना सीडीएस चौहान म्हणाले, “त्यात शत्रूच्या हवाई वाहनांचा (Air vectors) शोध घेण्यासाठी, त्यांना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना निष्क्रिय करण्यासाठी मजबूत सुविधा असतील. त्यात ‘सॉफ्ट किल्स’ आणि ‘हार्ड किल्स’ अशा दोन्हींचा वापर केला जाईल. तसेच त्यामध्ये ‘कायनेटिक’ आणि ‘डायरेक्ट एनर्जी’ शस्त्रे अशा दोन्हींचा समावेश असेल.”
‘मिशन सुदर्शन चक्र’ म्हणजे काय?
- सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या योजनेंतर्गत, “२०३५ पर्यंत देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली शस्त्रास्त्रे सुसज्ज केली जातील. या मिशनचा उद्देश केवळ शत्रूच्या हल्ल्यांना निष्क्रिय करणे नसून, सुदर्शन चक्राप्रमाणेच प्रभावी प्रतिहल्ले (Counterstrikes) करणे हादेखील आहे. हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षा अभेद्य करण्यासाठी आणि शत्रूंविरोधात लक्ष्यित हल्ले करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा सिद्ध होईल.”
- मुळात ‘सुदर्शन चक्र’ ही पाळत ठेवणारी उपकरणे (Surveillance equipment), जॅमर्स, सायरन, रडार, शस्त्रास्त्रे यांची एक प्रणाली असेल.
- ही प्रणाली हवाई धोके ओळखून भारतीय ठिकाणांवर हल्ला करण्यापूर्वीच त्यांना निष्प्रभ करील.
- या प्रणालीचे नाव भगवान विष्णूच्या चक्रावरून ठेवण्यात आले आहे.

ही प्रणाली कसे कार्य करील?
शत्रूच्या हवाई वाहनांना निष्क्रिय करणे म्हणजे प्रथम येणाऱ्या धोक्याला (क्षेपणास्त्रे, बॉम्ब, ड्रोन, इत्यादी) रोखणे, आवश्यक असल्यास त्या धोक्याबद्दल सतर्क करणे आणि नंतर त्या धोक्याला निष्क्रिय करणे, अशा पद्धतीने ही प्रणाली कार्य करील. सीडीएस चौहान यांनी सॉफ्ट किल्स आणि हार्ड किल्स, तसेच कायनेटिक आणि डायरेक्ट एनर्जी शस्त्रे अशा दोन्हींचा उल्लेख केला. सॉफ्ट किल म्हणजे येणाऱ्या धोक्याला थांबवणे किंवा दिशाभूल करणे यासाठी सायबर उपाययोजना वापरणे आणि हार्ड किल म्हणजे त्या धोक्याला भौतिकरीत्या नष्ट करणे.
कायनेटिक शस्त्र स्वतःच्या वेगाच्या बळावर लक्ष्याला नष्ट करते. उदाहरणार्थ, एक क्षेपणास्त्र मोठ्या वेगाने येऊन ,त्याच्या लक्ष्यावर आदळते. दुसरीकडे डायरेक्ट एनर्जी शस्त्र थेट लक्ष्यावर ऊर्जा केंद्रित करते, जसे की एखाद्या ड्रोनला निष्क्रिय करण्यासाठी लेसर बीमचा वापर करणे. हवाई संरक्षणातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आक्रमण. त्यात शत्रूची हल्ला करण्याची क्षमता, संभाव्य हल्ल्याआधीच नष्ट केली जाते. या सर्व गोष्टींसाठी गुप्तचर माहिती गोळा करणे, डेटा संकलन व विश्लेषण, रणनीती यांमध्ये खूप समन्वय आवश्यक असतो.
या दिशेने कोणती पावले उचलली गेली आहेत?
रविवारी (२४ ऑगस्ट) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) स्वदेशी बनावटीच्या एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS)ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ घेण्यात आली. त्यात तीन वेगवेगळ्या लक्ष्यांना वेगवेगळ्या श्रेणी आणि उंचीवर एकाच वेळी नष्ट करण्यात आले. IADWS ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. त्यात क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाइल्स (QRSAM), व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि लेसर असलेले डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) यांचा समावेश आहे.
इस्रायलचा ‘आयर्न डोम’ काय आहे?
जेव्हा जेव्हा हवाई संरक्षणाची चर्चा होते, तेव्हा तेव्हा ‘आयर्न डोम’चा उल्लेख केला जातो. ‘आयर्न डोम’ ही एक कमी पल्ल्याची, जमिनीवरून हवेत मारा करणारी हवाई संरक्षण प्रणाली आहे. त्यात एक रडार आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे आहेत, जी इस्त्रायली लक्ष्यांवर मारा करण्यासाठी येत असलेल्या रॉकेट्स किंवा क्षेपणास्त्रांचा मागोवा घेतात आणि त्यांना निष्क्रिय करतात. त्याचा वापर रॉकेट्स, तोफखाना, मोर्टार, तसेच विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोन्स यांना निष्प्रभ करण्यासाठी केला जातो.
२००६ च्या इस्रायल-लेबनॉन युद्धानंतर जेव्हा हिजबुल्लाहने इस्रायलवर हजारो रॉकेट्स डागली, तेव्हा हवाई धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आयर्न डोमची मदत घेण्यात आली. ‘आयर्न डोम’ २०११ मध्ये तैनात करण्यात आला. इस्रायलकडे ‘डेव्हिड्स स्लिंग’ व ‘ॲरो’ प्रणालीदेखील आहे. त्यांची श्रेणी ‘आयर्न डोम’पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ते दूरच्या लक्ष्यांना रोखू शकतात. त्यानंतर ‘आयर्न बीम’देखील आहे. ‘आयर्न बीम’ कमी पल्ल्याचा आहे; परंतु लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी लेसर बीमचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्याचा अधिक उपयोग होतो.