चीनने त्यांच्या देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिसा धोरणात शिथिलता आणली आहे. या निर्णयामुळे येत्या काळात चीनमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. चीनच्या व्हिसा धोरणांमध्ये शिथिलता आणल्यानंतर ७४ देशांचे नागरिक आता ३० दिवसांसाठी व्हिसाशिवाय चीनमध्ये राहू शकतात. पर्यटन, चीनची अर्थव्यवस्था आणि त्याच्या सॉफ्ट पॉवरचा विस्तार करण्याच्या उद्देशाने चीनने हे पाऊल उचलले आहे. असे असले तरीही या बाबतीत चीनने परवानगी दिलेल्या देशांमध्ये भारताचा मात्र समावेश नाही. तसेच यात पाकिस्तानचाही समावेश नाही.
चीनच्या राष्ट्रीय इमिग्रेशन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये दोन कोटींहून अधिक परदेशी पर्यटकांनी व्हिसाशिवाय चीनला भेट दिली. २०२३ च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे आणि एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुमारे एक-तृतियांश आहे.
चीन पर्यटनाला चालना का देतेय?
कोविड-१९ नंतर कडक निर्बंध उठवल्यानंतर चीनने २०२३च्या सुरुवातीला पर्यटकांसाठी त्यांचे नियम शिथिल केले. मात्र, त्या वर्षी फक्त १.३८ कोटी लोकांनीच चीनला भेट दिली. २०१९ मध्ये ३.१९ कोटी लोकांनी चीनला भेट दिली होती. डिसेंबर २०२३ मध्ये चीनने फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्पेन व मलेशियाच्या नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केली. गेल्या महिन्यात पाच लॅटिन अमेरिकन देश आणि उझबेकिस्तानमधील प्रवासी यासाठी पात्र ठरले. त्यानंतर मध्य पूर्वेतील चार, तर अझरबैजानच्या समावेशासह १६ जुलै रोजी एकूण ७५ प्रवासी चीनमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतील. सुमारे दोन-तृतियांश देशांना एक वर्षाच्या चाचणी आधारावर व्हिसामुक्त प्रवेश देण्यात आला आहे. आफ्रिकेचे चीनशी तुलनेने जवळचे संबंध असूनही कोणताही मोठा आफ्रिकन देश व्हिसामुक्त प्रवेशासाठी पात्र नाही.
चीनचा आणखी एक पर्याय
व्हिसामुक्त योजनेत नसलेल्या १० देशांतील लोकांना दुसरा पर्यायही देण्यात आला आहे. ते ज्या देशातून आले आहेत, त्या देशाव्यतिरिक्त ते वेगळ्या देशात निघून गेले, तर त्यांना १० दिवसांपर्यंत चीनमध्ये प्रवेश करता येईल. देशाच्या राष्ट्रीय इमिग्रेशन प्रशासनानुसार, हे धोरण ६० बंदरांवरील प्रवेशासाठी मर्यादित आहे.
ही ट्रान्झिट पॉलिसी ५५ देशांना लागू आहे; मात्र यातील बहुतेक देश ३० दिवसांच्या व्हिसामुक्त प्रवेश यादीतदेखील समाविष्ट आहेत. यूके वगळता स्वीडन हा एकमेव उच्च उत्पन्न असलेला युरोपीय देश आहे, जो चीनच्या ३० दिवसांच्या व्हिसामुक्त प्रवेश यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. २०२० मध्ये सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाने स्वीडिश पुस्तक विक्रेत्या गुई मिन्हाईला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यापासून स्वीडनचे चीनशी असलेले संबंध बिघडले आहेत. २०१५ मध्ये गुई थायलंडमधील समुद्रकिनारी असलेल्या त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता. मात्र काही महिन्यांनंतर त्याला चीनमध्ये पोलीस कोठडीत पाठविण्यात आले. परिणामी स्वीडन चीनच्या व्हिसा-मुक्त प्रवासाच्या यादीत समाविष्ट नाही.
“हा पर्याय लोकांना प्रवास करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण- व्हिसासाठी अर्ज करणे आणि त्यासाठीच्या प्रक्रिया लांबलचक व त्रासदायक आहेत”, असे ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या जॉर्जियन जॉर्जी शवाडझे यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले.
बहुतेक पर्यटनस्थळी परदेशी पर्यटकांपेक्षा देशांतर्गत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळात आणखी पर्यटक चीनमध्ये येतील या अपेक्षेने ट्रॅव्हल कंपन्या आणि टूर गाईड आता मोठ्या प्रमाणात येथे येण्याची तयारी करीत आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषक टूर गाईड बनण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही प्रशिक्षण देण्यासाठी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे, असे एका २० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या इंग्रजी भाषक टूर गाईडने सांगितले.
ठळक मुद्दे:
- चीन देत आहे पर्यटनाला चालना
- ही पॉलिसी ५५ देशांना लागू होती
- आता जवळपास ७४ देशांना व्हिसा-मुक्त ३० दिवसांसाठी राहण्याची परवानगी
- २०२४ मध्ये दोन कोटींहून अधिक परदेशी पर्यटकांनी व्हिसाशिवाय चीनला भेट दिली
- स्वीडनचा या यादीत समावेश नाही
नवीन व्हिसा धोरणे आमच्यासाठी १०० टक्के फायदेशीर आहेत, असे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोविड १९ पूर्वीच्या तुलनेत पर्यटन व्यवसाय आता ५० टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बुटीक आणि लक्झरी मार्गांमध्ये विशेषज्ञ असलेल्या वाइल्ड चायनाच्या व्यवस्थापकीय संचालक जेनी झाओ यांनी दिली. अमेरिका हा चीनचा सर्वांत मोठा स्रोत आहे. चीनच्या सध्याच्या व्यवसायातील सुमारे ३० टक्के वाटा अमेरिकेचा आहे. परंतु झाओ यांच्या मते, युरोपियन प्रवासी आता त्यांच्या ग्राहकांपैकी १५-२० टक्के इतके आहेत. ते २०१९ पूर्वी पाच टक्क्यांपेक्षा कमी होते. “हे फायदे असेच सुरू राहतील अशी आशा आम्हाला आहे”, असंही झाओ म्हणाल्या.
शांघायस्थित ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या ट्रिप डॉट कॉम ग्रुपने म्हटले आहे की, व्हिसामुक्त धोरणामुळे पर्यटनाला लक्षणीयरीत्या चालना मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत चीनच्या प्रवासासाठी त्यांच्या वेबसाइटवर विमान, हॉटेल आणि इतर बुकिंग दुप्पट प्रमाणात झाल्या आहेत. त्यामध्ये ७५ टक्के पर्यटक व्हिसामुक्त पर्यटनाची परवानगी असलेल्या देशांमधून आलेले आहेत