China’s Deep-Sea ‘Space Station’: चीनने अधिकृतपणे दक्षिण चीनच्या खोल समुद्रात सागरी संशोधन केंद्राच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी अन्वेषण आणि भूराजकीयदृष्ट्या याचा फायदा होणार आहे. हे केंद्र खोल समुद्रातील अंतराळ स्थानक म्हणूनही ओळखले जाते. समुद्राच्या पृष्ठभागाखाली २००० मीटर (६५६० फूट) खाली या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. हे अत्याधुनिक स्थानक २०३० पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या स्थानकावर एका वेळी सहा शास्त्रज्ञ एका महिन्यापर्यंतच्या विस्तारित मोहिमांसाठी संशोधन करू शकतील.

खोल समुद्र संशोधन केंद्राची वैशिष्ट्ये

चीनच्या खोल समुद्र संशोधन केंद्राची उभारणी समुद्रसपाटीपासून २००० मीटर (६५६० फूट) खोलीवर करण्यात येणार आहे. हे अत्याधुनिक केंद्र २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून एका वेळी सहा शास्त्रज्ञांना सामावून घेऊ शकेल. संशोधन मोहिमांचा कालावधी एका महिन्यापर्यंत असेल. या केंद्राचा मुख्य उद्देश थंड झऱ्यांच्या परिसंस्था आणि मिथेन हायड्रेट्स यांचा सखोल अभ्यास करणे हा आहे. हे संशोधन केंद्र तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल आणि मानवरहित पाणबुडी, पृष्ठभागावरील जहाजे तसेच समुद्रतळ निरीक्षण केंद्रांबरोबर समन्वय साधून काम करेल.

उद्दिष्टे आणि संशोधनाचा केंद्रबिंदू

खोल समुद्रातील हे स्थानक मुख्यतः थंड झर्‍यांच्या परिसंस्थांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करेल. या परिसंस्थांमध्ये मिथेनयुक्त हायड्रोथर्मल झर्‍यांचा समावेश असतो. या झर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन हायड्रेट्स (ज्वलनशील बर्फ) देखील आढळतो, जो महत्त्वाचा ऊर्जा स्रोत मानला जातो.

अधिक वाचा: China-Cook Islands Agreement: व्यापार की सामरिक विस्तारवाद; चीनचा कूक आयलंड्सबरोबरचा करार का ठरत आहे चिंतेची बाब?

महत्त्वाचे संशोधन क्षेत्र

या संशोधन केंद्राचा एक महत्त्वाचा उद्देश समुद्रतळातून मिथेनच्या उत्सर्जनावर देखरेख ठेवून त्याचा हवामानावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे हा आहे. तसेच, खोल समुद्रातील जैवविविधतेचा सखोल अभ्यास करून वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या प्रजाती शोधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. भूगर्भीय हालचालींचे निरीक्षण करून भूकंप आणि त्सुनामीच्या अंदाजांना अधिक अचूकता देण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय, मिथेन हायड्रेट्सच्या स्वरूपात असलेल्या सागरी ऊर्जासाधनांचा शोध घेऊन त्याचा पर्यायी ऊर्जा स्रोत म्हणून वापर करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे.

तांत्रिक आणि रणनीतिच्या दृष्टीने महत्त्व

हे खोल समुद्रातील संशोधन केंद्र पाण्याखाली असलेल्या जगातील अत्याधुनिक सुविधांपैकी एक ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. समग्र समुद्र निरीक्षणासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम हे केंद्र करेल.

प्रगत वैशिष्ट्ये

हे संशोधन केंद्र अत्यंत प्रतिकूल सागरी परिस्थितीत वैज्ञानिकांना दीर्घकालीन संशोधन करण्यास सक्षम करण्यासाठी प्रगत जीवन सहाय्य प्रणालीने सुसज्ज असेल. यात डेटा संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी बहुआयामी देखरेख प्रणालीचा समावेश असेल, ज्यात मानवरहित पाणबुडी, समुद्रतळ निरीक्षण केंद्रे आणि पृष्ठभागावरील जहाजे यांचा एकमेकांशी समन्वय साधला जाईल. चीनच्या विस्तृत सागरी पायाभूत विकासाचा भाग म्हणून समुद्रतळ फायबर-ऑप्टिक नेटवर्कने जोडलेले असेल. त्यामुळे माहिती पाठविणे आणि निरीक्षण करणारी प्रणाली अधिक सक्षमपणे जोडली जाईल. तसेच, पृथ्वीच्या अधःस्थराचा आणि खोल समुद्रातील संसाधनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी चीनच्या खोल समुद्र ड्रिलिंग जहाज ‘मेंगशियांग’ बरोबर या केंद्राचा सहयोग असणार आहे.

भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व

दक्षिण चीन समुद्रातील हे संशोधन केंद्र ऊर्जा आणि खनिज संसाधनांच्या समृद्धतेमुळे रणनीतिच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महत्त्वाचे आर्थिक आणि भू-राजकीय घटक

दक्षिण चीनच्या समुद्रातील संशोधन केंद्र ऊर्जेच्या महत्त्वपूर्ण संसाधनांवर लक्ष केंद्रित करेल. चीनच्या मिथेन हायड्रेट साठ्याचा अंदाज सुमारे ७० अब्ज टन इतका आहे; जो देशाच्या एकूण प्रमाणित तेल आणि वायू साठ्याच्या निम्म्याइतकाच असल्याने ऊर्जा सुरक्षेसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय, कोबाल्ट आणि निकेलसारख्या दुर्मीळ खनिजांचे अधिक प्रमाण या भागात आढळते, जे भूभागावरील खाणींपेक्षा तीन पटींनी अधिक संपन्न असल्याने औद्योगिक विकासासाठी ते महत्त्वाचे ठरेल. जैवविविधतेच्या दृष्टीनेही हे क्षेत्र समृद्ध असून येथे ६०० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आढळतात. त्यातील काहींचे विकर (एन्झाईम्स) कर्करोग संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. भौगोलिक आणि रणनीतिच्यादृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे असून वादग्रस्त समुद्री भागावरील चीनचा दावा अधिक बळकट करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. रशियाने आर्क्टिक समुद्रतळाच्या सर्वेक्षणाचा उपयोग अशाच पद्धतीने स्वतःचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी केला होता.

खोल समुद्र संशोधनात मानवी वैज्ञानिक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वायत्त उपकरणे खोल समुद्राच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु काही विशिष्ट कार्यांसाठी अजूनही मानवी तज्ज्ञांची आवश्यकता असते.

मानवी वैज्ञानिक का आवश्यक आहेत?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि मानवी हस्तक्षेपाचे महत्त्व खोल समुद्र संशोधनात स्पष्टपणे दिसून येते. प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये त्वरित निर्णय घेऊन गोष्टी करणे आवश्यक असते. परंतु, कृत्रिम बुद्धिमत्ता अनपेक्षित खोल समुद्री परिस्थितींशी लगेच जुळवून घेऊ शकत नाही. विशेषतः, अचानक मिथेन विस्फोटासारख्या घटना ओळखण्यात स्वायत्त उपकरणे अपयशी ठरू शकतात. त्यामुळे पर्यावरणीय बदलांचे अचूक निरीक्षण करणे कठीण होते. याशिवाय, खोल समुद्रात ड्रिलिंग आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने निर्णय घेण्याची क्षमता मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही. कारण उपकरणांवर अचूक नियंत्रण आणि त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता फक्त माणसांकडे आहे. अत्यंत कठीण सागरी परिस्थितींमध्ये वैज्ञानिक संशोधनाच्या कार्यपद्धती परिस्थितीनुसार बदलण्याची गरज असते, जी सध्या केवळ मानवाच्या आकलन आणि अनुभवावर अवलंबून आहे.

उर्जास्रोत आणि ऐतिहासिक तुलना

या केंद्राचा उर्जास्रोत अद्याप गोपनीय ठेवण्यात आलेला असला तरी तज्ज्ञांचा अंदाज आहे की, भूतकाळातील खोल समुद्र संशोधन केंद्रांप्रमाणेच तेही अणुऊर्जेवर चालणारे असू शकते.

अधिक वाचा: Blue Sun: लालबुंद सूर्य निळा होतो तेव्हा; शास्त्रज्ञांनी उकलले गूढ !

ऐतिहासिक संदर्भ

अमेरिकेचे NR-1 हे केंद्र म्हणजे सुमारे ९०० मीटर खोल जाऊ शकणारी आणि अणुऊर्जेवर चालणारी संशोधन पाणबुडी आहे. रशियाचे AS-12 Losharik हे आण्विक ऊर्जेवर चालणारे संशोधन वाहन सुमारे २००० मीटर खोल समुद्रात कार्य करू शकते, परंतु २०१९ मध्ये झालेल्या आगीत त्याचे मोठे नुकसान झाले. याच स्तरावर, चीनने विकसित केलेले खोल समुद्र संशोधन केंद्र देखील २००० मीटर खोलीपर्यंत संशोधन करण्यास सक्षम आहे. मात्र त्याचा उर्जास्रोत गोपनीय ठेवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष

चीनने दक्षिण चीन समुद्रातील पहिले खोल समुद्र संशोधन केंद्र मंजूर करून सागरी विज्ञान, ऊर्जा संशोधन आणि भू-राजकीय धोरणामध्ये मोठी प्रगती केली आहे. २०३० पर्यंत हे केंद्र खोल समुद्र संशोधनासाठी महत्त्वाचे ठरेल आणि हवामानशास्त्र, जैवविविधता आणि संसाधन अन्वेषणास त्यामुळे गती मिळेल. याचा परिणाम म्हणून चीनचा प्रभाव वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावर अधिक वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प चीनला खोल समुद्र अन्वेषणात आघाडीवर नेईल. त्याचप्रमाणे अमेरिका व रशियाने यापूर्वी साधलेल्या प्रगतीपेक्षा अधिक पुढे जाण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे, असे तज्ज्ञांना वाटते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रगत होत असले तरी खोल समुद्राच्या गूढ रहस्यांचा उलगडा करण्यासाठी मानवी वैज्ञानिक अद्याप अपरिहार्य आहेत.