पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. एकमेकांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांनी दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमधील तणाव चिघळत असल्याचे चित्र आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीएसएस) बैठक पार पडली, ज्यात सिंधू जल करार रद्द करणे, अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क व्हिसा रद्द करणे, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्करी, नौदल व हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करणे आणि उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या कमी करणे, यांसारखे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांनी संतापलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताला युद्धाच्या पोकळ धमक्याही दिल्या आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की, भारताचे कोणतेही पाऊल दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये युद्ध भडकवू शकते. तसेच, बिलावल भुट्टो झरदारी यांनी दावा केला की, जर सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला गेला तर भारतात रक्ताच्या नद्या वाहतील. तर पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी म्हणाले की, पाकिस्तानचे शस्त्रागार घोरी, शाहीन आणि गझनवी क्षेपणास्त्रांसारखी १३० क्षेपणास्त्रे फक्त भारतासाठी ठेवण्यात आली आहेत. या तणावादरम्यानच अशी माहिती समोर आली आहे की, चीनने पाकिस्तानच्या हवाई दलाला हवेतून मारा करणाऱ्या चीनच्या प्रगत पीएल-१५ क्षेपणास्त्रांचा साठा पुरवला आहे. याचा भारतासाठी अर्थ काय? काय आहे पीएल-१५ क्षेपणास्त्र? जाणून घेऊयात.

चीनकडून पाकिस्तानला पीएल-१५ क्षेपणास्त्रांचा पुरवठा
अलीकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) चीनच्या पीएल-१५ बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या जेएफ-१७ ब्लॉक ३ लढाऊ विमानांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंवरून असे दिसून येते की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढत असताना चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रांची खेप पाठवली आहे. ‘युरेशियन टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान हवाई दलाला दिलेली क्षेपणास्त्रे थेट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सकडून आणली गेली आहेत. ‘स्टार कॉम’ब्युरोने प्रकाशित केलेल्या पोस्टनुसार, चीनने पाकिस्तानला त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांसाठी लांब पल्ल्याच्या पीएल-१५ क्षेपणास्त्रांची खेप तातडीने पाठवली आहे.
चीनचे पीएल-१५ क्षेपणास्त्र काय आहे?
पीएल-१५ हे क्षेपणास्त्र एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (AVIC) या सरकारी एरोस्पेस कंपनीने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. २०११ मध्ये हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची सुरुवात झाली आणि २०१२ मध्ये त्याची पहिली चाचणी घेण्यात आली. काही वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, चीनच्या हवाई दलात २०१८ मध्ये पीएल-१५ ला सामील करण्यात आले. हे क्षेपणास्त्र ड्युअल-पल्स्ड सॉलिड-प्रोपेलंट रॉकेट वापरते आणि त्यात प्रगत एईएसए रडार प्रणाली आहे. मिसाईलची कमाल मारा कऱण्याची क्षमता ही २०० ते ३०० किलोमीटर इतकी आहे.
ही क्षेपणास्त्रे मॅक ५ च्या वेगाने प्रवास करू शकतात. पीएल-१५ क्षेपणास्त्रे चीनच्या चेंगडू जे-२०, जे-१०सी आणि शेनयांग जे-१६ मध्ये फार पूर्वीच बसविण्यात आली आहेत. संरक्षण तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या AIM-120D, AMRAAM आणि युरोपच्या MBDA Meteor ला टक्कर देणारी आहेत. ही क्षेपणास्त्रे विकसित झाल्यानंतर चीनने लगेचच त्यांच्या विक्रीला सुरुवात केली.
पाकिस्तान जेएफ-१७ बॅच ३ साठी या क्षेपणास्त्राची खरेदी करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला आहे आणि अशावेळी चीनने पीएल-१५ क्षेपणास्त्र देऊन पाकिस्तानला केलेल्या मदतीचा मोठा फायदा होणार आहे. परंतु, भारतासाठी ही स्थिती धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने काय परिणाम होणार?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढत आहेत. या तणावाचे परिणाम संपूर्ण जागावर होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ज्याचे परिणाम जगावर होतील अशी भीती वाढत आहे. याचदरम्यान भारतीय नौदलानेही क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. या चाचणीत भारताकडे असणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता दाखवण्यात आली आहे
तसेच, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार करत आहे. दोन्ही देशांतील तणाव वाढत असला तरी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. तरीदेखील पाकिस्तान आणि भारतातील तणाव टोकाला पोहोचला असताना चीन पाकिस्तानच्या मदतीसाठी सरसावला आहे, ही बाब भारतासाठी चिंतेची आहे.