संजय जाधव

जगभरात नावीन्यपूर्ण संशोधनातून टेस्ला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रेसर स्थान पटकावले. वाहन उद्योगातील अनेक क्रांतिकारी तंत्रज्ञानाचे श्रेय टेस्लाकडे जाते. पण आता टेस्ला कंपनीच्या मक्तेदारीला चीनमधील ‘बिल्ड युवर ड्रीम्स’ (बीवायडी) कंपनीने आव्हान दिले आहे. ही जगाला फारशी माहिती नसलेली कंपनी जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी बनली आहे. यामुळे टेस्लाकडे आता केवळ इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटारींच्या क्षेत्रातील अव्वल स्थान राहिले आहे. तर इलेक्ट्रिक अधिक हायब्रिड वाहनांच्या उत्पादनात बीवायडी अव्वल आहे. केवळ इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनातही टेस्लाला मागे सोडण्याचे बीवायडीचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात बीवायडी यात कितपत यशस्वी होते, हे पाहावे लागणार आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

बीवायडीचा प्रवास कसा सुरू झाला?

बॅटरी उत्पादक कंपनी म्हणून १९९५ मध्ये तिचा प्रवास सुरू झाला. नंतर २००३ मध्ये तिने वाहन उद्योगात प्रवेश केला. कंपनीचे अध्यक्ष वँग चॉनफू यांच्या नेतृत्वाखाली बीवायडीने अतिशय महत्त्वाची अशी गुंतवणूक आकर्षित केली. या गुंतवणुकीमुळे बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफे हे कंपनीत भागीदार बनले. त्यांच्या गुंतवणुकीमुळे कंपनीचा विस्तार वाढत गेला आणि अनेक नावीन्यपूर्ण पावले कंपनीने उचलली. कंपनी केवळ पारंपरिक वाहन उद्योगापुरती मर्यादित राहिली नाही. मोबाइल फोन उत्पादन, सोलर सेल उत्पादन आणि इतर शाश्वत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कंपनीने प्रवेश केला. कंपनीने युरोप, आग्नेय आशिया, ओशनिया, दक्षिण अमेरिका आणि भारतात विस्तार केला.

हेही वाचा… विश्लेषण : भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला मोडीत काढले का?

उत्पादन क्षमता किती?

बीवायडीने बॅटरी तंत्रज्ञानातील अनुभवामुळे इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रीड वाहनांच्या उत्पादनास सुरुवात केली. बीवायडी एफ३ या मोटारीचे उत्पादन २००५ मध्ये सुरू केले. त्यानंतर २००८ मध्ये पहिल्या प्लग-इन हायब्रीड इलेक्ट्रिक मोटारीचे उत्पादन केले आणि नंतर लगेचच २००९ मध्ये कंपनीने पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन सादर केले. बीवायडीने २०२३ मध्ये पहिल्यांदा टेस्लाला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात मागे टाकले, त्यावेळी तिने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी कंपनीने सुमारे ३० लाख अपारंपरिक ऊर्जा वाहनांचे उत्पादन केले तर टेस्लाचे उत्पादन सुमारे १८ लाख होते. बीवायडीच्या एकूण विक्रीत बॅटरी आणि हायब्रीड मोटारींचा वाटा अधिक आहे. कंपनीने २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत केवळ बॅटरीवरील मोटारींच्या उत्पादनात टेस्लाला पहिल्यांदाच मागे टाकले.

स्थित्यंतर कशा प्रकारे?

बीवायडीने इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसीई) म्हणजे पेट्रोल, डीझेल, गॅससारख्या जीवाश्म इंधनांवर चालणाऱ्या मोटारींचे उत्पादन मार्च २०२२ पासून बंद केले. केवळ अपारंपरिक ऊर्जा पर्यायांवर भर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे नावीन्यूपर्ण संशोधनाचा वापर करून अपारंपरिक ऊर्जेवरील मोटारींचे उत्पादन कंपनी आता करीत आहे. कंपनी बीवायडी या ब्रँडअंतर्गत वाहनांची विक्री करते आणि आलिशान मोटारींची विक्री डेन्झा, यँगवँग आणि फँगचेंगबाओ ब्रँडअंतर्गत करते. युरोप, आग्नेय आशिया, ओशनिया आणि दक्षिण अमेरिकेत प्रवासी मोटारींची विक्री वाढविण्यासाठी कंपनी वेगाने विस्तार करीत आहे. कंपनीच्या वाहन विक्रीत २०२० ते २०२३ या कालावधीत मोठी वाढ नोंदविण्यात आली. कंपनीने २०२३ मध्ये जगभरात ३० लाख २४ हजार वाहनांची विक्री केली. कंपनीच्या २०२० च्या विक्रीच्या तुलनेत त्यात सातपट वाढ नोंदविण्यात आली.

हेही वाचा… विश्लेषण : जेरबंद वाघांची सुटका का होत नाही?

भारतात अस्तित्व किती?

जागतिक पातळीवरील अनेक बड्या वाहन उत्पादक कंपन्या भारताकडे वळत आहेत. त्यात बीवायडीचाही समावेश आहे. कंपनीने चेन्नईमध्ये २००७ मध्ये नोंदणी करून भारतात व्यवसाय सुरू केला. मात्र, कंपनीने २०१३ मध्ये भारतीय वाहन उद्योगात आपले अस्तित्व खऱ्या अर्थाने दाखूवन दिले. कंपनीची इलेक्ट्रिक बस बीवायडी के९ ही ऑगस्ट २०१३ मध्ये भारतात दाखल झाली. संपूर्ण भारतीय वाहन उद्योगासाठी ही महत्त्वाची घटना होती. बंगळुरुमध्ये या बसची ८८ दिवस चाचणी घेण्यात आली. तिला मिळालेल्या यशानंतर इलेक्ट्रिक बसचा वापर दिल्ली, राजकोट, हैदराबाद यांसारख्या महानगरांमध्ये सुरू झाला. आता बीवायडीने देशात इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांसोबत ई-बस, ई-मालमाटोरी आणि ई-फोर्कलिफ्टचे उत्पादन केले जाते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो.

भविष्यातील आव्हाने कोणती?

बीवायडीचा जगभरातील विस्तार स्वप्नवत वाटत असला तरी कंपनीसमोर भारतात अनेक आव्हाने आहेत. कंपनीच्या सुरुवातीच्या काळापासून ही आव्हानांची मालिका कायम आहे. कंपनीला आपली अनेक नवीन वाहने भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याचबरोबर भारतीय महसुली यंत्रणांच्या रडारवरही कंपनी आहे. महसुली गुप्तचर संचालनालयाने कंपनीला २०२३ मध्ये ९० लाख डॉलरचा दंड केला. यामुळे कंपनीच्या भारतातील विस्ताराच्या योजनेला खो बसला. या अडथळ्यांवर मात करीत कंपनीला देशातील विस्तार वाढविण्याचे आव्हान पूर्ण करावे लागेल.

sanjay.jadhav@expressindia.com