Bangladesh Dismantling Its Own History Post Hasina: दिग्गज दिग्दर्शक आणि साहित्यिक सत्यजित रे यांच्या बांगलादेशातील मयमनसिंह येथील वडिलोपार्जित घरावर सरकारकडूनच हातोडा पडल्यावर पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील बदलत्या सांस्कृतिक संबंधांवर चर्चा सुरु झाली आहे. शेख हसीना सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
ढाका येथील सत्तांतरानंतरच्या काही महिन्यांनंतर भारत-बांगलादेश यामधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. भारताने हिंदू अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांच्या वृत्तांकडे लक्ष वेधले आहे, तर बांगलादेशाने भारताला आपल्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप न करण्याची आणि शेख हसीनांना बांगलादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. भारताने १९७१ साली बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी मदत केली होती. आता बांगलादेशातील नेतृत्व बदलानंतर आणखी एक मोठा बदल घडतो आहे. बांगलादेश आपला भूतकाळ, आपली सांस्कृतिक परंपरा आणि भारताबरोबर असलेला समान वारसा मागे टाकण्यासाठी सरसावला आहे. त्यामुळे अनेक प्रतिष्ठित सांस्कृतिक स्थळांकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा भारत आणि भारतीयांशी संबंधित ठिकाणे उध्वस्त केली जात आहेत.
काही महत्त्वाच्या घटना
२०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशाचे संस्थापक आणि शेख हसीनांचे वडील शेख मुजिबुर रहमान यांच्या वडिलोपार्जित घराचा एक भाग पाडण्यात आला. ढाक्यातील याच निवासस्थानी बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक शेख मुजिबुर रहमान यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील जवळपास ५० सदस्य व कर्मचाऱ्यांचा खून करण्यात आला होता.
२०२५ च्या जून महिन्यात बांगलादेशातील सिराजगंज जिल्ह्यातील शहजादपूर येथे असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर एका जमावाने हल्ला केला. एका पर्यटक आणि संग्रहालय कर्मचारी यांच्या दरम्यान पार्किंग शुल्कावरून वाद झाल्यानंतर जमावाने संग्रहालयातील प्रेक्षागृहाची तोडफोड केली आणि एका अधिकाऱ्यावर हल्ला केला. यानंतर संग्रहालय तात्पुरते बंद करण्यात आले आणि चौकशी सुरू करण्यात आली.

२०२५ च्या जुलै महिन्यात दिग्गज चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे मयमनसिंह येथील वडिलोपार्जित घर पाडण्यास सुरुवात झाली. सत्यजित रे यांचे आजोबा आणि साहित्यिक उपेंद्रकिशोर रायचौधुरी यांचे हे घर आवश्यक परवानगी घेऊन पाडले जात आहे, असे बांगलादेश सरकारकडून सांगण्यात आले. ढाका येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी या इमारतीचे संरक्षण करण्यासाठी वारंवार विनंत्या केल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारताने या ऐतिहासिक इमारतीच्या दुरुस्तीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी सहकार्याची तयारी दर्शवली आहे.
दोन्ही देशांमधील समान संस्कृती
१९४७ साली रॅडक्लिफ लाईनच्या आधारे पंजाब आणि बंगालचे तुकडे करण्यात आले. मात्र, त्याआधीही १९०५ साली बंगालचं विभाजन करण्यात आलं होतं. हा निर्णय प्रशासनाच्या सोयीसाठी घेतल्याचं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात तो ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिश धोरणाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या निर्णयाला देशभरातून तीव्र विरोध झाला आणि अखेर ब्रिटिश सरकारला हे विभाजन मागे घ्यावं लागलं.
यानंतर १९४७ ची फाळणी झाली. लाखो बंगाली लोकांनी आपले घर, गाव आणि कुटुंब मागे टाकून कोलकाता आणि ईशान्य भारतातील विविध भागांमध्ये निर्वासित म्हणून नवजीवन सुरू केले. पंजाबमधील निर्वासितांप्रमाणेच त्यांनाही आपल्या हरवलेल्या घराचा कधीच विसर पडला नाही.
बंगाली संगीत, साहित्य आणि सिनेमा यांचे विभाजन कधीच झाले नाही. तसंच बंगालची सांस्कृतिक दैवतंही कधीही विभाजित झाली नाहीत. सत्यजित रे आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित बांगलादेशातील सांस्कृतिक स्थळं या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची ठरतात. या स्थळांकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यांची नासधूस ही या सांस्कृतिक वारशाप्रति असलेल्या उदासीनतेचं लक्षण आहे. बांगलादेशातील एका वर्गाने या सांस्कृतिक दैवतांकडे पूर्णपणे पाठफिरवल्याचं हे द्योतक आहे.
सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घरासंबंधी येणाऱ्या बातम्यांच्या दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर म्हटले की, “रे कुटुंब बंगाली संस्कृतीचे एक प्रमुख वाहक आहेत. उपेंद्रकिशोर बंगालच्या पुनर्जागरणाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या घराची बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाशी नाळ जोडलेली आहे, असे मी मानते. बांगलादेश सरकार आणि त्या देशातील सर्व संवेदनशील नागरिकांना मी आवाहन करते की, त्यांनी या घराचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. भारत सरकारनेही याकडे लक्ष द्यावे.”
बांगलादेश विरुद्ध इतिहास
शेख हसीना यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांदरम्यान त्या ढाक्यातून पळून गेल्या आणि त्याच वेळी एक घटना जगभरातील टीव्ही स्क्रीन आणि मोबाईलवर झळकली. काही आंदोलकांनी बिजॉय सरणीवरील शेख मुजिबुर रहमान यांचा सोन्याचा पुतळा खाली पाडला. ही दृश्ये फारच प्रतिकात्मक ठरली. शेख मुजिबूर रहमान केवळ शेख हसीनांचे वडील नव्हते. ‘बंगबंधू’ म्हणून ओळखले जाणारे रहमान हे बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारक होते. त्यांच्या पुतळ्यांची तोडफोड करणे आणि त्यांच्या घराची नासधूस करणे हे केवळ त्यांची कन्या असलेल्या तत्कालीन पंतप्रधानांविरुद्ध असलेल्या रोषाचे प्रतीक नव्हते तर एका समाजाने स्वतःच्या इतिहासाशी असलेल्या नात्याला नाकारण्याचे लक्षण होते. तसेच आपल्या स्वातंत्र्य संग्रामापासून, जो मुख्यत्वे भाषेवर आधारित होता, त्या पासून दूर जाण्याचा एक आटोकाट प्रयत्न बांगलादेश करत आहे.
खरं तर, शेख हसीनांना सत्तेवरून खाली खेचणाऱ्या आंदोलनांची सुरुवात झाली ती अवामी लीग सरकारने केलेल्या एका धोरणामुळे. या धोरणानुसार १९७१ च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या जवानांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्यात आले होते. या वंशजांपैकी बहुतांश लोक अवामी लीगशी संबंधित होते. बांगलादेशात बेरोजगारी मोठी समस्या आहे आणि सध्याचा तरुण वर्ग स्वतंत्र बांगलादेशात जन्मलेला आहे. त्यांच्या दृष्टीने हे आरक्षण त्यांच्या संधींना मर्यादा घालणारे होते. त्यांनी याच्या विरोधात आंदोलन सुरू केले शेख हसीनांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यानंतर या आंदोलनाने अधिकच रौद्र रूप धारण केले.
बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद वाढतोय का?
बांगलादेशातील वाढत्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांमुळे अवामी लीग सरकार सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात इस्लामिक मूलतत्त्ववाद वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. १९७१ च्या मुक्ती संग्रामादरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देणारी आणि शेख हसीनांनी बंदी घातलेली जमात-ए-इस्लामी पुन्हा एकदा राजकीय पटलावर परतली आहे आणि आता ती निवडणूक लढवण्यास पात्र ठरली आहे.
बांगलादेशाचे संविधान काहीसे विरोधाभासी आहे. त्यात म्हटले आहे की, देशाचा धर्म इस्लाम आहे, “पण राज्य हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर धर्मांच्या पालनात समान दर्जा आणि समान अधिकार सुनिश्चित करेल.” तसेच असेही नमूद आहे की, सांप्रदायिकता दूर करून, राजकीय कारणांसाठी धर्माचा गैरवापर थांबवून आणि धार्मिक कारणांवर आधारित भेदभाव रोखून धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत प्रत्यक्षात आणला जाईल.
प्रत्यक्षात, जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा त्याचा कोणताही राज्यधर्म नव्हता. १९८८ साली लष्करी हुकूमशहा हुसेन मुहम्मद इर्शाद यांनी संसदेमार्फत इस्लामला राज्यधर्म म्हणून मान्यता दिली. २०११ मध्ये शेख हसीनांच्या सरकारने धर्मनिरपेक्षतेवर भर दिला, पण इस्लाम राज्यधर्म म्हणून कायम राहिला.
सत्तांतरानंतर बांगलादेश पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभा आहे. महत्त्वाच्या लोकशाही सुधारणा राबवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नॅशनल कन्सेन्सस कमिशनने या मुद्द्यावरही चर्चा केली. सुमारे ३८ राजकीय पक्षांनी संविधानातील “धर्मनिरपेक्षता” हा शब्द बदलून “बहुपंथीयता (pluralism)” करण्याच्या शिफारशींवर चर्चा केली. “बहुतांश पक्षांनी बहुपंथीयतेची कल्पना नाकारली, पण त्यांनी अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी काहीतरी तरतूद करण्याची शिफारस केली,” असे कमिशनचे उपाध्यक्ष अली रियाज यांनी सांगितले. एकूणात बांगलादेशचे राजकारण सध्या इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या भारतविरोधी धोकादायक वळणावर येऊन उभे ठाकले आहे.