China shaolin temple scandal: चीनचे शाओलिन मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराला केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही, तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्व आहे. शाओलिन मंदिर हेनान प्रांतातील डेंगफेंग शहरात आहे. त्याचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे आणि तो बौद्ध धर्माच्या विकासाशी संबंधित आहे. या मंदिराबाबतचा एक वाद सध्या समोर आला आहे. शाओलिन मंदिराशी संबंधित हा वाद काय आहे आणि इथले मुख्य मठाधीश शी योंग्झिन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘सीईओ भिक्खू’ म्हणून ओळखले जाणारे शाओलिन मंदिराचे मठाधीश शी योंग्झिन यांच्यावर लैंगिक संबंध ठेवल्याचा, तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. नेमके काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊ.
शी योंग्झिन यांच्यावर कोणते आरोप आहेत?
शाओलिन मंदिराच्या मुख्य मठाधिपतींवर गैरव्यवहार आणि लैंगिक गैरवर्तनाचा आरोप आहे. मंदिराच्या प्रमुखावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता त्यांची चौकशी सुरू आहे. सरकारी वृत्तपत्र चायना डेलीने मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या नोटिशीचा हवाला देत म्हटले आहे की, हेनान प्रांतातील शाओलिन मंदिराचे मठाधिपती शी योंग्झिन यांच्यावर मंदिराच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचाही आरोप करण्यात आले आहेत.
चायना डेलीच्या वृत्तानुसार, मठाधिपतीचे अनेक महिलांशी दीर्घकाळ अनैतिक संबंध होते आणि या संबंधातून त्यांनी मुलांनाही जन्म दिला, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. एकूणच या आरोपांमुळे त्यांनी बौद्ध धर्माच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे बोलले जात आहे. मठाधिपतीबद्दल अशा गोष्टी उघड झाल्यानंतर गोंधळ उडाला आहे. मंदिराच्या अधिकृत वुई चॅट अकाउंटवरही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
आरोपांचे गांभीर्य लक्षात घेत, बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ चायनाने सोमवारी शी यांचे नियुक्ती प्रमाणपत्र रद्द केल्याचे जाहीर केले. असोसिएशनने शी यांच्या कृत्यांचा निषेध केला आहे आणि म्हटले, “शी योंग्झिन यांचे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे बौद्ध समुदायाची प्रतिष्ठा कलंकित होते आणि भिक्खूंची प्रतिमादेखील मलीन होते.
कोण आहेत शी योंग्झिन?
१९६५ मध्ये अनहुई प्रांतातील यिंगशांग इथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव लिऊ यिंगचेंग होते. ते पहिल्यांदा १९८१ मध्ये शाओलिन मंदिरात आले. त्यानंतर ते २९ व्या पिढीतील मठाधिपती शी झिंगझेंग यांचे शिष्य बनले आणि नंतर १९८७ मध्ये गुरूंच्या निधनानंतर मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. १९९९ पर्यंत औपचारिकपणे मठाधिपती म्हणून शी यांची नियुक्ती झाली. या पदामुळे त्यांना चीनमधील सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या स्थळाचे प्रमुख पद मिळाले. ते एक पारंपरिक बौद्ध भिक्खू आहेत. मात्र, त्यांनी आधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करीत मंदिराला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवले. त्यांना ‘सीईओ भिक्खू’ म्हणूनही ओळखले जाते.
हेनान प्रांतातील डेंगफेंग शहरात शाओलिन मंदिर हे केवळ प्रार्थनास्थळच नाही, तर शाओलिन कुंग फूचे जन्मस्थानदेखील आहे.
मंदिराबाबतही प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?
१५०० वर्षांपूर्वी स्थापन झालेले शाओलिन मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर चिनी संस्कृती आणि मार्शल आर्टसचे प्रतीक आहे. शी यांच्या काळात मंदिराचा जगभरात विस्तार झाला. परदेशात ५० हून अधिक शाओलिन सांस्कृतिक केंद्रे निर्माण करण्यात आली आणि कुंग फूचे सादरीकरणही झाले. टीकाकारांचा असा दावा आहे की, आक्रमक ब्रँडिंग आणि व्यावसायिक उपक्रमांमुळे शाओलिनची आध्यात्मिक मूल्ये कमकुवत झाली; तर समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, शी यांनी आधुनिक जगात मंदिराची ख्याती सुनिश्चित करण्यास मदत केली.
महत्त्वाचे मुद्दे:
- शाओलिन मंदिरातील प्रमुख मठाधिपती यांच्यावर गंभीर आरोप
- काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने फोटो शेअर करत केले होते आरोप
- तेव्हा शी योग्झिंन यांनी आरोप फेटाळून लावले होते
- मठाधिपती म्हणून अधिकार मिळाल्यावर शी यांनी पदाचा गैरफायदा घेतल्याचे आरोप
- याआधीही कार बक्षीस म्हणून स्वीकारल्यानंतर सापडले आहेत वादात
शाओलिनमधील शी यांचा कार्यकाळ कसा आहे?
२००६ मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून १० लाख युआनची लक्झरी कार बक्षीस म्हणून स्वीकराल्यानंतर शी यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याला उत्तर देताना शी यांनी म्हटले होते, “भिक्खूदेखील नागरिक आहेत. आम्ही आमची कर्तव्यं पार पाडली आहेत आणि समाजासाठी योगदान दिलं आहे. म्हणून आम्हाला बक्षिसं मिळणं योग्य आहे.”
२०१५ मध्ये शी यांच्यावरील आरोपांमध्ये वाढ झाली. त्यांच्याकडे गुप्त माहिती असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करीत आरोप केले. त्यामध्ये त्याने आर्थिक गैरव्यवहार करणारा आणि अनेक मुलांना जन्म देणारा व महिलांना लुबाडणारा, असे शी यांच्याबद्दल लिहिले होते. या पोस्टमध्ये १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धातील कागदपत्रे होती. त्यामध्ये मठाधिपतीच्या कथित मुलांपैकी एकाचे जन्म प्रमाणपत्र आणि आई-मुलाचा फोटो होता. त्यावेळी शी यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते.
बीबीसी चायनीजला दिलेल्या मुलाखतीत शी यांनी उत्तर दिले, “जर काही समस्या असती, तर ती खूप आधीच समोर आली असती.” अधिकाऱ्यांनी या आरोपांचा तपास सुरू केला; मात्र त्यांना ते सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतरही २०२० मध्ये शी यांची चीनच्या बौद्ध संघटनेचे उपप्रमुख म्हणून पुन्हा निवड झाली. २००२ पासून ते या पदावर होते. त्यांनी १९९८ पासून हेनान प्रांतातील बौद्ध संघटनेचे अध्यक्ष म्हणनूही काम केले आणि १९९८ ते २०१८ या काळात त्यांनी चीनच्या राष्ट्रीय पीपल्स काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व केले.
शी योंग्झिन आता कुठे आहेत?
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चिनी वृत्तपत्र इकॉनॉमिक ऑब्झर्व्हरने असे वृत्त दिले की, शी यांना उत्तर हेनानमधील झिनशियांग शहरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शी यांच्याबद्दलची ही बातमी पसरल्यानंतर त्यांचे सर्व सार्वजनिक संवाद थांबले आहेत. त्यांचे आठ लाख ७० हजार फॉलोअर्स असलेले वेइबो अकाउंट २४ जुलैपासून निष्क्रिय आहे. सोमवारी चीनच्या बौद्ध संघटनेने त्यांचे नियुक्ती प्रमाणपत्र रद्द केले