चीनने तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली आहे. हे धरण पूर्ण झाल्यावर तो जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. यारलुंग झांगबो नदी भारतात ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेशात जमुना नदी म्हणून ओळखली जाते. या धरणामुळे दोन्ही देशांवर व्यापक परिणाम होऊ शकतो. भारताकडील ईशान्येकडील राज्यांमध्ये या धरणामुळे पूरस्थिती किंवा दुष्काळाचे संकट येऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनचा हा प्रकल्प काय आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, भारताने तीव्र विरोध करण्याची नेमकी कारणे काय, याचा गोषवारा…

चीनचा जलविद्युत प्रकल्प काय आहे?

चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली आहे. या धरण प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला चीनचे पंतप्रधान ली कियांग हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या तिबेटमधील न्यिंगची प्रदेशात झाला. या प्रकल्पावर चीन १६७ अब्ज डॉलर खर्च करणार आहे. हे धरण पूर्ण झाल्यावर तो जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या मेगा-प्रकल्पात भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीवर आणि बांगलादेशात जमुना नदीवर पाच जलविद्युत केंद्रे समाविष्ट असतील. त्यातून ३०० अब्ज केडब्ल्यूएच विजेची निर्मिती केली जाणार आहे.

या धरणाचा तिबेटला फायदा की तोटा?

चीनने अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची योजना आखली होती. हा प्रकल्प या विकसित देशाच्या कार्बन न्यूट्रॅलिटी लक्ष्यांशी आणि तिबेट प्रदेशातील आर्थिक उद्दिष्टांशी जोडला गेला आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे १.२ ट्रिलियन युआन (१६७.१ अब्ज डॉलर) असण्याची अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. ही वीज प्रामुख्याने इतर प्रदेशांमध्ये पारेषित केली जाणार आहे. तिबेटमधील स्थानिक वीज गरजही या प्रकल्पामुळे पूर्ण होईल, असे चिनी पंतप्रधान ली कियांग यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. या धरणाच्या निर्मितीनंतर ते मध्य चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट ऊर्जापुरवठा करण्याची शक्यता आहे. २००३ मध्ये थ्री गॉर्जेस धरण पूर्ण झाल्यानंतर सुमारे १.४ दशलक्ष नागरिक विस्थापित झाले. या धरणामुळे अनेक तिबेटी नागरिकांवरही विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते. १९५० मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला आणि या प्रदेशातील नद्यांवर अनेक धरणे बांधली, ज्यामुळे तिबेटी लोकांमध्ये तिबेटी पठाराच्या अद्वितीय परिसंस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

भारतावर काय परिणाम?

ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या ईशान्येकडील आसाम, अरुणाचल या राज्यांतून वाहते. चीन जगातील सर्वात मोठे धरण या नदीवर बांधत असल्याने त्याचा मोठा परिणाम ईशान्येकडील बहुतेक राज्यांवर होण्याची भीती आहे. चीनने या नदीचे पाणी थांबवले तर अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थती येऊ शकते किंवा जर चीनने या नदीचा प्रवाह बदलला तर या राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तिबेटमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशातूनही वाहते. त्यामुळे या धरणाचा परिणाम या शेजारील देशावरही होऊ शकतो. हे नवीन धरण चीनच्या भारताशी असलेल्या विशाल सीमेपासून फक्त ३० किमी (१८ मैल) अंतरावर बांधले जात आहे. धरणामुळे भारतावर व्यापक परिणाम होऊ शकतो.

भारताने कसा विरोध केला?

चीनच्या या महाकाय धरणामुळे भारतावर व्यापक परिणाम होण्याची भीती असल्याने भारताने त्यास अनेकदा तीव्र विरोध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच म्हटले होते की, ‘‘ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागात असलेल्या हालचालींमुळे भारतातील ईशान्येकडील राज्यांच्या हितांना धोका पोहोचू नये याची खात्री करण्यासाठी चीनला आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केली होती.’’ त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला की भारतावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि चीन नदीच्या दक्षिणेकडील देशांशी संपर्क राखेल आणि त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल.’’ मात्र चीनवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका, असा इशारा भारतातील काही राजकीय नेत्यांनी दिला. ‘‘चीनने आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय जलकरारावर स्वाक्षरी केलेली नाही. या परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे. चीन काय करू शकतो हे कोणालाही माहिती नाही,’’ असा इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sandeep.nalawade@expressindia.com