Bangladesh Military Plane Crash in Dhaka : बांगलादेशसाठी सोमवारचा दिवस अत्यंत दुःखद आणि वेदनादायी ठरला. ढाकामध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वैमानिकासह अनेक शाळकरी मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १७० हून अधिक जण जखमी झाले असून अनेकांची स्थिती चिंताजनक आहे. ही दुर्घटना बांगलादेशमधील विमान अपघातांपैकी सर्वात मोठी मानली जात आहे. सरकारने या घटनेनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे बांगलादेशनं अगदी काहीच दिवसांपूर्वी हे लढाऊ विमान चीनकडून खरेदी केलं होतं. त्यामुळेच चिनी बनावटीच्या वस्तूंवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

विमान दुर्घटना नेमकी कशामुळे घडली?

एएनआयच्या वृत्तानुसार, चिनी बनावटीचं F-7 BGI हे लढाऊ विमान काहीच दिवसांपूर्वी बांगलादेशच्या लष्करात सामील झालं होतं. सोमवारी दुपारच्या सुमारास या विमानानं ढाकातील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केलं. काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते उत्तरा परिसरातील माइलस्टोन शाळेच्या इमारतीवर जाऊन कोसळलं. वेदनादायी बाब म्हणजे- जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा शाळेत अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अपघातानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला आणि क्षणार्धात परिसरात आगीचा भडका उडाला. इमारतीतून विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकल्यानंतर स्थानिकांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. अनेकांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. या अपघातामागील कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

अनेक लहान मुले आगीत होरपळली : शिक्षिकेनं सांगितला घटनाक्रम

माइलस्टोन शाळेच्या शिक्षिका पूर्णिमा दास यांनी या घटनेचा थरारक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्या म्हणाल्या, “ही घटना घडण्याच्या १० मिनिटाआधी मी मुलांची शिकवणी पूर्ण करून अध्यापन कक्षात परतले. तेवढ्यात एक भयानक आवाज झाला आणि संपूर्ण इमारत हादरली. खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं असता मला दिसलेलं चित्र अगदी भयानक होतं. शाळेच्या इमारतीला भीषण आग लागली होती आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. ज्या इमारतीवर हे लढाऊ विमान कोसळले, तिथे बहुतेक प्राथामिक व माध्यामिक कक्षेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग होते. इमारतीला आग लागल्याने अनेक लहान मुले धावत होती आणि त्यांच्या अंगालाही आग लागली होती. यातील काही विद्यार्थ्यांना मी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं संपूर्ण शरीर जळून गेलं. त्याचवेळी कोणीतरी मला ओढून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं.”

हेही वाचा : Woman Married to Two Brothers : तरुणीने केलं दोन भावांशी लग्न; बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे का?

घटनास्थळी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आक्रोश

ढाकामधील लष्करी विमान अपघातामुळं विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबांवर मानसिक आणि भावनिक आघात झाला. अनेकांनी आपल्या डोळ्यांसमोरच जीवघेणं दृश्य पाहिलं. फरहान हसन नावाच्या विद्यार्थ्याने बीबीसी बांग्लाला सांगितलं, “मी नुकताच परीक्षा देऊन वर्गाच्या बाहेर पडलो होतो. तेव्हा माझ्या नजरेसमोरच हे विमान शाळेच्या इमारतीवर आदळलं आणि त्यात माझ्या जीवलग मित्राचा जागीच मृत्यू झाला. शाळेवर लष्कराचे विमान कोसळल्याचं वृत्त कळताच शेकडो पालकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अनेकजण जीवाच्या आकांताने ओरडून आपापल्या मुलांचा शोध घेत होते.

मोहसीन नावाच्या एका व्यक्तीनं बीबीसीला सांगितलं की, माझी मुलगी याच शाळेत शिक्षण घेते. या दुर्घटनेनंतर माझ्या पत्नीनं मला फोन केला; पण नमाजपठण सुरू असल्यामुळं मी फोन उचलला नाही. इतरांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी शाळेच्या दिशेनं धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पाहिलं की, शाळेच्या इमारतीला मोठी आग लागलेली होती आणि माझ्या नजरेसमोरच एका मुलाचं शरीर जळत होतं. सुदैवाने या दुर्घटनेतून माझी मुलगी वाचली; पण अनेक पालकांच्या नशिबी फक्त वेदनाच आल्या.”

घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर

ढाका ट्रिब्यूनच्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर बचावपथकानं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं. बांगलादेशी लष्कर, हवाई दल, पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) यांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतलं. शाळेच्या परिसरात व आसपासच्या रुग्णालयांत गोंधळाचं वातावरण होतं. जखमींना रुग्णवाहिका, रिक्षा व अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून रुग्णालयात नेलं जात होतं. काही जण आपापल्या मुलांना तसेच पालकांच्या हातांवरूनही जखमींना उचलून नेलं जात होतं. बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करीत बांगलादेशच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत २५ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले असून मृतांची ओळख पटवणेही कठीण झालं आहे. त्यासाठी डीएनए चाचणी केली जात असल्याची माहिती AP वृत्तसंस्थेनं दिली आहे.

चिनी विमानांच्या गुणवत्तेवर अनेकांचं प्रश्नचिन्ह

ढाका येथील शाळेवर कोसळलेल्या लष्करी विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण शाळा परिसर उद्ध्वस्त झाला आणि अनेकांचा जीव गेला. बांगलादेश इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या निवेदनानुसार, हवाई दलाच्या FT-7 BGI या लढाऊ विमानात उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. फ्लाईट लेफ्टनंट मोहम्मद तौकिर इस्लाम सागर यांनी गर्दीच्या परिसरातून हे विमान दूरवर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि विमान दोन मजली शाळेच्या इमारतीवर जाऊन कोसळले. या अपघातात वैमानिकांसह अनेक निरागस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Bangladesh air force dhaka plane crash
ढाका येथील एका शाळेवर लष्करी विमान कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशनं चीनकडून खरेदी केली होती ३६ लढाऊ विमानं

दरम्यान, बांगलादेशच्या हवाई दलानं या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन केली आहे. या भीषण दुर्घटनेमुळं चिनी बनावटीच्या लढाऊ विमानांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ढाका ट्रिब्यूनशी बोलताना बांगलादेश हवाई दलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, चीनकडून मिळालेली विमानं सतत अपघातांना कारणीभूत ठरत आहेत; पण काही मर्यादांमुळे हवाई दलाला त्याचा वापर करावा लागत आहे. ढाका ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, गेल्या दोन दशकांतील ११ लष्करी विमान अपघातांपैकी ७ अपघात चिनी बनावटीच्या विमानांमुळेच झाले आहेत. उर्वरित चार अपघातांमध्ये तीन रशियन आणि एक चेक बनावटीच्या विमानाचा समावेश होता.

आणखी वाचा : केरळमध्ये अडकून पडलेलं ब्रिटनचं लढाऊ विमान कसं दुरुस्त झालं? पार्किंगसाठी किती खर्च आला?

बांगलादेशने चीनकडून विकत घेतलेलं F-7 BGI हे अपघातग्रस्त विमान अत्याधुनिक आहे. हवाई लढाया, बॉम्बहल्ले, गुप्त माहिती मिळवणं आणि संरक्षण मोडून काढणं यांसारख्या विविध कामांसाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. २०२२ मध्ये बांगलादेशनं याच श्रेणीतील ३६ विमानं चीनकडून विकत घेतली होती, ज्यामध्ये त्यांच्या लष्करी गरजांनुसार काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे विमान ‘अपग्रेड’ मानलं जात होतं. मात्र, त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने या विमानाच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान अपघातामागे सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचा संशय

ढाकामधील विमान दुर्घटनेबाबत आता फक्त तांत्रिक बिघाडच नव्हे, तर अयोग्य शहरी नियोजन व सुरक्षाविषयक नियमांची पायमल्लीदेखील कारणीभूत ठरली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. ज्या भागात हे विमान कोसळले, तो परिसरत पूर्वी मोकळा होता; पण आता तिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ढाका ट्रिब्यूनशी बोलताना एक निवृत्त हवाई दल अधिकारी म्हणाले, “लढाऊ विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिक तौकिर यांनी त्याला दाट वस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केल्यानं आणखी मोठी दुर्घटना टळली. त्यांनी हेही नमूद केलं की, उड्डाण सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. कोणताही विमानतळ असो, तिथे कमीत कमी आठ नॉटिकल माईल अंतर सुरक्षित व अडथळा मुक्त असावं लागतं; पण आपण हे नियम पाळत नाही. अगदी धावपट्टीच्या जवळही अनेक अडथळे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मंगळवारी संपूर्ण बांगलादेशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सर्व सरकारी, निमसरकारी, स्वायत्त संस्था व शैक्षणिक संस्थांवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.