म्यानमारमध्ये सध्या लष्कराची सत्ता आहे. येथे कामगारांचे हक्क, त्यांच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. या देशात रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दुसरीकडे कामगारांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे, कामगार अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ होत असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या कंपन्या तेथून काढता पाय घेत आहेत. परिणामी, म्यानमारला मोठा आर्थिक फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर म्यानमारमध्ये नेमकं काय घडतंय? हे जाणून घेऊ या…
“खूप विचार करून काम बंद करण्याचा निर्णय”
वस्त्रनिर्मिती करणाऱ्या एच अँड एम या कंपनीने नुकतेच म्यानमार या देशात काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी या देशातून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय घेताना कंपनीने “खूप विचार करून आम्ही आमचे म्यानमारमधील काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्यानमारमध्ये घडत असलेल्या घटनांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत; काम करण्यासाठी तेथे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच आम्हाला गरज पडणाऱ्या वस्तू मिळण्यासही अडचणी येत आहेत,” असे म्हटले आहे.
एच अँड एम कंपनीसह अनेक कंपन्यांचा बाहेर पडण्याचा निर्णय
फेब्रुवारी २०२१ साली म्यानमार येथे लष्कराने बंड केले. सध्या येथील कारभार लष्कराच्याच हातात आहे. तेव्हापासून तेथे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तेथील कामगारांना कमी मोबदला मिळत आहे. कामाचे तास वाढले आहेत. कोणतेही योग्य कारण न देता कामगारांना कामावरून काढले जात आहे. एच अँड एम ही वस्त्रोद्योगातील जगप्रसिद्ध कंपनी आहे. मात्र, आपले उत्पादन बंद करणारी ही काही पहिली कंपनी नाही. कामगारांचे हक्क अबाधित रहात नसल्यामुळे तसेच कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे. आठवड्यापूर्वीच झारा या ब्रँडची मालकी असलेल्या इंडिटेक्स या कंपनीनेही म्यानमारमधून कच्च्या मालाची खरेदी बंद करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीयल ग्लोबल युनियनने म्यानमार देशातून कंपन्यांनी बाहेर पडावे असे सांगितले आहे. याच आवाहनानंतर इंडिटेक्सने तसा निर्णय घेतला आहे.
“आम्ही टप्प्याटप्प्याने आणि जबाबदारीने म्यानमारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. याच कारणामुळे आम्ही देशातील सक्रिय उत्पादकांची संख्या कमी करत आहोत”, असे इंडिटेक्सने सांगितले आहे.
मँगो कंपनीचा बाहेर पडण्याचा निर्णय
स्पेनमधील फॅशन रिटेलर ‘मँगो’ या कंपनीनेही म्यानमारहून सोर्सिंग थांबवण्याची घोषणा केली. गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात आयर्लंड देशातील प्रिमार्क या कंपनीने असाच निर्णय घेतला आहे. “जे लोक आमच्यासाठी कापड आणि इतर उत्पादनांची निर्मिती करतात, त्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही या देशातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत,” असे या कंपनीने सांगितले.
म्यानमारमध्ये वस्त्रोद्योग संकटात
कोरोना महामारीच्या काळात म्यानमार देशात वस्त्रनिर्मिती हा उद्योग क्षेत्रातील एक प्रमुख उद्योग होता. या क्षेत्रामुळे म्यानमारमध्ये जवळपास सात लाख लोकांना रोजगार मिळत होता. विशेष म्हणजे हे तेथील सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र होते. मात्र, कोरोना महामारीनंतर तेथील वस्त्रोद्योगाला उतरती कळा लागली. कोरोना महामारीसह येथे लष्कराची सत्ता आल्यामुळेही या क्षेत्राला मोठा फकटा बसला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार म्यानमारमध्ये २०२१ साली वस्त्रनिर्मिती उद्योगातील साधारण दोन लाख २० हजार कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. यामध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश आहे; तर म्यानमार गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार २०२१ साली ५० टक्क्यांपेक्षा अधिक कारखाने तात्पुरते बंद करण्यात आले आहेत; तर १४ कारखान्यांना कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कामगार अत्याचाराची एकूण १५६ प्रकरणं
वस्त्रोद्योग क्षेत्रातील या पडझडीमुळे शेवटी कामगारांचे शोषण वाढले आहे. येथे कामगारांचा वेगवेगळ्या मार्गाने छळ केला जात आहे. याबाबत ब्रिटनमधील बिझनेस अँड ह्युमन राइट्स रिसोर्स सेंटर (BHRRC) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार म्यानमारमध्ये कामगार तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात म्यानमारमधील वस्त्रोद्योग क्षेत्रात कामगार अत्याचाराची एकूण १५६ प्रकरणं समोर आली आहेत. हा आकडा या आधीच्या वर्षात ५६ होता.
कामगारांचा लिंगाधारित हिंसाचार, छळ
“मजुरीमध्ये कपात, अयोग्य पद्धतीने कामावरून काढणे, अमानवी पद्धतीने काम देणे, ओव्हरटाईम अशा माध्यमातूनही कामगारांचा छळ करण्यात येत आहे,” असेही या अहवलात म्हणण्यात आले होते. यासह कामगारांचा लिंगाधारित हिंसाचार, छळ केला जात आहे. यामध्ये शारीरिक, मानसिक, शाब्दिक छळाचा समावेश आहे. टार्गेट पूर्ण न केल्यामुळे अनेक महिला कामगारांना अन्यायकारकपणे कामावरून काढून टाकण्यात आले आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
म्यानमारमधील स्थिती आणखी बिकट होणार?
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले अनेक ब्रँड्स म्यानमारमधून काढता पाय घेत असल्यामुळे तेथील कामगारांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता तेथील जाणकार व्यक्त करत आहेत. शेकडो नव्हे तर हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. तसेच कामाची पद्धत आणखी बिकट आणि त्रासदायक होऊ शकते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नुकतेच युरोपियन युनियनने वस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी म्यानमारमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन केले होते. तसेच म्यानमारमधील कंपन्यांत कामाचा दर्जा, स्थितीत बदल व्हावा यासाठी युरोपियन युनियनने आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. या प्रकल्पाला MADE असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एच अँड एम, Adidas अशा नामांकित कंपन्या सहभागी आहेत.