Cloudflare down? Cloudflare outage hits these major platforms: १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अनेक मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनपेक्षितरित्या तांत्रिक बिघाड (outage) जाणवू लागला. ट्विटर/X, ChatGPT, Canva, Spotify, Zerodha, Discord, तसेच गेमिंग प्लॅटफॉर्म्स (League of Legends, Valorant) काही वेळेसाठी पूर्णपणे बंद पडले किंवा त्यावर ‘500 internal server error’, ‘service unavailable’ असे एरर मेसेजेस वापरकर्त्यांच्या स्क्रिनवर दिसू लागले. अनेक वेबसाइट्सवर ही समस्या अद्याप तशीच आहे. तर अनेकांच्या स्क्रीनवर Please unblock challenges.cloudflare.com to proceed हा मेसेज दिसत आहे. अनेकांसाठी हा संदेश खूपच गोंधळात टाकणारा आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी आपल्या सेटिंग्जमध्ये कुठलाही बदल केलेला नाही, नवीन extensions इन्स्टॉल केलेली नाहीत किंवा कोणतीही वेबसाइट ब्लॉक केलेली नाही. तरीही अशी सूचना दिसत असल्याने गोंधळ निर्माण झाला. या घटनेमुळे इंटरनेटवर Cloudflare हे नाव मोठ्या प्रमाणात viral होतं आहे.

नेमके काय घडले?

  • Cloudflare नेटवर्कमध्ये ‘widespread 500 errors’ निर्माण झाल्याचे X च्या स्टेटस पेजवर त्यांनी स्पष्ट केले. बिघाडामुळे त्यांच्या डॅशबोर्ड, API, वेगळ्या देशात असलेल्या डेटा सेंटर्सवरील नेटवर्कवर परिणाम झाला आहे. अन्य अनेक वेबसाइट्स, विशेषतः Cloudflare च्या CDN (Content Delivery Network) आणि सुरक्षा सेवांचा वापर करणाऱ्या साइटस, तात्पुरत्या काळासाठी बंद पडल्या आहेत.
  • क्लाऊडफ्लेअरच्या आउटेजमुळे इंटरनेटचा मोठा भाग ठप्प झाला त्यामुळे क्लाऊडफ्लेअरच्या सेवांवर अवलंबून असलेल्या अनेक लोकप्रिय सेवा आणि वेबसाइट्स बंद पडल्या.
  • क्लाऊडफ्लेअर आपली सेवा पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यासाठी पडद्यामागे सक्रियपणे काम करत असली, तरी या घटनेने आधुनिक वेबची वस्तुस्थिती आणि काही मोजक्या क्लाऊड सेवा पुरवठादारांवर असलेले अतिअवलंबित्व उघड झाले आहे.

सुरुवात रात्रीपासूनच

  • १८ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री उशिरा या आउटेजच्या प्रारंभिक तक्रारी सुरू झाल्या. अनेक वापरकर्त्यांनी ‘एरर 500’ दिसत असल्याची नोंद केली. हा सर्व्हरस्तरीय समस्येचा महत्त्वाचा कोड आहे. X (पूर्वीचे ट्विटर) आणि Canva सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सला याचा सर्वात आधी फटका बसला.
  • विशेष म्हणजे वेब आउटेज ट्रॅक करणारे Downdetector हा प्लॅटफॉर्मदेखील त्यामुळे अडचणीत आला, त्यांच्या सेवेलाही फटका बसला, हे विशेष. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, क्लाऊडफ्लेअरची स्टेटस पेजेसदेखील या घटनेमुळे काही काळासाठी ऑफलाइन झाली.
  • त्यामुळे ग्राहक आणि ही व्यवस्था मॉनिटरिंग करणाऱ्यांना समस्या रिअल-टाइममध्ये ट्रॅक करणे कठीण झाले. मात्र काही क्षणांनी स्टेटस पेज पुन्हा ऑनलाइन दिसू लागले.

Cloudflare आहे तरी काय?

  • Cloudflare ही जगभरातील सर्वात मोठ्या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे. तिची मुख्य भूमिका वेबसाइट्स वेगवान, सुरक्षित आणि स्थिर ठेवणे होय.
  • Google, X (पूर्वीचे Twitter), OpenAI (ChatGPT), Canva, Uber Eats, League of Legends, PayPal, Zerodha अशा लाखो वेबसाइट्स आणि अॅप्स क्लाउडफ्लेअरच्या नेटवर्कवर काम करतात.
  • क्लाऊडफ्लेअर ही AWS सारखी सर्वसाधारण वेबसाइट होस्ट नाही. तर ते जगभरातील लाखो वेबसाइट्स आणि ऑनलाइन यंत्रणा आणि व्यवस्थांना अत्यावश्यक, मिशन-क्रिटिकल सुविधा पुरवणारी इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर सेवा आहे.

सायबर हल्ल्यांपासून संरक्षण

  • क्लाऊडफ्लेअर एक कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) चालवते, जी मूलत: कोणत्याही वेबसाइटचा कन्टेंट कॉपी करून जगभरातील सर्व्हर्सवर साठवते. वापरकर्ता एखादी वेबसाइट उघडण्याची विनंती करतो तेव्हा CDN जवळच्या सर्व्हरवरून तो कंटेन्ट पुरवते, त्यामुळे साइट जलद लोड होते.
  • याहूनही महत्त्वाचे म्हणजे, क्लाऊडफ्लेअर महत्त्वपूर्ण सुरक्षा सेवा पुरवते, यात मोठ्या डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ल्यांपासून संरक्षणही समाविष्ट आहे.
  • क्लाऊडफ्लेअरमध्ये काही बिघाड झाला तर त्याच्या CDN किंवा सुरक्षा स्तरांवर अवलंबून असलेल्या वेबसाइट्सला त्याचा लगेचच फटका बसतो. वेब ट्रॅफिकला आवश्यक कंटेन्ट मिळत नाही किंवा क्लाऊडफ्लेअरच्या तांत्रिक साखळीतील बिघाडामुळे ‘सर्व्हर एरर’चा संदेश दिसू लागतो.

Outage चा परिणाम

  • लाखो वापरकर्त्यांनी Down Detector सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.
  • पैसे ट्रान्सफर करणारी अॅप्स, ई-कॉमर्स, सोशल मीडिया अशा सर्वच ठिकाणी अडचणी येत होत्या.
  • मुख्यत्वे भारत, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा सर्व प्रमुख इंटरनेट वापरकर्ते अधिक असलेल्या देशांमध्ये ही समस्या अधिक जाणवली.
  • अनेक उद्योग, आणि मीडिया कंपन्यांचा संपूर्ण व्यवसाय काही काळासाठी ठप्प झाला. अनेक वेबसाइट्स थोड्या वेळाने पुन्हा सुरु झाल्या तरी काहींसाठी ही समस्या अजूनही कायम आहे.

क्लाऊडफ्लेअरचे आउटेज का झाले?

  • या आऊटेजमागचे मूळ कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नसले, तरी तपासात असलेला एक संभाव्य घटक म्हणजे नियोजित मेंटेनन्सचा कालावधी.
  • क्लाऊडफ्लेअरने आपल्या सॅंटियागो (SCL) डेटा सेंटरमध्ये मेंटेनन्सबाबत आगाऊ सूचना दिली होती, त्यात त्या प्रदेशातील वापरकर्त्यांसाठी ट्रॅफिक रीरूट केले जाऊ शकते आणि त्यामुळे लेटन्सी (साइट लोड होण्यास लागणारा कालावधी) थोडी वाढू शकते, असे नमूद केले होते.
  • मेंटेनन्स नेहमीचा भाग असला तरी, अशा नियोजित प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रणालीबिघाडामुळे मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडथळे निर्माण होऊ शकतात.
  • आतापर्यंत क्लाऊडफ्लेअरने एवढेच स्पष्ट केले आहे की, त्यांनी समस्येचा शोध घेऊन तिचे निराकारण करण्याचे काम जागतिक स्तरावर सुरू आहे.

अशा मोठ्या आउटेजपासून वाचण्याचा काही मार्ग आहे का?

  • इंटरनेटची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्याने, अशा प्रकारचे जागतिक आउटेज भविष्यातही चिंतेचा विषय राहणार आहेत. वास्तव पाहता, वेबसेवा पुरवठादारांवर जबाबदारी असते, की त्यांच्या मेंटेनन्स टीम्स २४×७ उपलब्ध राहतील आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक समस्यांवर तत्काळ उपाययोजना करतील.
  • सध्या अनेक कंपन्या आपल्या मूळ प्रणालींची गती, सुरक्षा आणि कंटेंट डिलिव्हरीचे काम त्रयस्थ कंपनीवर सोपवतात. यामुळे क्लाऊडफ्लेअरसारख्या एका मोठ्या सेवेमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण डिजिटल जगताचे मोठे भाग तात्पुरते ठप्प होऊ शकतात. या केंद्रीकृत सुविधांवरील अतिअवलंबित्वामुळे, अगदी किरकोळ त्रुटींमुळेही ब्लॅकआउटला सामोरे जावे लागू शकते.

वापरकर्त्यांनी काय समजून घ्यावे?

  • हा बिघाड तुमच्या इंटरनेट किंवा मोबाईलमध्ये झालेला नाही; हा इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरच्या एका महत्वाच्या स्तरावर (Cloudflare) झालेला परिणाम झाला आहे.
  • फेसबुक, X, ChatGPT, किंवा इतर अॅप्स वापरताना error येणे हे जागतिक पातळीवरील बिघाडामुळे होते आहे.

क्लाउडफ्लेअर बिघाड का महत्त्वाचा आहे?

Cloudflare सारख्या कंपन्या या इंटरनेटचा ‘बॅकबोन’ अर्थात कणा असतात. त्या ठप्प झाल्या तर लाखो वेबसाइट्स आणि कोटींवर असलेले वापरकर्ते यांवर एकाच वेळेला परिणाम होतो. कधी कधी वेबसर्व्हरसाठी, कधी CDN साठी, तर कधी सुरक्षेसाठी ही सेवा आवश्यक असते. त्यामुळे इंटरनेटचे विकेंद्रीकरण महत्वाचे असले तरी, अशा सिंगल पॉईंट फेल्युअरने संपूर्ण जगभर इंटरनेट सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.