रेश्मा राईकवार

देशभरात विनोदावर आधारित कार्यक्रमांची लाट आली, त्या लाटेतील पहिल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात चार चांगल्या विनोदी कलाकारांचे चेहरे मनोरंजन क्षेत्राला गवसले होते. त्या कार्यक्रमाचा विजेता ठरलेला सुनील पाल, एहसान कुरेशी, राजू श्रीवास्तव आणि ‘पैचान कोन’ म्हणत नावारूपाला आलेला नवीन प्रभाकर. एकदा तुम्हाला देशभर प्रसिद्ध असलेल्या मोठ्या मनोरंजन वाहिनीवर ओळख मिळाली की तुम्हाला त्या त्या क्षेत्रातील अधिक संधी आपोआप खुल्या होतात. केवळ दूरचित्रवाहिनीच नव्हे तर प्रत्यक्षात होणारे सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ – सोहळे यातूनही कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी मिळत जातात. तशा संधी राजू श्रीवास्तव यांनाही मिळाल्या आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख अधिक घट्ट केली.

नकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे भवतालाबद्दलचे निरीक्षण कौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग या गोष्टी होत्या. शिवाय, आपल्याला विनोदी कलाकारच व्हायचे आहे हेही त्यांनी आधीपासूनच ठरवले असल्याने त्यादृष्टीने जे-जे करता येईल ते त्यांनी केले. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या राजू श्रीवास्तव यांनी चित्रपट क्षेत्रात विनोदी कलाकार म्हणून अगदी किरकोळ भूमिका करायला सुरूवात केली होती. एकाच वेळी ‘तेजाब’, ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’ सारख्या चित्रपटांमधून छोट्या-मोठया भूमिका आणि स्टॅण्ड-अप कॉमेडीचे कार्यक्रमही त्यांनी सुरू ठेवले. तरीही विनोदी कलाकार म्हणून देशभर प्रसिद्धी मिळायला त्यांना २००५ सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यांचा चेहरा घरोघरी लोकप्रिय होण्यामागे दूरचित्रवाहिनी आणि विनोदावर आधारित रिॲलिटी शो या दोन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या.

बाकी विनोदी कलाकार कुठे गेले?

गाणी आणि पाठोपाठ नृत्यावर आधारित रिॲलिटी शोचे अमाप पीक आल्यानंतर नवे काय, या शोधात असलेल्या वाहिन्यांनी विनोदावर आधारित रिॲलिटी शोची नवी टूम काढली. देशभरातील सर्वोत्कृष्ट विनोदवीराचा शोध घेणारा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा शो स्टार प्लस वाहिनीवर २००५ साली आला. या पहिल्या पर्वात राजू यांच्याबरोबर आलेले एहसान कुरेशी, सुनील पाल आणि नवीन प्रभाकरसारख्या कलाकारांनाही तेव्हा प्रसिद्धी मिळाली होती, मात्र त्यानंतर ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत. याच रिॲलिटी शोच्या पुढच्या पर्वामधून आलेल्या कपिल शर्मानेही लोकांची मानसिकता ओळखून ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’सारख्या शोमधून बॉलिवुडमधील प्रसिद्ध कलाकारांचा हात धरून आपली वाट पक्की केली. त्या तुलनेत राजू श्रीवास्तव यांनी मात्र केवळ आपल्या विनोदी कार्यक्रमांच्या जोरावरच आपली लोकप्रियता टिकवून ठेवली. इतक्या सगळ्या विनोदी कलाकारांमध्येही राजू श्रीवास्तव यांना अधिक पसंती मिळण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा निखळ आणि सहज विनोदी अभिनय. याशिवाय, त्यांनी सातत्याने रिॲलिटी शोमधून घेतलेला सहभागही त्यांचे नाव चर्चेत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरला. यासाठी काही उदाहरणे द्यावी लागतील –

१. दूरचित्रवाणी या माध्यमाची ताकद ओळखलेले राजू ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी का महामुकाबला’, ‘लाफ इंडिया लाफ’ अशा विविध विनोदी सादरीकरणावर आधारित रिॲलिटी शो आणि त्यांच्या विविध पर्वातून सहभाग घेत राहिले.

२. सातत्याने लोकांसमोर असण्याची आणि प्रामाणिकपणे छोट्या पडद्याच्या बरोबरीने प्रत्यक्ष कार्यक्रमांमधून सहभाग घेत राजकारण्यांच्या नकला, तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आधार घेत केलेली विनोदाची मांडणी अशा पद्धतीने ते आपली कला वाढवत राहिले.

३. ज्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या पहिल्या पर्वात ते दुसऱ्या क्रमांकाचे उपविजेते ठरले होते, त्याच शोने नंतर काढलेल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज – चॅम्पियन्स’चे पर्व त्यांनी ‘द किंग ऑफ कॉमेडी’ची उपाधी मिळवत गाजवले. केवळ विनोदी कार्यक्रमच नव्हे तर राजू यांनी ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’सारख्या अन्य रिॲलिटी शोमध्येही सहभाग घेतला.

विश्लेषण: गांधी कुटुंबाबाहेर काँग्रेसचे अध्यक्षपद? थरूर विरुद्ध गेहलोत लढत होणार का?

४. एकेकाळी ‘देख भाई देख’, ‘शक्तिमान’ सारख्या मालिकांमधून केलेल्या भूमिका आणि नंतर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’सारख्या विनोदी कार्यक्रमांमधून सातत्याने केलेल्या भूमिका यामुळे राजू श्रीवास्तव हे नाव आणि त्यांचा चेहरा कायम लोकांसमोर राहिले.

५. त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. एक कलाकार, राजकारणी, विविध चित्रपट – मालिका संघटनांशी जोडले जाऊन त्यांनी केलेले कार्य या सगळ्यातून जमा होत गेलेला अनुभव, विचार त्यांच्या कलेतही प्रतिबिंबित होत राहिले. विनोदी सादरीकरण, अभिनय, सूत्रसंचलन अशा विविध आघाड्यांवर काम करत त्यांनी आपल्यातील कलाकार जागा ठेवला. उत्तम विनोदबुद्धी आणि काळानुसार दूरचित्रवाहिनी, चित्रपट अशा माध्यमातून स्वत:ला बदलत, सातत्याने काम करत लोकांसमोर आपली कला सादर करत राहण्याचे त्यांनी दाखवलेले व्यावहारिक शहाणपण यांच्या जोरावर ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरले.