Did Hitler really have a micropenis?: अॅडॉल्फ हिटलर या नावाचा इतिहास वेगळा सांगायला नको. कुठल्याही कथेतला, इतिहासातला व्हिलन हा हिरोपेक्षाही जास्तच महत्त्वाचा असतो. कारण तो असतो म्हणून हिरोला महत्त्व असतं. किंबहुना, येणाऱ्या भविष्यकाळातही त्याच व्हिलन विषयी जाणून घेण्याची ओढ अधिक दिसून येते, असचं काहीसं हिटलरच्या बाबतीत आहे. हिटलरने केलेली कृष्णकृत्य नक्कीच विसरता येणार नाहीत. परंतु, सध्याच्या ट्रेण्डप्रमाणे जे विकलं जातंय, त्याचेच वाभाडे काढण्याची प्रवृत्ती फोफावल्याचे दिसून येते आणि म्हणूनच मीडिया संशोधकांच्या केंद्रस्थानीही हिटलरच आहे.
१५ नोव्हेंबर रोजी चॅनेल 4 वर Hitler’s DNA: Blueprint of a Dictator हा माहितीपट प्रसारित झाला. या माहितीपटात हिटलरच्या मानसिक, शारीरिक आरोग्याविषयी काही महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत. शिवाय यापूर्वी हिटलर विषयी प्रचलित असलेल्या काही मिथकांचे खंडन करण्यात आले आहे. परंतु, हे करत असताना संशोधन क्षेत्राच्या काही मर्यादांचे उल्लंघन केल्याची टीका या माहितीपटावर होत आहे.

चॅनेल 4 या ब्रिटिश वाहिनीवर दोन भागांचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. ही काही पहिलीच वेळ नव्हती, त्यापूर्वी याच वाहिनीवर २०१४ साली अशाच स्वरूपाचा Dead Famous DNA नावाचा एक कार्यक्रम प्रदर्शित झाला होता. या कार्यक्रमामुळे मोठा वाद त्या वेळेस झाला होता. डेव्हिड अर्विंग (David Irving) हा एक ब्रिटिश लेखक आणि इतिहासकार आहे. वादग्रस्त आणि चुकीच्या दाव्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. हिटलरने ज्यूंच्या संहाराचे आदेश दिले नव्हते, गॅस चेंबरचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला नव्हता, असा दावा त्याने त्यावेळेस केला होता.

अर्विंग त्याच्या पुस्तकांमध्ये तो नाझींना आणि अॅडॉल्फ हिटलरला समजून घेण्याचा किंवा निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यानेच २०१४ साली Dead Famous DNA या कार्यक्रमात त्याच्याकडे हिटलरचे केस आहेत, असा दावा केला होता. त्या केसांच्या बटांसाठी चॅनेलकडून त्याला £3,000 देण्यात आले होते. परंतु, त्यावर झालेल्या संशोधनात ते केस हिटलरचे नव्हते, असे आढळून आले. त्यामुळे त्यातून DNA मिळवणे शक्यच नव्हते. परिणामी ते केस डीएनए सिक्वेन्सिंगसाठी पूर्णपणे निरुपयोगी ठरले.
हिटलरच्या जिवंत नातेवाइकांनी सहकार्य नाकारले
परंतु, या नवीन माहितीपटाच्यावेळी माहितीपटाच्या निर्मात्यांनी पूर्वीची चूक टाळण्याचा प्रयत्न केला आहे. पेनसिल्व्हानियातील गेटीसबर्ग येथील एका दुर्लक्षित लष्करी इतिहास संग्रहालयात त्यांना रक्ताने माखलेला कापडाचा तुकडा सापडला. ज्या सोफ्यावर हिटलरने आत्महत्या केली, त्या सोफ्याचा रक्ताने माखलेला कापडाचा एक तुकडा एका अमेरिकन सैनिकाने कापून घेतला होता. हे रक्त खरोखर हिटलरचेच आहे, हे सिद्ध करण्यासाठी ऑस्ट्रिया आणि अमेरिकेतील हिटलरच्या जिवंत नातेवाइकांकडून नव्या DNA नमुन्यांची मागणी करण्यात आली. परंतु माध्यमांच्या गदारोळापासून दूर राहण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याचे नाकारले.
पूर्वी घेतलेल्या नमुन्याचा वापर
म्हणून त्यांनी हिटलरच्या वंशातील काहींच्या पूर्वी घेतलेल्या नमुन्याचा वापर केला. एका बेल्जियमच्या पत्रकाराने १० वर्षांपूर्वी हिटलरच्या पुरुषवंशातील म्हणजे पिढ्यान्पिढ्याने वडिलांकडून चालत येणाऱ्या एका नातेवाईकाचा DNA स्वॅब (तोंडातील पेशींचा नमुना) घेतला होता. त्या पत्रकाराला पहिल्या महायुद्धाच्या काळात हिटलरला एक अनौरस मुलं होते का? या अफवेतील तथ्यता तपासायची होती. त्यासाठी त्याने हिटलरच्या नातेवाईकाचा DNA नमुना गोळा केला होता.

कार्यक्रमात सहभागी संशोधकांनी हा जुना नमुना तपासला, तेव्हा त्यांना त्या DNA मध्ये Y-क्रोमोसोम हिटलरच्या रक्ताशी अचूक जुळणारा दिसला. म्हणजेच हा नातेवाईक हिटलरच्या वंशातीलच आहे आणि त्यामुळे कार्यक्रमातील रक्ताचा नमुना खरोखरच हिटलरचा असण्यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु, या संशोधनासाठी आपला DNA नमुना वापरावा अशी परवानगी त्या नातेवाईकाने दिली होती का, याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. याच माहितीच्या आधारे माहितीपटाच्या निर्मात्यांनी, त्यांच्याकडे हिटलरचे खरे रक्त आहे, असा दावा केला आहे.
या माहितीपटासाठी प्रोफेसर ट्युरी किंग आणि डॉ. अॅलेक्स के या दोन तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. प्रोफेसर ट्युरी किंग यांनी रिचर्ड तिसऱ्याच्या डीएनएवर संशोधन केले आहे. तर, पॉट्सडॅम विद्यापीठातील डॉ. अॅलेक्स के हे नाझी कालखंडाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. या दोघांनी मिळून हिटलरची वंशावळ, शारीरिक समस्या, मानसिक आरोग्य याबद्दल माहिती गोळा केली.
या संशोधनातून काय समोर आले? (What did Hitler’s DNA documentary find?)
१ हिटलरला वंश कोणता?
हिटलरच्या वडिलांचे वडील कोण हे माहीत नसल्यामुळे तो ज्यू वंशीय होता अशी अफवा होती, मात्र या कार्यक्रमात करण्यात आलेल्या DNA चाचणीमुळे तो ज्यू नव्हता, हे स्पष्ट झालं.
२ कॉलमन सिंड्रोम (What is Kallmann Syndrome?)
DNA मध्ये PROK2 नावाच्या जनुकामध्ये एक बदल सापडला. त्यामुळे हिटलरला कॉलमन सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार होता हे आढळते. या विकारात नेहमीची किशोरावस्था प्राप्त होण्यात समस्या येतात, टेस्टोस्टेरॉन कमी होतात, वृषणाची वाढ होत नाही. २०१० साली जर्मन संशोधकांनी उघड केलेल्या लँड्सबर्ग तुरुंगातील हिटलरच्या वैद्यकीय नोंदींमध्ये अशाच प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांची नोंद आहे. त्या नोंदींमध्ये डॉक्टरांनी हिटलरला उजव्या बाजूचा क्रिप्टॉर्किडिझम (वाढ न झालेला उजवा वृषण) असल्याचे म्हटले आहे. कॉलमन सिंड्रोम असलेल्या सुमारे १०% लोकांमध्ये मायक्रोपेनिस (Micropenis) ही अवस्था आढळते.
हिटलरच्या शरीराशी संबंधित मुद्दे आता उकरून काढणे योग्य आहे का?
महितीपट निर्माते म्हणतात, “हिटलरने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही तपास केला.” परंतु, इतिहासकार या विधानाचा निषेध करतात. हिटलरने शरीर जाळण्यास सांगितले कारण मुसोलिनीचा मृतदेह लोकांनी भर रस्त्यावर ओढत आणला होता. म्हणूनच तो काहीतरी खास लपवत होता असा दावा करणे योग्य नाही, असे मत इतिहासकार व्यक्त करतात. इतिहासकारांचे एकमत असे आहे की, मुसोलिनीचा मृतदेह सार्वजनिक ठिकाणी ओढत नेण्यात आल्याची बातमी ऐकल्यानंतर हिटलरला ती भीती वाटली होती.
या गोष्टी हिटलरच्या मानसिकतेवर परिणाम करू शकल्या का?
या माहितीपटात शरीरातील उणीवांमुळे हिटलरमध्ये कमीपणाची भावना असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टेस्टोस्टेरॉनची अस्थिर पातळी यामुळे हिटलरच्या विचारांत बदल घडला असेल का? यावरही प्रकाश टाकण्यात आला.
पॉलीजेनिक रिस्क स्कोर (Is PRS testing reliable for diagnosing mental disorders?)
- परंतु, त्यानंतर कार्यक्रमात एक अवैज्ञानिक पाऊल टाकले गेले. हिटलरच्या DNA चा वापर आणि PRS (Polygenic Risk Score) चाचणीकरून ADHD, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया, antisocial behaviour यांची संभाव्यता काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, PRS- पॉलीजेनिक रिस्क स्कोर चाचण्या एका व्यक्तीचा अचूक आजार सांगू शकत नाहीत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या चाचणीच्या माध्यमातून विशिष्ट लोकसंख्येत एखादा आजार किती प्रमाणात आहे हे सांगता येतं. पण एका व्यक्तीला हा आजार आहे का हे सांगू शकत नाही.
- या माहितीपटात हिटलरला ADHD होता हे सांगण्यात आलं आहे, हा दावा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो आणि चुकीचा आहे. अनेक वैज्ञानिकांना genetic determinism म्हणजेच तुम्ही कोण आहात हे तुमचे जीन्स ठरवतात, हा विचार चुकीचा वाटतो.
- या सगळ्यामुळे लोकांचा ADHD, ऑटिझम असलेल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. या समस्या असणाऱ्या व्यक्ती हिटलरसारख्या असतात, असा कलंक लागला जाऊ शकतो किंवा त्यांच्याकडे संशयाने पहिले जाऊ शकते. शिवाय हिटलरला ऑटिझम, ADHD या समस्या होत्या असे निष्कर्ष पसरवण्यात आले तर हिटलरकडेही सहानुभूतीने पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात.
