Opposition slams PM Modi over ‘Muslim fix punctures’ remark: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधित एक चर्चा सुरु आहे. ती म्हणजे त्यांच्या भाषणातून त्यांनी मुस्लिमांचा अपमान केला का की, त्यांच्या विधानांचा अर्थ चुकीचा लावला गेला. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुस्लिमांसंदर्भात नेमकं काय म्हणाले याचाच घेतलेला हा आढावा.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण, मुस्लीम समुदायाबद्दलचे विधान आणि वाद असे एक समीकरणच गेल्या काही वर्षांत तयार झाले आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, ज्यावेळी मोदी यांनी मुस्लिम समुदायाबद्दल काहीतरी विधान केलं आणि वाद झाला. आता हा एक ठरलेला पॅटर्न होऊ पाहतोय. मोदी एखादं विधान करतात ते माध्यमांतून तपासलं जातं. त्यानंतर काही दिवस टीका, प्रतिटीका, बचाव आणि गोंधळ सुरू राहतो. मोदींच्या अलीकडच्या भाषणाने पुन्हा एकदा अशाच वादाला तोंड फुटले आहे. यावेळी मोदींनी मुस्लिमांना ‘पंक्चरवाले’ म्हटले असा आरोप करण्यात आला आहे. किंबहुना पंक्चरवाले हा शब्द उजव्या विचारसरणीच्या गटाकडून गेली अनेक वर्षे मुस्लिम समाजाची अकार्यक्षमता, शैक्षणिक दर्जा आणि हलके कामधंदे करणे यामुळे हिणवण्यासाठी वापरण्यात येतो, अशी टीका सातत्याने डाव्यांकडून होते आहे. परंतु, मोदी नेमकं काय म्हणाले हेही पाहणं आवश्यक आहे. सध्या वादग्रस्त ठरत असलेलं विधान पंतप्रधान मोदी यांनी वक्फ बोर्ड दुरुस्तीच्या बचावा संदर्भात केलं होतं.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “जर वक्फची मालमत्ता योग्य रीतीने वापरली गेली असती, तर मुस्लिम तरुणांना उपजीविकेसाठी टायरचे पंक्चर काढण्याचं काम करावं लागलं नसतं.” ही ओळ आर्थिक असंतुलन दाखवण्यासाठी असावी, पण अनेकांनी यातून वेगळाच अर्थ घेतला आहे. पंतप्रधानांचा मुद्दा ‘संधी गमावण्याबाबत’ होता. म्हणजे वक्फच्या मालमत्तेचा योग्य वापर झाला असता तर कितीतरी लोकांचं आयुष्य बदललं असतं. कदाचित पंतप्रधान मोदी यांचा मुख्य हेतू, मुस्लिम समुदायासाठी इतकं काही राखून ठेवलं गेलं असूनही त्यांच्यापर्यंत फारसं काही पोहोचलेलं नाही, हे दाखवून देणं असा असावा. यात, मुद्दा कसा मांडला गेला आहे. हेही महत्त्वाचं आहे.

पंक्चरवाला या शब्दात नेमकं चुकतंय तरी काय?

सध्या होणारा वाद याच भोवती फिरतो आहे. मोदींनी मुस्लिमांचा अपमान केला की नाही, का त्यांच्या विधानांचा अर्थ चुकीच्या संदर्भात घेतला गेला अशी चर्चा सुरु आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेला पंक्चरवाला हा शब्द शिवी कसा ठरला. याबाबत मात्र कोणीही चर्चा करत नाही. आपण एक समाज म्हणून श्रम करणार्‍यांविषयी एवढा नकारात्मक भाव का बाळगतो? टायर दुरुस्त करणारे, रस्ते झाडणारे, ओझी वाहणारे यांना आपण हीनच मानतो. हे स्पष्ट बोललं गेलं नाही तरी आपल्या संवादात, विनोदांमध्ये आणि मौनामध्ये हे सतत दिसून येतं. हा विषय फक्त एका भाषणाचा किंवा एका वादाचा नाही. हा त्या मानसिकतेचा प्रश्न आहे. समाजात कामांची वर्गवारी प्रतिष्ठित आणि हलकी अशी केली आहे. त्यामुळेच ‘पंक्चरवाला’ हा शब्द अपमानास्पद वाटतो. परंतु, हा दोष ते कष्टाचं काम करणाऱ्यांचा नाही. तर संकुचित विचार करणाऱ्या समाजाचा किंवा त्या व्यक्तीचा आहे.

ही मानसिकता याआधीही दिसून आली आहे. निवडणुकीदरम्यान जेव्हा मोदींची ‘चहावाला’ म्हणून थट्टा केली गेली होती. जणू चहा विकणं ही लाज वाटावी अशी गोष्ट आहे. त्यावेळी चूक करणारे दुसऱ्या पक्षाचे तथाकथित उच्चभ्रू लोक होते. भारतीय जनता पक्षाने त्या वेळच्या टीकेचं रूपांतर अगदी चतुराईने प्रेरणादायी कथेत केलं. चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो, हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. शिवाय राजकीय दृष्टिकोनातून ते यशस्वीही ठरलं.

पण त्या वेळीसुद्धा एक मूलभूत मुद्दा दुर्लक्षित राहिला.

प्रश्न कधीच हा नव्हता की एक चहावाला उंच भरारी घेऊन मोठा माणूस होऊ शकतो का? खरी गोष्ट अशी आहे की, कोणीतरी मोठं झाल्यावरच त्याला सन्मान मिळावा का? तो चहावाला असतानाच त्याच्याकडे आदराने का पाहिलं जात नाही? अशा व्यक्तींची कहाणी आपण फक्त ते त्यांच्या संघर्षमय आयुष्यातून वर आल्यानंतरच ‘रोमँटिक’ करतो. यावरूनच हे स्पष्ट होतं की, आपण असा समाज घडवणं गरजेचं आहे, जिथे कष्ट करणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळेल. तो काय काम करतो यावरूनच केवळ त्याला मिळणारा आदर ठरणार नाही.