India is the deadliest country for selfies सध्या प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. परफेक्ट फोटो काढण्याची धडपड आज प्रत्येकामध्ये दिसून येते. त्यात सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अनेकांना सेल्फीच्या हव्यासाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. रेल्वे रुळांपासून ते उंच कड्यांपर्यंत लोक केवळ एका सेल्फीसाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहेत आणि त्यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ‘द बार्बर लॉ फर्म’ने केलेल्या एका नवीन अभ्यासात जगभरातील सेल्फीसाठी सर्वांत धोकादायक असलेल्या देशांची यादी समोर आली आहे. दुर्दैवाने या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नेमके या अभ्यासातून काय समोर आले आहे? सेल्फीमुळे किती जणांनी आपला जीव गमावला? भारतीयांना सेल्फीचे इतके वेड का आहे? जाणून घेऊयात…
नवीन अभ्यासातून काय समोर आले?
- भारतात सेल्फीशी संबंधित २७१ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत.
- या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, संशोधकांनी मार्च २०१४ ते मे २०२५ या काळात जगभरातून सेल्फीशी संबंधित घटनांचा मागोवा घेतला.
- त्यांनी Google News चा स्रोत म्हणून वापर केला.
- या अभ्यासात केवळ त्या घटनांचा समावेश करण्यात आला जिथे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना लोकांना दुखापत झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला.
सेल्फीमुळे जगातील सर्वाधिक मृत्यू भारतात
नवीन अभ्यासानुसार, सेल्फी काढताना सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. जगभरात घडलेल्या अशा घटनांपैकी ४२.१ टक्के घटना एकट्या भारतात घडल्या आहेत. देशात सेल्फीशी संबंधित २७१ अपघात नोंदवले गेले, ज्यात २१४ जणांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले आहेत. ‘Selfies : A Boon or Bane?’ या २०१८ च्या एका अभ्यासात असे दिसून आले की, सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये बुडणे, गाडी किंवा ट्रेनची धडक लागणे किंवा उंचीवरून पडणे ही मुख्य कारणे होती. हा अभ्यास इंग्रजी भाषेतील बातम्यांवर आधारित आहे.

संशोधकांनी असेही सांगितले की, मृत्यूची खरी संख्या यापेक्षा खूप जास्त असू शकते. कारण- अनेक घटनांची नोंद होत नाही आणि ‘सेल्फीमुळे मृत्यू’ हे अधिकृतपणे मृत्यूचे कारणही मानले जात नाही. भारतात अशा दुर्दैवी घटना सतत घडत आहेत. नुकतेच, ओडिशाच्या दुदुमा धबधब्यावर व्हिडीओ शूट करताना २२ वर्षीय यूट्यूबर सागर तुडू हा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
त्याआधी फक्त दोन महिन्यांपूर्वी तेलंगणातील मेदीगड्डा येथे गोदावरी नदीत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना १३ ते १९ वयोगटातील सहा चुलत भावंडे बुडून मरण पावली. या वर्षीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात रेल्वे रुळावर सेल्फी काढताना एका २४ वर्षीय तरुणाला एका ट्रेनने धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये एका पर्यटकाला जंगली हत्तीबरोबर फोटो काढायचा होता; पण हत्तीने त्याला चिरडून ठार केले.
भारतीयांना सेल्फीचे इतके वेड का?
संशोधकांचे म्हणणे आहे की, यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. जास्त लोकसंख्या असलेली शहरे, उंच कडे, नद्यांचे किनारे व रेल्वे रूळ यांसारख्या धोकादायक ठिकाणी सहज पोहोचता येणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियाचा वाढत चाललेला वापर. सिडनी विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. जोलिना सिनानान या सोशल मीडियाचा अभ्यास करतात. त्यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ABC) न्यूजला सांगितले की, भारताची व्हिज्युअल संस्कृती इतर अनेक देशांपेक्षा वेगळी आहे.
डॉ. सिनानान म्हणाल्या, “भारतात सेल्फी संस्कृती जास्त पसरलेली आहे. कारण- ती येथील सार्वजनिक आणि खासगी व्हिज्युअल संस्कृतीशी जोडलेली आहे. फोटो हे प्रतीकात्मक आणि भौतिक दोन्ही प्रकारे ओळख निर्माण करतात, जे आपल्या ऑफलाइन व्हिज्युअल संस्कृतीशी संबंधित असतात.” व्हायरल कंटेंट तयार करण्याच्या इच्छेने अनेकांना जीवघेणे आणि कधी कधी धोकादायक धोके पत्करण्यास प्रवृत्त केले आहे.
द बार्बर लॉ फर्मचे संस्थापक व प्रमुख वकील क्रिस बार्बर म्हणतात, “आमच्या संशोधनातून एक चिंताजनक ट्रेंड समोर आला आहे. सोशल मीडियातील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लोकांना अक्षरशः आपला जीव गमवावा लागत आहे.” त्यांनी लोकांना लाइक्ससाठी धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी विचार करण्याचा आग्रह केला आहे. “सुंदर क्षण कॅप्चर करण्यासाठी नेहमीच सुरक्षित पर्याय उपलब्ध असतात. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. कितीही लाइक्स किंवा शेअर्स असले तरी ते तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाचे नाहीत,” असे बार्बर म्हणाले.
या यादीत इतर कोणकोणत्या देशांचा समावेश?
या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र इतर अनेक देशांमध्येही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेमध्ये सेल्फीशी संबंधित असलेल्या ४५ घटना घडल्या असून, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर रशिया १९, पाकिस्तान १६ व ऑस्ट्रेलिया १५ व्या क्रमांकावर आहे.
टॉप १० मध्ये इंडोनेशिया, केनिया, ब्रिटन, स्पेन व ब्राझील यांचाही समावेश आहे. या देशांमधील आकडे भारतापेक्षा खूप कमी असले तरी हे अपघात एक जागतिक समस्या दर्शवितात, विशेषतः पर्यटनस्थळांवर. पर्यटक धोक्यांचा विचार न करता, फोटोसाठी काहीही करायला तयार असतात, जे धोकादायक ठरते.