39-Foot Dinosaur Species Unearthed in China’s: ज्युरासिक पार्क हा सिनेमा माहितच नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ‘त्या’ मोठ्या डायनासोरनी काळजाचा ठोका चुकवला होता. आता कल्पना करा त्याच कालखंडातील महाकाय डायनासोरनी जर पृथ्वीवर पुन्हा पाय ठेवला तर? …काळाच्या गर्भात हरवलेल्या अशा एका महाकाय डायनासोरचा शोध चीनमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष घेतला आहे. मातीच्या थराखालून बाहेर आलेली ती हाडं म्हणजे जणू ‘ज्युरासिक वर्ल्ड’मधून थेट पृथ्वीवर परतलेली एक जिवंत कथाच आहे…
इतिहासाच्या पानांतून ज्युरासिक काळ पुन्हा एकदा जागा झाला आहे आणि हा शोध म्हणजे पृथ्वीच्या प्राचीन रहस्यांतील आणखी एक रोमांचक अध्याय ठरतो आहे.
चीनमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना तब्बल ३९ फूट लांबीचा एक विशालकाय डायनासोर सापडला आहे. या शोधामुळे प्रारंभीच्या ‘युसॉरोपॉड्स’ गटाच्या नोंदींमध्ये एक महत्त्वाची भर पडली आहे. ‘हुशानोसोरस क्वीनी’ असे नाव असलेल्या या डायनासमोरचा सांगाडा चीनमधील ग्वांग्शी प्रदेशात सापडला.
हा नव्याने सापडलेला डायनासोर शाकाहारी असून ज्युरासिक काळातील एका नव्या वंश (genus) आणि प्रजातीचा (species) आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या डायनासोरचा अंशतः सांगाडा दक्षिण चीनमधील निंगमिंग काउंटी (ग्वांग्शी झुआंग स्वायत्त प्रदेश) येथील मिंगजियांग नदीजवळील हुकिऊ खाणीतील खालच्या ते मध्यम ज्युरासिक काळातील वांगमेन संरचनेत (Wangmen Formation) सापडला.
चार पायांवर चालणारा डायनासोर
या सांगाड्यात पाठीच्या कण्याच्या हाडांचे, बरगड्यांचे, ह्युमरस (खांद्यापासून हातापर्यंत असणारे हाड), उलना, फिबुला आणि पायाच्या हाडांचे जीवाश्म समाविष्ट होते, असे Acta Geologica Sinica या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. सापडलेल्या हाडांच्या आधारे वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, ‘एच. क्वीनी’ हा डायनासोर सुमारे १२ मीटर म्हणजेच सुमारे ३९ फूट लांबीचा होता आणि तो चार पायांवर चालत असे. जीवाश्म सापडल्यानंतर संशोधकांना लक्षात आलं की, हा एक नवीन टॅक्सॉन (नवीन जैववर्ग) आहे, कारण त्याच्या सांगाड्यात काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आढळल्या. या रचनांना ऑटॅपोमॉर्फीज म्हटलं जातं आणि त्या इतर सर्व ज्ञात डायनासोरांपेक्षा वेगळ्या होत्या.

“या नव्या टॅक्सॉनची ओळख खालील ‘ऑटॅपोमॉर्फीज’द्वारे करता येते. उलनाच्या (ulna) मागच्या टोकावर हुकासारखी आकृती; उलनाच्या वरच्या भागाचा छेद अर्धचंद्राकृतआणि फिब्युलाच्या मागच्या खालच्या पृष्ठभागावर असलेली खाचसदृश रचना,” असे संशोधकांनी आपल्या संशोधनात नमूद केले आहे.
“वंशवृक्षीय (phylogenetic) विश्लेषणातून हे स्पष्ट झाले की, ‘एच. क्वीनी’ ही मध्य ज्युरासिक काळातील ‘शुनोसोरस’पेक्षा नंतर विकसित झालेली प्रजाती आहे. आधीच्या संशोधनात वांगमेन संरचना (Wangmen Formation) ही आरंभीच्या ज्युरासिक काळातील आहे, असं सिद्ध झालं होत. पण या नव्या ‘युसॉरोपॉड’च्या शोधावरून ती थोडी नंतरची म्हणजे प्रारंभिक ते मध्य ज्युरासिक काळातील असावी, असा निष्कर्ष निघतो. या शोधामुळे चीनमधील ज्युरासिक काळातील युसॉरोपॉड्सच्या विविधतेत वाढ झाली आहे,” असे संशोधकांनी म्हटले आहे.
ओलसर हवामानाचा परिणाम
शास्त्रज्ञांच्या मते, हे शाकाहारी डायनासोर त्या काळात नद्यांच्या काठावर आणि सरोवरांच्या आजूबाजूच्या जंगलांत राहत असावेत. उत्खननाच्या ठिकाणी त्यांना काही माशांची खवले, दात आणि प्लेसिओसॉरचे तुटलेले दातही सापडले. यावरून त्या काळातील हवामान ओलसर आणि परिसंस्था जटिल असल्याचे संकेत मिळतात.
तब्बल तीन कोटी वर्षे जुना
वंशवृक्षीय विश्लेषणानुसार, ‘एच. क्वीनी’ हा दक्षिण चीनमध्ये आढळलेला सर्वात प्राचीन सॉरोपॉड असण्याची शक्यता आहे. तो प्रारंभिक ते मध्य ज्युरासिक काळात अस्तित्त्वात होता. म्हणजेच सुमारे २० कोटी ते १६.२ कोटी वर्षांपूर्वी तो अस्तित्त्वात होता. या शोधाचं वैशिष्ट्य म्हणजे हा डायनासोर या प्रदेशात आधी सापडलेल्या सॉरोपॉड जीवाश्मांपेक्षा तब्बल ३ कोटी वर्षे जुना आहे.
आश्चर्य म्हणजे, हा नव्याने सापडलेला प्राणी ग्वांग्शी प्रदेशात सापडलेला दुसरा ‘युसॉरोपॉड’ आहे. म्हणजे सॉरोपॉड्समधून विकसित झालेला आहे. २०२४ मध्ये या भागात पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ‘डॉन्गशिंग फॉर्मेशन’मध्ये उत्खनन करताना जिंगिया डॉन्गशिंगेन्सिस नावाची नवीन प्रजाती आणि वंश याचा शोधला होता.
शाकाहारी डायनासमोर
सॉरोपॉड्स हे शाकाहारी डायनासोर होते. त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे अतिशय लांब मान आणि शेपटी, छोटं डोकं आणि खांबासारखे मजबूत पाय. त्यामुळे ते विशाल शरीर सहजपणे सांभाळू शकत होते. या संशोधन पथकात ग्वांग्शी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, निंगमिंग काऊंटीच्या सांस्कृतिक अवशेष प्रशासन विभाग आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिब्रेट पॅलिओन्टोलॉजी अँड पॅलिओअँथ्रोपॉलॉजी या संस्थांतील शास्त्रज्ञांचा समावेश होता. संशोधकांनी नमूद केलं आहे की, “या शोधामुळे चीनमधील ज्युरासिक काळातील ‘युसॉरोपॉड्स’ या डायनासोर गटाच्या विविधतेत लक्षणीय वाढ झाली आहे.”
