अमोल परांजपे

‘डिस्ने’ ही जगातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी आणि तिचे मुख्य करमणूक स्थान असलेल्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांच्यामध्ये सध्या टोकाचा संघर्ष सुरू आहे. समिलगी व्यक्तींच्या हक्कांसंदर्भातील या वादाला २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकांची पार्श्वभूमी असल्यामुळे येत्या काळात हा वाद, न्यायालयीन संघर्ष अधिक वाढत जाणार हे स्पष्ट आहे.

डिस्ने व डेसँटिस यांच्यामध्ये वाद काय?

फ्लोरिडा राज्यामध्ये २५ हजार एकरांमध्ये पसरलेल्या, स्वायत्त ‘डिस्ने वल्र्ड’वर कुणाचे नियंत्रण असावे, यावरून डिस्नेचे व्यवस्थापन आणि डेसँटिस यांच्यामध्ये तणाव आहे. डेसँटिस यांनी अलीकडेच या करमणूक पार्कवरील डिस्नेचे नियंत्रण रद्द करणारा कायदा फ्लोरिडाच्या प्रतिनिधिगृहात मंजूर करून घेतला आहे. तर ‘ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्या अखेरच्या जीवित वारसदाराच्या मृत्यूनंतरची २१ वर्षे आपल्याकडे डिस्ने वल्र्डचे नियंत्रण असेल’ असा करार यापूर्वीच झाल्याचा दावा डिस्ने व्यवस्थापनाने केला आहे. चार्ल्स यांचे वारसदार वगैरे अतिशयोक्ती असली तरी ढोबळमानाने अनंतकाळापर्यंत डिस्ने वल्र्डवर आपलेच नियंत्रण राहील, असे व्यवस्थापनाला म्हणायचे आहे. हा वाद न्यायालयात पोहोचला असून दोन्ही बाजूंनी खटले भरण्यात आले आहेत.

डेसँटिस यांचा डिस्ने वल्र्डला इशारा काय?

डिस्ने वल्र्ड असलेला परिसर हा ‘रीडी क्रिक इम्प्रूव्हमेंट डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. याला विशेष क्षेत्राचा दर्जा प्राप्त असून त्यामुळे डिस्ने वल्र्डला स्वत:चे पोलीस, अग्निशमन दल बाळगता येते आणि आपल्या मर्जीनुसार कार्यक्रम घेण्याची त्यांना मुभा आहे. अलीकडेच डेसँटिस यांनी हा विशेष दर्जा रद्द करून डिस्ने वल्र्डला दणका दिला. त्यानंतर आता त्यांनी डिस्ने वल्र्डच्या बाजूलाच मोठा तुरुंग उभारण्याचीही घोषणा केली आहे. डिस्ने वल्र्ड हे प्रामुख्याने कौटुंबिक करमणूक केंद्र आहे. अशा वेळी शेजारी तुरुंग बांधला तर डिस्नेमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

वाद नियंत्रणासाठी की विचारांची लढाई?

‘डिस्ने वल्र्ड’ने पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांचा वारसा जपला आहे. २००७ साली डिस्ने वल्र्डने ‘फेअरी टेल वेिडग’ या आपल्या विशेष योजनेमध्ये ‘समिलगी’ विवाहांसाठीही मार्ग मोकळा केला. डिस्नेचे विद्यमान प्रमुख बॉब इगर हे ‘एलजीबीटीक्यू’ मोहिमेचे जाहीर पुरस्कर्ते आहेत. दुसरीकडे, डेसँटिस यांना अमेरिकन जनतेसमोर आपले ‘उजवेपण’ सिद्ध करायचे आहे. मार्च २०२२ मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेल्या फ्लोरिडाच्या प्रतिनिधिगृहात समिलगी व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणारा कायदा मंजूर केला आहे. ‘डोण्ट से गे’ या टोपणनावाने गाजलेल्या या कायद्याला इगर यांच्यासह डिस्ने वल्र्डने विरोध केला आहे. ही कंपनी म्हणजे समिलगी चळवळीची मोठी शक्ती असल्याचे डेसँटिस यांना माहिती असल्यामुळेच त्यांनी डिस्नेला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते.

डेसँटिस यांची राजकीय अनिवार्यता काय?

रॉन डेसँटिस २०२४ची अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, हे लपून राहिलेले नाही. मात्र त्यासाठी त्यांना आधी आपल्या रिपब्लिकन पक्षातून (प्रायमरीज) निवडून यावे लागेल. सध्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काही जणांनी उमेदवारी जाहीर केली असून प्रचारही सुरू केला आहे. सध्या तरी पक्षामध्ये ट्रम्प यांचेच पारडे जड आहे. त्यामुळे आपण ट्रम्प यांच्यापेक्षा कसे अधिक ‘उजवे’ आहोत, हे सिद्ध करणे डेसँटिस यांच्यासाठी आवश्यक असल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘डोण्ट से गे’ोसारखे कायदे, डिस्नेवर नियंत्रण मिळवून पुरोगामी चळवळीला असलेल्या पािठब्याची गळचेपी करण्याच्या उद्योगाला डेसँटिस लागले असल्याचे मानले जाते.

डिस्ने वल्र्डसमोर पर्याय कोणते आहेत?

डिस्ने वल्र्डच्या नियंत्रणासाठी डेसँटिस यांनी केलेल्या कायद्याला डिस्ने व्यवस्थापनाने न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवाय चाहत्यांच्या माध्यमातून समाजमाध्यमांद्वारे डेसँटिस आणि रिपब्लिकन पक्षावर दबाव वाढविता येऊ शकतो. मात्र या कशालाच यश आले नाही, तर आपले स्वातंत्र्य आणि अस्तित्व टिकविण्यासाठी फ्लोरिडाबाहेर जाण्याचा पर्यायदेखील डिस्नेला उपलब्ध आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या नजीकच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याने डिस्ने वल्र्डला खुले आमंत्रण दिले आहे. त्यासाठी ‘मिकीज फ्रीडम रिस्टोरेशन अ‍ॅक्ट’ हा कायदाच नॉर्थ कॅरोलिनाच्या प्रतिनिधिगृहाने मंजूर केला आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ डिस्नेवरील नियंत्रणाचा न राहता, रिपब्लिकन विरुद्ध डेमोक्रॅट्स असा झाला असून नोव्हेंबर २०२४पर्यंत तो वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.