-भगवान मंडलिक, निखिल अहिरे 

मागील काही वर्षांपासून तरुणांकडून सणोत्सव साजरा करण्याची पद्धत बदलताना दिसून येते. अपवाद डोंबिवलीच्या फडके रोडचा. डोंबिवलीच्या फडके रोडवर साजरी होणारी दिवाळी पहाट आणि गुढी पाडव्याला निघणारी शोभा यात्रा आजही अनेकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरते. याची नेमकी कारणे काय असावीत, फडके रोड म्हणजे सणोत्सव साजरा करण्याचे तरुणाईचे हक्काचे ठिकाण असे समीकरण कधी दृढ झाले, फडके रोड प्रकाशझोतात कधी पासून आला, हा सर्व इतिहासदेखील रंजक आहे. 

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Instagram friend sexually assaults young woman in nagpur
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?

फडके रोडची बांधणी केव्हा झाली?

विखुरलेल्या दुर्गम विरळ वस्तीचे गाव म्हणून डोंबिवली शहराला शंभर वर्षांपूर्वी ओळखले जायचे. गावाच्या वेशीवर ठाकुर्ली दिशेकडे असणाऱ्या गणपतीचे एक बैठे मंदिर ग्रामदैवत म्हणून ओळखले जायचे. पावसाळ्यात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यात दलदल, नाल्यांचे प्रवाह आड येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असे. या रस्त्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला तो कल्याण मधील एक पुढारलेले व्यक्तिमत्त्व बापूसाहेब उर्फ सखाराम गणेश फडके यांनी. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने कल्याण मध्ये १८९५ मध्ये गणेशोत्सव सुरू करण्यात बापूसाहेब आघाडीवर होते. कल्याणचे पुढारीपण त्यांच्याकडे होते. १९०८मध्ये ते जिल्हा लोकल बोर्डाचे म्हणजे आताच्या जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. गावात मंदिराकडे जाणारा पक्का रस्ता नसल्याने डोंबिवलीकरांनी बापूसाहेबांची भेट घेतली. १९१४मध्ये बापूसाहेबांनी लोकल बोर्डाकडून फडके रस्त्यासाठी दोन हजार रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. यातून गणेश मंदिर ते गाव असा सतराशे मीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आला. बापूसाहेब फडके यांच्या प्रयत्नाने हा रस्ता झाल्याने या रस्त्याला फडके रस्ता असे संबोधण्यात येऊ लागले. ओघाने तेच नाव कायम राहिले.

काही दशकांपूर्वी फडके रोडवर दिवाळी कशी साजरी केली जायची ?

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे फडके रोडवर जमून शुभेच्छा देण्याची पद्धत जाणत्या ग्रामस्थांनी डोंबिवलीत सुरू केली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण फडके रोडवर भेटू असे प्रत्यक्ष भेटीत यापूर्वी स्थानिक रहिवासी, नोकरदार, व्यावसायिक एकमेकांना सांगायचे. महिला, पुरुष तरुण, तरुणी त्यावेळी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी फडके रोडवर एकत्र येत होते. या एकत्रीकरणातून मित्रांचे गट तयार होऊ लागले. डोंबिवलीतील काही जमीन मालकांकडे शेती, गाई, बैल होते. ते दिवाळीच्या दिवशी गाई, बैल सजवून गणपती मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत बैलांच्या झुंजी लावण्यासाठी आखाड्यावर येत असत. दिवाळीच्या काळात सजविलेले गाई, बैल पाहण्याचे ठिकाण म्हणून फडके रोड परिसर ओळखला जात होता. फडके रोडवर येणाऱ्यांमध्ये जुने जाणते आबासाहेब पटवारी, ह. शं. कांत, बापूसाहेब जपे, ॲड. श्रीकांत गडकरी, भालचंद्र लोहकरे, नकुल पाटील, धाट गुरुजी, जगन्नाथ पाटील अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींचा सहभाग होता. 

देशातील पहिली स्वागत यात्रा? 

१९९९ मध्ये ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या संकल्पनेतून माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी,श्री गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून चैत्र पाडव्याला देशातील पहिली नववर्ष स्वागत यात्रा डोंबिवलीत सुरू करण्यात आली. स्वागत यात्रेपासून फडके रोडचे महत्त्व आणखीच वाढले. विविध जाती, धर्म, पंथाचे लोक स्वागत यात्रेत सहभागी होतात. नवतरुण पिढीला या घटनेपासून फडके रोडचे आकर्षण अधिक वाटू लागले. शुभ आणि सकारात्मक गणपतीच्या साक्षीने घडण्यासाठी फडके रोड उत्तम, असे बोलण्याची पद्धत रूढ झाली. डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील मंडळीदेखील या ठिकाणी उत्सव साजरा करायला येऊ लागली. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी साजरी केली जाणारी दिवाळी पहाट आणि गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा या फडकेरोडचे मुख्य आकर्षण असते. 

तरुणाई फडके रोडवर कशी जमू लागली?

डोंबिवलीत गावात एकमेव फडके रस्ता खडी-डांबराचा तयार झाला होता. बाकी रस्ते कच्च्या पायवाटेचे. यामुळे गावात सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असला की तो सुस्थित असलेल्या फडके रस्त्यावर घेतला जायचा. हळूहळू राजकीय कार्यक्रम, सभा, बैठका या रस्त्यावर होऊ लागल्या. मंदिराकडे जाणारा रस्ता तयार झाल्याने या रस्त्यावरील वर्दळ वाढली. दिवाळीच्या दिवशी ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून फडके रस्त्यावर ग्रामस्थ येत होते. या निमित्ताने स्थानिक, विविध प्रांतांमधून नोकरी, व्यवसायासाठी आलेले नागरिक एकमेकांना भेटू लागले. महिला, पुरुष, लहान मुलांची वर्दळ दिवाळीच्या दिवशी फडके रस्त्यावर असायची. यानंतर तरुणाई सणोत्सवासाठी एकत्र येऊ लागले. यातून अनेक तरुण – तरुणींची घट्ट मैत्री जुळली. तर काहींच्या रेशीमगाठीदेखील जुळल्या. सध्या डोंबिवलीकरांची तिसरी, चौथी पीढी दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी येते. दिवाळीच्या दिवशी फडके रस्त्यावर जमायचे, गणपतीचे दर्शन घ्यायचे अशी परंपराच आता झाली आहे. 

दिवाळी पहाटसाठी तरुणाई कोठून येते?

दिवाळी पहाटसाठी डोंबिवलीतील फडके रोडवर जायाचे म्हणजे तरुण, तरुणी, हौशी कुटुंबिय १५ दिवसांपासून अगोदर कामाला लागतात. नवीन पेहराव, नवा मोबाइल, देखणी महागडी पादत्राणे याचे कौतुक मित्र-मैत्रिणींकडून होईल याची काळजी घेतली जाते. काही प्राणीप्रेमी आपले पाळीव श्वान पारंपरिक पेहरावात घेऊन येतात. बदलापूर, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी परिसरातून तरुण, तरुणी दुचाकी, नव्या चार चाकीने फडके रोडवर येतात. पहाटे पाच वाजल्यापासून ते कडक उन चढेपर्यंत रंगीबेरंगी पेहरातील फडके रोड तरुणाईने बहरलेला असतो. वर्षभराचे रागरुसवे फडके रोडवर सोडून काही जण आपली नवी वाटचाल सुरू करतात.