Wi-Fi and brain function डिजिटल युगात इंटरनेट प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरत आहे. स्मार्टफोनपासून ते टीव्हीपर्यंत आपली सर्व उपकरणे इंटरनेटशी जोडलेली असतात. त्यासाठी ऑफिस, घर आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील वाय-फाय उपलब्ध असते. हेच वाय-फाय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतेय, असे अनेक दावे वारंवार केले जातात. गेल्या काही काळापासून लोकांनी रात्री वाय-फाय कनेक्शन बंद करावे का, त्याचा त्यांच्या झोपेवर आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, यावर सोशल मीडियावर वादविवाद सुरू आहे.

काही लोकांच्या मनात अशी भीती आहे की, उपकरणांमधून निघणारे रेडिओ फ्रीक्वेन्सी (RF) सिग्नल मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात किंवा त्यात अडथळा आणू शकतात; परंतु याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात? हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. खरंच वाय-फायमुळे मेंदूमध्ये अडथळे निर्माण होत आहेत का? रात्री वाय-फाय बंद करावे का? त्याविषयी न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात? जाणून घेऊयात…

वाय-फाय हे एक रेडिओ सिग्नल असते, जे वायरलेस राउटरमधून जवळच्या उपकरणामध्ये पाठवले जाते. हे उपकरण त्या सिग्नलचे रूपांतर डेटामध्ये करते, या डेटाचा वापर तुम्ही करू शकता. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

गुरुग्राम येथील मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या (Marengo Asia Hospitals) ‘मॅरेंगो एशिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो अँड स्पाइन’ (MAIINS)चे चेअरमन डॉक्टर प्रवीण गुप्ता म्हणतात, “समस्या अशी आहे की, अनेक भीतीदायक अभ्यास मानवाऐवजी प्राण्यांवर केले गेले आहेत. त्यामागचे कारण आणि परिणाम सिद्ध करण्यासाठी अधिक विशेष अभ्यासांची गरज आहे. उंदरांवर केलेल्या वाय-फायच्या अभ्यासातून असे सूचित झाले होते की, वाय-फायच्या संपर्कात आल्याने त्यांच्यामध्ये वंध्यत्व येऊ शकते; परंतु मानवावरील अभ्यासातून हे सिद्ध झाले नाही.”

वाय-फायविषयी चिंता निर्माण होण्याचे कारण काय?

  • वाय-फाय हे एक रेडिओ सिग्नल असते, जे वायरलेस राउटरमधून जवळच्या उपकरणामध्ये पाठवले जाते. हे उपकरण त्या सिग्नलचे रूपांतर डेटामध्ये करते, या डेटाचा वापर तुम्ही करू शकता.
  • या रेडिएशनमुळे मेंदूला नुकसान होते, असे काही संभ्रमात्मक सिद्धांत तयार झाले आहेत. खरे तर वाय-फाय नॉन-आयोनायझिंग रेडिएशन वापरते.
  • हे रेडिएशन सीटी स्कॅन किंवा एक्स-रेच्या तुलनेत खूपच कमकुवत असते. नॉन-आयोनायझिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवण्याइतके मजबूत नसतात.
  • त्यामुळे या सिग्नलमुळे डीएनए (DNA) बदलणे अगदी अशक्य आहे. आतापर्यंत अनेक अभ्यासांमध्ये मेंदूच्या गाठी, स्मरणशक्ती कमी होणे किंवा न्यूरोडीजनरेटिव्ह (Neurodegenerative) रोगांमध्ये थेट वाय-फायचा संबंध आढळलेला नाही.

मात्र, काही संशोधनांनी असे सूचित करून संभ्रम निर्माण केला आहे की, रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरींच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मेंदूच्या कार्यावर सूक्ष्म परिणाम होऊ शकतो, विशेषतः झोपेच्या चक्रावर. वाय-फाय किंवा मोबाईल रेडिएशनमुळे गाढ झोपेच्या वेळी मेंदूच्या लहरींवर किंचित परिणाम होऊ शकतो. परंतु, त्याचे परिणाम तितके तीव्र नाहीत. प्रत्येकाला हे माहीत आहे की, झोपेची खराब गुणवत्ता ही बऱ्याचदा तणाव, झोपण्यापूर्वी फोन पाहणे, अनियमित झोपण्याची दिनचर्या किंवा झोपेशी संबंधित सक्रिय विकारांशी जोडलेली असते. त्यामुळे वाय-फाय सिग्नलला त्यासाठी कारणीभूत ठरवणे चुकीचे आहे.

रात्री वाय-फाय बंद करून झोपणे महत्त्वाचे आहे?

व्यावहारिक दृष्टिकोनातून, मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगली ‘स्लीप हायजीन’. झोपण्याच्या वेळेपूर्वी स्क्रीन बघणे टाळणे, झोपण्यासाठी शांत वातावरण असणे आणि वेळापत्रकानुसार झोपणे महत्त्वाचे आहे. रात्री वाय-फाय बंद केल्याने अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते; परंतु केवळ यामुळे तुम्ही रात्री उशिरापर्यंत इंटरनेट वापरू शकणार नाही. वाय-फाय सिग्नलचा स्वतः कोणताही हानिकारक परिणाम होत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

रात्री वाय-फाय चालू ठेवल्याने मेंदूला नुकसान होऊ शकते, असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. परंतु, जर ते बंद केल्याने लक्ष विचलित होत नसेल किंवा तुम्हाला चांगली झोप लागत असेल, तर वाय-फाय बंद करून झोपणे, ही एक चांगली सवय ठरू शकते. झोपेची कमतरता, खराब जीवनशैली व जीवनाची गुणवत्ता यांमुळे मेंदूचे आरोग्य बिघडते.

कॅन्सरशी याचा काही संबंध आहे का?

वाय-फायमुळे कॅन्सर होतो ही एक अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर प्रतिष्ठित आरोग्य संस्थांनी केलेल्या अभ्यासांसह विस्तृत संशोधनात वाय-फायचा संपर्क आणि कॅन्सरचा विकास यामध्ये कोणताही संबंध आढळलेला नाही. या संस्था असे मानतात की, वाय-फायचा मार्यादित वापर सुरक्षित आहे.

वाय-फायभोवतीच्या अफवा

गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भासाठी धोकादायक : वाय-फाय गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भासाठी धोकादायक आहे, असे मानले जाते. परंतु, वाय-फायच्या संपर्कात आल्यामुळे गर्भाच्या विकासाला कोणताही धोका असल्याचे सिद्ध झालेले नाही.

वैद्यकीय उपकरणांमध्ये अडथळा: वाय-फाय पेसमेकर आणि श्रवणयंत्र (Hearing aids) यांसारख्या वैद्यकीय उपकरणांमध्ये अडथळा आणू शकते, असे सांगितले जाते. परंतु, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आरएफ (RF) अडथळ्यांना तोंड देण्यासाठी तयार केलेली आहेत. अनेक अभ्यासांनी असे दर्शवले आहे की, वाय-फाय त्यांच्या कामकाजात अडथळा आणत नाही.