US President Donald Trump Dead rumours : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या. काहींनी तर ट्रम्प यांच्या मृत्यूबाबतही तर्क-वितर्क लावले. जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी ‘ट्रम्प इज डेड’ अशा पोस्ट आपल्या’एक्स’अकाउंटवरून केल्या. या संपूर्ण प्रकारानंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. मात्र, व्हर्जिनियातील एका क्लबमध्ये ७९ वर्षीय ट्रम्प गोल्फ खेळताना दिसल्यामुळे या संपूर्ण चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळाला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूच्या अफवा कशा पसरल्या? त्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत जाणून घेऊ…
गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्यांच्या हातावर दुखापतीच्या खुणा असल्याचे फोटोही नुकतेच व्हायरल झाले होते. त्यामुळेच ट्रम्प यांच्या तब्येतीविषयीच्या शंका अधिकच गडद झाल्या. त्यातच गेल्या २४ तासांत त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नाही. याशिवाय ट्रम्प यांचे ३०-३१ ऑगस्टचे कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने या चर्चांना आणखीच हवा मिळाली. यादरम्यान काहींनी ते बेपत्ता झाल्याची आवई उठवली, तर काहीजणांनी थेट त्यांच्या निधनाचाच अंदाज बांधला. या अफवांमुळे अमेरिकेत आणि विशेषतः व्हाईट हाऊसच्या गलियार्यात मोठी खळबळ उडाली. काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी ट्रम्प खरोखरच जिवंत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला.
ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा कशी पसरली?
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या निधनाबद्दलच्या अफवा पसरल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी (२७ ऑगस्ट) व्हान्स यांनी अमेरिकन वृत्तपत्र ‘यूएसए टुडे’ला एक मुलाखत दिली. “डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर मी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास तयार आहे, त्यासाठी मला प्रशिक्षणही देण्यात आलं आहे”, असं विधान त्यांनी मुलाखतीत केलं. व्हान्स यांनी जरी ट्रम्प निरोगी असून राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील असं म्हटलं असलं तरी त्यांच्या विधानामुळं अमेरिकेतील जनतेत संशयाची सुई निर्माण झाली आहे.
आणखी वाचा : एक फोन कॉल आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव; मोदी-ट्रम्प यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याविषयी भाष्य करताना व्हान्स म्हणाले, “मला रात्री सर्वात शेवटी फोन करणारे तेच असतात आणि सकाळी सर्वात आधी त्यांचाच फोन मला येतो. हो… दुर्दैवी घटना घडू शकतात; पण मला खात्री आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपला कार्यकाळ पूर्ण करतील. अमेरिकन जनतेसाठी ते शेवटपर्यंत महान कामे करतील. गेल्या वर्षी पेनसिल्वेनियामधील एका प्रचारसभेत ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली होती. या हल्ल्याच्या एक वर्षानंतर व्हान्स यांनी हे विधान केलं. त्यानंतर शुक्रवारी (२९ ऑगस्ट) अमेरिकेतील समाजमाध्यमांवर “Trump Is Dead” (ट्रम्प यांचा मृत्यू झाला) आणि “Where Is Trump?” (ट्रम्प कुठे आहेत?) असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.
डोनाल्ड ट्रम्प सध्या कुठे आहेत?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत त्यांना जागतिक संघर्षांपासून ते अमेरिकन फुटबॉल खेळाडू ट्रॅव्हिस केल्ससोबत गायक टेलर स्विफ्टच्या साखरपुड्यापर्यंत अनेक विषयांवर प्रश्न विचारले गेले. त्यानंतर सलग तीन दिवस (बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार) ट्रम्प सार्वजनिकरित्या कुठेही दिसले नाहीत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या तीन दिवसांत त्यांच्या वेळापत्रकात कोणतेही कार्यक्रम नव्हते. इतकेच नव्हे तर लेबर डेच्या सुटीत ते वॉशिंग्टनमध्येच राहणार असून कोणतीही सार्वजनिक उपस्थिती ठेवली जाणार नाही, असेही जाहीर करण्यात आले.
‘द सिम्पसन्स’ची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर तर्कवितर्क सुरू असताना ‘द सिम्पसन्स’ या व्यंगचित्राचे निर्माते मॅट ग्रोइनिंग यांचं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. जुलैमध्ये सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये या मालिकेच्या ३७ व्या सीझनच्या प्रचारावेळी ग्रोइनिंग यांनी गमतीत म्हटलं होतं की, “मला खरं तर वाटलं होतं की ३६व्या सीझननंतर मालिका संपेल; पण अजून शेवट दिसत नाही. जोपर्यंत कोणीतरी मरत नाही, तोपर्यंत ही मालिका चालूच राहील.” ‘व्हेरिटी’या अमेरिकन वृत्तपत्रानुसार- ग्रोइनिंग म्हणाले, “मला प्रामाणिकपणे वाटलं होतं की ३६ व्या सीझनमध्ये आम्ही मालिका बंद करू; पण आता तशी काहीच चिन्हे नाहीत. आम्ही तोपर्यंत मालिका सुरूच ठेवणार, जोपर्यंत तुम्हाला माहीत असलेली व्यक्ती मरत नाही.”
ग्रोइनिंग यांचा रोख अत्यप्रत्यक्षरित्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच होता. तुम्हाला माहिती असलेल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर लोक रस्त्यावर नाचतील; पण राष्ट्राध्यक्ष व्हान्स त्या नाचण्यावर बंदी घालतील.” दरम्यान,’द सिम्पसन्स’ या मालिकेचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलच्या अनेक भविष्यावाणीचा एक गूढ इतिहास आहे. २००० साली प्रसारित झालेल्या एका भागात रिपब्लिकन नेते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असं दाखवण्यात आलं होतं, जे नंतर प्रत्यक्षात खरं ठरलं.
हेही वाचा : १७ मिनिटांच्या कॉलमुळे पंतप्रधानपदावरून हटवले; थायलंडमध्ये राजकीय भूकंप, कोण असणार नवे पंतप्रधान?
ट्रम्प यांच्या आरोग्यामुळे अफवांना आणखी बळ
या आठवड्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाताला झालेल्या जखमेचा फोटो व्हायरल झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिवसभर अनेकांशी हस्तांदोलन करीत असल्याने ही जखम झाली आहे, असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. सध्या अमेरिकन राजकारणात आधीच तणावाचं वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे विवादास्पद निर्णय, कडक भाषणं आणि अनपेक्षित धोरणांमुळे देशातील जनतेतही त्यांच्याविषयी नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान, त्यांची प्रकृती आणि बेपत्ता होण्याच्या अफवांमुळे अमेरिकन जनतेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
ट्रम्प सार्वजनिकरित्या दिसल्याने अफवांना पूर्णविराम
शनिवारी (३० ऑगस्ट) वॉशिंग्टन डी. सी. येथील व्हाइट हाऊसच्या साऊथ लॉनवर ट्रम्प त्यांच्या नातवांबरोबर दिसून आले. त्यानंतर ते व्हर्जिनियामधील त्यांच्या गोल्फ क्लबकडे गेले. यावेळी ट्रम्प यांनी पांढरा पोलो शर्ट, काळी पँट आणि लाल रंगाची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा मजकूर असलेली टोपी घातली होती. ‘पीपल’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार- ट्रम्प यांच्या वाहनांचा ताफा स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यानंतर (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वा) व्हर्जिनिया येथील ट्रम्प नॅशनल गोल्फ मैदानावर पोहोचला. मात्र, तरीही काही लोक ट्रम्प यांच्याबद्दल निराधार दावे करीत आहेत. गोल्फ खेळताना दिसलेली व्यक्ती ट्रम्प नसून बनावट व्यक्ती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे जिवंत असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी माध्यमांना दिली.