एखाद्या व्यक्तीला सातत्याने विविध प्रकरणांमध्ये अभ्यारोपित केले जात असेल, तर अशी व्यक्ती खजील होऊन माफी मागते किंवा गपगुमान कायदेशीर प्रक्रियेला सामोरी जाते. अशी व्यक्ती राजकीय परिप्रेक्ष्यात सक्रिय असेल, तर तिला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते. किंवा अशी कलंकित व्यक्ती मतदारांसमोर सादर करून आपल्या पक्षाचे मातेरे होऊ नये याची खबरदारी पक्षाचे नेतृत्व घेते आणि तिला पक्षातून किंवा किमान सार्वजनिक जीवनातून हाकलून देते. काही वेळा एखाद्या देशातील प्रस्थापित कायदेच बहुअभ्यारोपित व्यक्तीला राजकीय वा घटनात्मक पद स्वीकारण्यापासून प्रतिबंधित करतात किंवा अपात्र ठरवतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विविध खटल्यांमध्ये अभ्यारोपित होत असतात. पण ते खजिल होणाऱ्यांपैकी नव्हेत. गपगुमान माफी मागणाऱ्यांपैकी तर नव्हेच नव्हेत. शिवाय अमेरिकेत गेली काही वर्षे रिपब्लिकन पक्षावरील त्यांची पकड इतकी घट्ट आहे, ज्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचे स्वप्नही त्या पक्षाचे नेते पाहू शकत नाहीत. कारण रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये पुढील खेपेस बसू शकेल, हा चमत्कार केवळ ट्रम्पच करू शकतात हे ही मंडळी व्यवस्थित जाणून आहेत. अभ्यारोपित व्यक्तीला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणारा कायदा अमेरिकेत अस्तित्वात नाही. त्यामुळे एक-दोन किंवा तीन काय, दहा प्रकरणांमध्ये जरी ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवला गेला, तरी त्यामुळे ट्रम्प उजळ माथ्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध होणारच आहेत. ज्या तिसऱ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर अमेरिकेच्या न्याय खात्याने ठपका ठेवला, ते आधीच्या दोन प्रकरणांपेक्षा अधिक गंभीर असल्याचे तेथील विश्लेषक आणि माध्यमांचे मत आहे. परंतु ब्राझीलमध्ये जाइर बोल्सोनारो यांच्यासारखे ते निवडणूक लढवण्यास अपात्र वगैरे ठरत नाहीत.

तिसरे प्रकरण अधिक गंभीर आहे हे मात्र नक्की. एक ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या न्याय खात्याने ट्रम्प यांच्यावर २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल उलथवून टाकल्याचा आरोप ठेवला. गोपनीय कागदपत्रांच्या गैरहाताळणीप्रकरणी त्यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी ठपका ठेवला गेला. अशा प्रकारे दोन प्रकरणांमध्ये ठपका ठेवले गेलेले ते पहिलेच माजी अध्यक्ष. विशेष सरकारी वकील जॅक स्मिथ यांनी सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये ‘ट्रम्प यांच्या चिथावणीवरून त्यांचे समर्थक ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल इमारतीवर चाल करून गेले’ असा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र मतमोजणीपूर्वी आणि नंतर त्यांनी सातत्याने केलेल्या वक्तव्यातून आणि कृतींमधून निवडणुकीची वैधता आणि मतदारांचा कौल या दोन्ही बाबी डागाळण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला, जी अमेरिकेची फसवणूक ठरते. याशिवाय निवडणूक निकालावर शिक्कामोर्तब करण्याच्या अमेरिकी काँग्रेसच्या प्रक्रियेत अडथळे आणणे, मतमोजणीविषयी हेतुपुरस्सर शंका उपस्थित करून विरोधी उमेदवाराच्या (जो बायडेन) मतदारांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न करणे असे थोडे गुंतागुंतीचे आरोप स्मिथ यांनी ठेवले आहेत. यातून ट्रम्प यांनी जन्माला घातलेल्या ‘निवडणूकहनन’ कथानकाला रिपब्लिकन नेतृत्वगणाने उपकथानकाची जोड दिली आहे. जो बायडेन आणि त्यांच्या सरकारने तपासयंत्रणांचा शस्त्रासारखा वापर सुरू केल्याचे यांचे म्हणणे. ट्रम्प खटल्यांच्या सुनावणीसाठी एखाद्या युद्ध विजेत्याच्या थाटात जातात, रुबाबात न्यायाधिकाऱ्यांसमोर पेश होतात आणि बाहेर येऊन आणखी आग ओकतात. याची फलनिष्पत्ती काय? तर रिपब्लिकन पक्षातच त्यांच्या अध्यक्षीय उमेदवारीची टक्केवारी अभूतपूर्व वाढलेली दिसते. ५४ टक्के रिपब्लिकन मतदारांना ट्रम्प यांनी आगामी अध्यक्षीय निवडणूक लढवावी असे वाटते. या शर्यतीत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी रॉन डेसान्टिस १३ टक्के इतके ‘दूर’ आहेत! 

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

अशी ही व्यक्ती अध्यक्षपदाची कायदेशीर आणि प्रमाणबद्ध निवडणूक हरल्यानंतर तो पराभव मानतच नाही. उलट विजयच आपल्यापासून हिरावून घेतला गेला, याचे कथानक रचते आणि समर्थकांच्या गळी उतरवते. तिचे उपद्रवमूल्य पराभवानंतर इतके उच्च असते, तर मग उद्या पुन्हा अध्यक्षपदी खरोखरच निवडून आल्यावर ती काय करेल? याबाबत अमेरिकी मतदार आणि रिपब्लिकन पक्षाने विचार करण्याची गरज आहे. ट्रम्प जितके कायद्याच्या भाषेत गोत्यात गेल्यासारखे वाटतात, तितके ते या खटल्यांचाच आधार घेत झोकात वावरू लागतात! अमेरिकेच्या जवळपास अर्ध्या वैध मतदारांना, तेथील जुन्याजाणत्या रिपब्लिकन पक्षाला यात काही वावगे वाटत नाही, हे वास्तव जितके दुर्दैवी आहे तितकेच धोकादायक. अमेरिकेतील व्यवस्थांच्या मर्यादाही यानिमित्ताने वारंवार उघडय़ा पडताना दिसतात. त्यांनी ट्रम्प यांच्याशी टक्कर घेण्यात कोणतीही कसर सोडलेली नसली, तरी विविध पळवाटा शोधून ट्रम्प त्यांना जेरीस आणत आहेत हेही खरेच.