Door to Hell Turkmenistan नरकाचा दरवाजा ही संकल्पना आपण परीकथांमध्ये वाचली किंवा ऐकली आहे. नरकाचे दृश्य डोळ्यांसमोर आल्यास धगधगती आग आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, पृथ्वीवर खरोखरच नरकाचं द्वार म्हणावली जाणारी अशी एक जागा आहे. हे ऐकून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल; मात्र ही बाब खरी आहे. पूर्वी सोविएत संघात सहभागी असलेल्या तुर्कमेनिस्तान देशाच्या उत्तरेकडे एक भलामोठा खड्डा आहे आणि त्यालाच ‘डोअर टू हेल’ किंवा ‘गेट्स ऑफ हेल’, असेही म्हणतात. आता हा दरवाजा बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी तुर्कमेनिस्तानचे नेते गुरबांगुली बर्दीमुखामेतोव्ह यांनी ही आग विझवण्याचा विचारही मांडला होता.
२०२५ मध्ये या अनोख्या विवरामधील (दारवाझा क्रेटर) ज्वलनशील मिथेन वायूचे प्रमाण तीन पटींनी कमी झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र, ही आग नक्की कधी पूर्णपणे विझेल किंवा ती विझवण्यासाठी माणसांची गरज भासेल का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहो. या विवरात अनेक दशकांपासून आग धगधगत आहे. हे अनोखे ठिकाण आता पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आले आहे. त्याला ‘नरकाचा दरवाजा’ का म्हटले जाते? हे विवर तयार झाले कसे? या ठिकाणी जाणारी एकमेव व्यक्ती कोण होती? जाणून घेऊयात…

‘दारवाझा क्रेटर’ काय आहे?
- शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये सोविएत संघाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांना नैसर्गिक गॅस आणि तेलाची आवश्यकता होती.
- त्यादरम्यान १९७१ आली सोविएत भूगर्भशास्त्रज्ञांनी चुकून नैसर्गिक वायूच्या साठ्यावर ड्रिलिंग केले आणि या खड्ड्याची निर्मिती झाली.
- संशोधनादरम्यान ही जमीन खचली. विषारी वायूचा साठा बाहेर पडू नये म्हणून त्या जागेला आग लावल्यास मदत होईल, असे भूगर्भशास्त्रज्ञांना वाटले आणि ती कल्पना योग्य होती.
गॅस संपल्यावर आग विझेल, असा अंदाज होता. पण, मिथेन वायू कधी संपलाच नाही. आताही हे ठिकाण बंद करण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ही आग माणसांच्या मदतीने विझवली जाईल की नैसर्गिकरीत्या वायू संपल्यानंतर ती आपोआप विझेल, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तेथून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनमुळे मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून या खड्ड्यामध्ये आग धगधगत आहे. हा खड्डा पर्यटकांसाठी आजही आकर्षणाचे केंद्र आहे.
नरकात प्रवेश करणारा पहिला माणूस
कॅनडाचे संशोधक व टीव्ही होस्ट जॉर्ज कोरोनिस यांनी एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ते सहजपणे त्यात उतरले. परंतु, ते इतके सोपे नव्हते. जॉर्ज कोरोनिस १७ मिनिटांसाठी त्या खड्ड्यात उतरले होते. २०१३ मध्ये नरकाच्या त्या खड्ड्यात उतरण्यासाठी त्यांनी खास ‘स्पेस सूट’ परिधान केतला होता. जॉर्ज कोरोनिस दोरी आणि उष्णता-प्रतिरोधक सूटच्या मदतीने २३० फूट रुंद आणि १०० फूट खोल क्रेटरमध्ये उतरले. त्यांचा सूटदेखील तेथील तापमान सहन करू शकेल, या पद्धतीने तयार करण्यात आला होता. त्यात स्वयंचलित श्वासोच्छ्वास प्रणाली होती आणि खास तयार केलेला क्लायम्बिंग हार्नेसदेखील तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आला होता.

विवराच्या खोलीतून वायू आणि मातीचे नमुने गोळा करणे हा त्यांचा विवरात उतरण्यामागचा उद्देश होता. जॉर्ज कोरोनिस यांनी आपल्याबरोबर आणलेल्या मातीचे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन ग्रीन यांनी निरीक्षण केले आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की, ‘डोअर टू हेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या विवरामध्ये जीवनाचे संकेत नक्कीच होते.
‘डोअर टू हेल’ची चर्चा पुन्हा का होतेय?
जॉर्ज कोरोनिस यांनी स्वतः एका ‘रेडीट’ पोस्टवर या मानवनिर्मित आपत्तीबद्दल सांगितले. त्यामुळे अनेक दशकांपासून मानवाला आकर्षित करणाऱ्या या ठिकाणाबद्दल पुन्हा एकदा स्वारस्य निर्माण झाले. ‘रेडीट’वर एका वापरकर्त्याने कोरोनिस यांचा उल्लेख केला आणि त्यांनी प्रचंड उष्णतेमध्ये जगणाऱ्या अति-सूक्ष्मजंतूंचा (extremophile bacteria) शोध घेण्यास मदत केल्याचे म्हटले. त्यानंतर Reddit वर या क्रेटरच्या अस्तित्वाबद्दल चर्चा झाली. या पोस्टवर जॉर्ज कोरोनिस यांनी सांगितले की त्यांना पुन्हा एकदा तुर्कमेनिस्तानमध्ये बोलावण्यात आले होते, पण व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना जाता आले नाही.
कोरोनिस म्हणाले, “क्रेटरमधील आग हळूहळू विझत असल्याची माहिती मला खूप आधीपासून आहे. मला पुन्हा तुर्कमेनिस्तानमध्ये बोलावले होते; पण माझ्या वेळापत्रकामुळे मला ते शक्य झाले नाही. ते एक अदभुत ठिकाण आहे आणि त्याच्या तळाशी जाणे हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव होता.” सूटमध्ये किती उष्णता होती? यावर बोलताना ते म्हणाले, “तेथे इतकी उष्णता होती की, क्रेटरच्या आत १५ मिनिटांनंतर मी बेशुद्ध होण्याच्या स्थितीत पोहोचलो होतो. मोठ्या खड्ड्यांपैकी एका ठिकाणी जमिनीचे तापमान ४०० डिग्री सेल्सियस इतके होते. तो सर्वांत भयानक क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदा कड्याच्या जवळ जाऊन आत डोकावून पाहिले. आत जाण्याआधी आम्ही जवळजवळ एक आठवडा त्याचा अभ्यास केला होता.”