इराण आणि इस्रायल संघर्ष अधिक उग्र होत चालला आहे. अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. सोमवारी इस्रायलने इराणच्या सर्वांत कुप्रसिद्ध अशा तुरुंगावर भीषण हल्ला केला. इस्रायलने सांगितले की, त्यांनी एविन तुरुंग आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या सुरक्षा मुख्यालयासह अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. इस्रायलने असेही म्हटले की, त्यांनी इराणच्या फोर्डो समृद्धीकरण सुविधेभोवती असणाऱ्या रस्त्यांवरदेखील हल्ला केला. इराणमधील एविन तुरुंग इतका का कुप्रसिद्ध आहे? इस्रायलने या तुरुंगाला लक्ष्य का केले? त्याविषयी जाणून घेऊ…
एविन तुरुंग काय आहे?
- एविन तुरुंग इराणची राजधानी तेहरानमध्ये आहे.
- या तुरुंगाची प्रशासन व्यवस्था इराणचे गुप्तचर मंत्रालय आणि आयआरसीजीद्वारे पाहिली जाते. त्यांना थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अहवाल सादर करावा लागतो.
- हा तुरुंग पाच हेक्टरपेक्षा जास्त जागेवर पसरलेला आहे. त्यात १० ते १५ हजार कैदी आहेत, असे म्हटले जाते.
- राजकीय कैदी, विदेशी आणि दुहेरी नागरिकत्व असलेल्या कैद्यांना या तुरुंगात ठेवले जाते.
- त्यांच्याशी या तुरुंगात गैरवर्तन करीत, त्यांचा अमानुष छळ होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेही हा तुरुंग कुप्रसिद्ध आहे.

हेही वाचा
हा तुरुंग १९७१ मध्ये इराणच्या शाहचा पराभव करणाऱ्या इस्लामिक क्रांतीपूर्वी बांधण्यात आला होता. मोहम्मद रेझा पहलवी हा इराणचा शेवटचा शाह होता. त्याने हजारो राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठीदेखील या तुरुंगाचा वापर केला होता. त्यापैकी अनेकांना छळून मारण्यात आले होते. त्या वेळी हा तुरुंग सावक (शाहच्या गुप्त पोलिसांद्वारे) चालवला जात होता. १९८८ मध्ये क्रांतीनंतर हजारो लोकांना एविन तुरुंगात फाशी देण्यात आले. तुरुंगात असलेल्या लोकांनी बराच काळ त्यांच्याबरोबर छळासह गैरवर्तन केले गेल्याचा आरोप केला आहे.
ब्रिटिश-इराणी व्यापारी अनुशेह अशुरी इराणमध्ये त्याच्या आईला भेटायला गेला होता तेव्हा त्याला इस्रायलचा हेर असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याने डीडब्ल्यूला सांगितले, “हॉल १२ मधील परिस्थिती अत्यंत भयानक होती. आम्हाला खटमल, झुरळे, मोठे उंदीर यांचा सामना करावा लागला आणि घाणेरडे अन्न देण्यात आले.” त्याने पुढे सांगितले की, हॉल १२ मध्ये फक्त चार खोल्यांमध्ये ७० लोक राहत होते. त्याने अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ झाल्याचाही आरोप केला. तो म्हणाला, “ते माझ्या कुटुंबातील सदस्यांना हानी पोहोचवतील अशा धमक्या देत होते.” ब्रिटन सरकारने इराणला मोठी रक्कम दिल्यानंतरच अशुरी याची सुटका करण्यात आली.
लेबनीज उद्योगपती निझार झक्का यांनीही आपला अनुभव सांगितला. हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांनाही एविनमध्ये चार वर्षे कैद करण्यात आले होते. झक्का यांना वॉर्ड ७ मध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाच चौरस मीटरच्या खोलीत सुमारे २० लोक होते. झक्का यांनी त्यांचा शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप केला. “त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न दिल्यास जोपर्यंत तुम्ही थकून जात नाही आणि बेशुद्ध पडत नाही तोपर्यंत तुम्हाला अस्वस्थ स्थितीत उभे करतात किंवा बसवतात. मग ते एकमेकांशी बोलत फिरायला लागतात आणि तुमच्या हातावर पाय ठेवतात”, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांच्या विनंतीनंतर आणि लेबनीज राष्ट्राध्यक्ष मिशेल औन यांच्या विनंतीनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय कैद्यांना सामान्य कैद्यांपेक्षा अधिक त्रास सहन करावा लागतो. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या मते, एविनमधील कैद्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण, विजेचा धक्का आणि लैंगिक अपमान सहन करावा लागला आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या नर्गेस मोहम्मदी यांनी अधिकारी आणि चौकशीकर्त्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. इराणी-कॅनेडियन माहितीपटकार मझियार बहारी आणि नर्गेस मोहम्मदी (ज्यांनी २०२३ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार जिंकला) हे एविनमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रसिद्ध व्यक्तींपैकी आहेत. वैद्यकीय अडचणीमुळे मोहम्मदी यांना तात्पुरते सोडण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या जेसन रेझाईन यांसारख्या दुहेरी नागरिकत्व असलेल्यांनादेखील एविनमध्ये ठेवण्यात आले आहे. कॅनेडियन पत्रकार झहरा काझेमी यांचे २००३ मध्ये एविनमध्ये निधन झाले. या तुरुंगाला अमेरिका आणि युरोपियन युनियन या दोन्ही देशांनी लक्ष्य केले आहे.
एविन तुरुंगाला लक्ष्य का केले?
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने एविन तुरुंगाच्या गेटवर हवाई हल्ला केला गेल्याचे म्हटले आहे. या वृत्तात हल्ल्याचे व्हिडीओही शेअर करण्यात आले आहेत. इराणी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी इस्रायल एविन तुरुंगासारख्या सरकारी इमारतींना लक्ष्य करीत आहे. इस्रायली संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, “इस्रायमधील नागरी वस्तीवर हल्ला केल्याबद्दल इराणी हुकूमशहाला पूर्ण ताकदीने शिक्षा दिली जाईल.” ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, तुरुंगात ठेवण्यात आलेल्यांमध्ये मानवाधिकार वकील मोहम्मद नजफी, कार्यकर्ते रजा खानदान यांचा समावेश आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात काही कैदी जखमी झाल्याचीही माहिती आहे.
परंतु, इराणच्या ‘नॉरन्यूज’ने म्हटले आहे की, एविन तुरुंगातील कैद्यांच्या कुटुंबीयांना ते सुरक्षित आहेत हे माहीत असले पाहिजे. इस्रायलने इराणच्या पॅलेस्टाईन स्क्वेअर आणि पॅरामिलिटरी बासीज व्हॉलेंटियर कॉर्प्स इमारतीलादेखील लक्ष्य केले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अधिकाधिक अधिकारी इराणमध्ये ‘शासन बदल’ करण्याची मागणी करीत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. “जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा एकदा महान करू शकत नसेल, तर राजवट बदल का होणार नाही?” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले.